कोरोना काळातच केला मूर्तीकलेचा श्रीगणेशा

कोरोना काळातच केला मूर्तीकलेचा श्रीगणेशा

Published on

swt301.jpg
KOP25N88163
मुंबई ः येथे मयूर पवार गणेशमूर्तींचे रंगकाम करताना.

कोरोना काळातच केला मूर्तीकलेचा श्रीगणेशा
तोरसोळेतील मयूर पवारची प्रेरणादायी वाटचाल; मुंबईत उभारला व्यवसाय
संतोष कुळकर्णीः सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३० ः कोरोनाचा काळ अनेकांच्या नजरेसमोर आला, तरी आजही तत्कालीन स्थितीतील नोकरी तसेच व्यवसायामधील अस्थिरता, आरोग्याच्या विविध समस्या, जगण्यातील संघर्ष, आर्थिक कोंडी याच्या आठवणी ताज्या होतात. कोरोना काळात काहींना नोकरीवर पाणी सोडावे लागले, व्यवसाय बदलले, आर्थिक ओढाताण झाली; मात्र कोरोनातच तोरसोळे (ता. देवगड) येथील मयूर पवार या युवकाने मुंबईत राहून स्वतःच्या मूर्तीकलेला आकार देत नव्या व्यवसायाचा प्रारंभ केला. तत्कालीन स्थितीत त्याने गणेशमूर्ती बनविण्याच्या व्यवसायाचा केलेला श्री गणेशा आज त्याला आर्थिक स्थैर्य देणारा ठरत आहे.
मयूर मूळचा देवगड तालुक्यातील तोरसोळे गावचा. वडील व्यवसायानिमित्त गावी आणि मुंबईत असतात. मयूरला बालपणापासून गणपतीची खूप आवड होती. लहान असताना त्याला गणपतीच्या मूर्तींचे मोठे आकर्षण असायचे. बारावीनंतर ‘थ्रीडी अ‍ॅनिमेशन’ची पदविका (डिप्लोमा) पूर्ण केली. सोबतच पदवीचे शिक्षणही पूर्ण केले. ‘नोकरी करायची, तर मुंबईत प्रयत्न कर किंवा आपल्या व्यवसायाकडे लक्ष दे’ असे वडिलांनी त्यावेळी त्याला सांगितले होते.
तत्कालीन स्थितीत कोरोनाचा पहिला टप्पा झाल्याने नोकरी मिळण्याची आशा काहीशी धूसर होती. शिवाय कमी पगाराची नोकरी परवडणेही अवघड असल्याने त्याने वडिलांच्या व्यवसायात मदत करण्याचे योग्य समजले. त्याने घेतलेला निर्णय त्याच्या आई-वडिलांनाही त्यावेळी आवडला; मात्र त्याच्यातील कला त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.
२०१६ पासून वेगवेगळ्या गणपती शाळांमध्ये जाऊन गणपतीचे रंगकाम करणे, मूर्ती शोभिवंत करणे अशी कामे तो करीत असल्यामुळे त्याच्यातील आत्मविश्‍वास वाढला होता. त्याला स्वतःची गणेशमूर्ती शाळा काढायची होती; परंतु वडिलांना त्यातले काहीच माहीत नसल्याने त्यांचा थंड प्रतिसाद होता. अखेर धाडसाने कोरोनाच्या काळातच २०२० पासून त्याने स्वतःची गणपती शाळा सुरू केली. थ्रीडी अ‍ॅनिमेशनची पदविका घेतली असल्याने त्याला काही कल्पना सूचत गेल्या. गणपती मूर्तीमध्ये काही बदल करून छायाचित्रे बनवायला सुरुवात केली. अशी तयार केलेली छायाचित्रे शाळा, महाविद्यालयांतील सहकाऱ्यांना पाठवून आपल्या गणपतीची निवड करायला तो सांगायचा. निवड केलेली तशीच मूर्ती पेणवरून बनवून घेऊ लागला. साधी मूर्ती तयार होऊन आल्यावर त्यावर मनासारखे रंगकाम तो करीत असे. रंगकाम केलेल्या मूर्तांना डायमंड, फेटे, धोतर, शेले आदी कपड्यांमध्ये बनवून मूर्ती शोभिवंत करण्याचे काम त्याने सुरू केले. हळूहळू त्याच्या कलेची गणेशभक्तांमध्ये ‘क्रेझ’ वाढू लागली.
सुरुवातीला मित्रमंडळींनंतर कोकणातील मुंबई स्थित मंडळींकडून गणेशमूर्तींसाठी मागणी वाढू लागली. आता तर मुंबईतील कोकणी मराठी माणसांबरोबरच मुंबई स्थित उत्तर भारतीय तसेच बिहार, गुजरातमधील नागरिक, मुंबईतील सार्वजनिक छोटी गणेश मंडळे यांच्याकडून मयूरच्या मूर्तींना मागणी वाढू लागली. सद्यस्थितीत जवळपास ५० गणेशमूर्ती तो घडवतो. मुंबईत जागेची समस्या असल्याने घरी मिरारोड आणि वरळीला मूर्ता ठेवल्या जातात. मुंबईमध्ये विरारपासून गिरगांवपर्यंत गणपतींना मागणी असते. मालाड ते विरारची मंडळी मिरारोड येथून गणपती घेऊन जातात, तर वरळीतून त्या भागातील गणेशभक्त मूर्ती घेऊन जातात. गणपतीसाठी एखादा नवीन भाविक मिळवून देणे, आदी कसलीही फारशी मदत वडिलांकडून त्याला होत नाही. त्याची आई मात्र सहकार्य करते.
गणपतीसाठी आकर्षक दागिने बनवणे, मूर्तीच्या रंगसंगतीमध्ये तो आईचा विचारही घेत असतो. एकूणच त्याच्या मूर्तीकलेची झेप आता वाढत आहे. साधारणतः एक फुटापासून साडेतीन फुटांपर्यंत त्याच्या मूर्ती असतात. सुमारे ८ हजारांपासून २५ हजारांपर्यंत त्याच्या किमती असतात.

चौकट
आकर्षक मूर्तींची गणेशभक्तांना भुरळ
काहींना अचानक उद्‌भवलेला कोरोनाचा काळ ‘बॅडपॅच’ ठरला असला, तरीही मयूरने मात्र याच कोरोनाच्या काळात नवी झेप घेण्याचा संकल्प केला. आज त्याच्या गणेशमूर्ती केवळ मुंबईतच नाही तर जयपूर, कर्नाटक, बंगळूर या ठिकाणी खासगी आराम गाड्या तसेच रेल्वेच्या सहाय्याने गणेशभक्तांच्या घरी पाठविल्या जातात. साधारणतः गुढीपाडव्यापासून ऑनलाईन बुकिंग सुरू होते. गणेशोत्सवाआधी सुमारे दोन महिने मूर्तीकलेतील सर्व कामे वडिलांचा व्यवसाय सांभाळून रात्री जागवून तो करीत असतो.

कोट
swt302.jpg
88164
मयुर पवार

लहानपणापासून श्री गणेशाबाबत मनात कुतुहल होते. शिक्षणाचा उपयोग मूर्ती बनवण्यासाठी करण्याचा विचार पुढे आला. कोरोना काळात नोकरीच्या मागे न लागता वडिलांच्या व्यवसायात मदत आणि स्वतःची कला जोपासण्यासाठी मूर्ती बनविण्याचे काम सुरू केले. आज गणरायाची मूर्ती बनवताना खूप आनंद होतो. सुरुवातीला कला म्हणून, तर आता व्यवसाय म्हणून मूर्ती बनवतो.
- मयूर पवार, गणेश मूर्तिकार, मुंबई-तोरसोळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com