मानवी भावनांच्या हृद्य स्पर्शाच अविष्कार ''गौराई''

मानवी भावनांच्या हृद्य स्पर्शाच अविष्कार ''गौराई''

Published on

(टूडे पान १ साठी, सकाळ विशेष)


- rat31p6.jpg-
25N88327
सजवलेली गौरी

गणेशोत्सव हा कोकणाचा सर्वात मोठा सांस्कृतिक सोहळा. या उत्सवात गणेशमूर्तींची स्थापना घराघरांत होते, तसाच एक अविभाज्य भाग म्हणजे गौरी आगमन. गौरी ही परंपरा कोकणातील प्रत्येक घरात प्रेम, भक्ती आणि कौटुंबिक ऐक्याचे प्रतीक मानली जाते. गणेशाच्या आगमनानंतर दोन दिवसांनी गौराई येते. गणपतीला आईची भेट म्हणून गौराईंचे आगमन मानले जाते. गौराईंचे स्वागत करताना घराघरांत फुलांची सजावट, तोरण, रांगोळ्या आणि खास जेवणाचा बेतही केला जातो. गौरी परंपरा ही फक्त मूर्तीपूजा किंवा सण नाही, ते संस्कृतीचे वहन आहे. एका अर्थाने हा खास करून महिलांचा आणि त्यातही माहेरवाशिणींचा सोहळा आहे. नटणे, सजणे, माहेरवाशिणीचे कोडकौततूक माहेरचा निरोप घेताना साऱ्यांचे दाटून येणारे कंठ सारे सारे आहे. मानवी भावभावनांचे देवीवर आरोपणाचा उत्कट भाव म्हणजे गौरी. गणेशोत्सवातील गजर, फुलांच्या आराशीतून उमटणारा निसर्गाचा अविष्कार, स्त्रियांची मंगलगाणी आणि कुटुंबातील एकोप्याचा उत्सव यातून गौराई आगमन या सणाला मंगलमयतेसह हृद्य मानवी स्पर्श लाभतो.....!

- सचिन माळी, राजेंद्र बाईत, राधेश लिंगायत
---

‘गौराई’
मानवी भावनांच्या हृद्य स्पर्शाचा आविष्कार

माहेरवाशिणीचा सोहळा अन् उमाळा ; परंपरेचे उत्कट दर्शन

गौराईंची प्रतिष्ठापना कोकणात विविध प्रकारे केली जाते. मातीच्या मूर्ती गावोगावी मातीकाम करणाऱ्यांकडून घेतल्या जातात. पिठाच्या गौरी उखळपाटीवर बनवलेल्या पिठाच्या मूर्तींना अलंकार लावले जातात. धातूच्या मूर्ती पितळ किंवा तांब्याच्या मूर्ती पिढ्यान्पिढ्या जतन करून वापरल्या जातात. कलशरूप गौराई धान्याने भरलेला कलश, नारळ व पानांनी सजवलेला. गौरीपूजनाच्या विधीमध्ये दोन मुख्य घटक आहेत, ते म्हणजे सूप आणि रोवळी. या दोन्ही गोष्टी मांगल्य, पावित्र्य, सुबत्ता यांचे प्रतीक आहे. शिवाय यांचा उपयोग विवाहविधी, बारसे या सोहळ्यावेळी केला जातो. सूप हे धान्य पाखडण्यासाठी, चांगलं – कसदार ते राखून खराब ते टाकून देण्यासाठी, तर रोवळी ही धान्य धुण्यासाठी वापरली जाते. सूप आणि रोवळी या दोन्ही वस्तू दैनंदिन वापरल्या शिवाय समृद्धीशी संबंधित असून शुद्धता आणि सात्त्विकतेशी त्यांचा संबंध जोडला जातो. याच रोवळीमध्ये घराकडून निघताना विवाहिता आघाडा, हळद आणि तेरडा यांची रोपे घेऊन जवळच्या पाणवठ्यावर जातात. तिथे या रोपांची पूजा करून गौरीला त्यात प्रवेशण्यास प्रार्थना करतात आणि सुपामध्ये ओवसा मांडून तो गौरीसमोर ओवाळतात, ओवसतात. पाणवठ्यावर तेरड्याची मुळे रोवळीमध्ये धुतली जातात. तेरड्याची मुळे ही लक्ष्मीची पावले मानली जातात. गौरी पूजनाला हीच रोपे वापरण्यामागेदेखील औषधी कारणे आहेत. तसेच या तीनही वनस्पती जमिनीवर आणि खाली पसरणाऱ्या आहेत. या मागे निसर्ग आणि मानवाचे दृढ नातं हे प्रतीक आहे.
---
25N88429
मंडणगड येथे मिरवणुकीने गौराई घरी नेताना महिलावर्ग.

- rat३१p२.jpg-
25N88323
मंडणगड येथे गौरीपूजन करताना सुहासिनी

*स्त्रियांचा सहभाग, सौंदर्यपूर्ण आरास
गौराईच्या आगमनात कोकणातील स्त्रियांचा सहभाग सर्वात जास्त असतो. गौराईंना नेसवलेली पैठणी, काठाची साडी किंवा विविध वस्त्रे ही परंपरेची शोभा वाढवतात. पारंपरिक दागदागिने, फुले आणि आरासीतून गौराईंचे सौंदर्य खुलते. स्त्रिया ओव्या, गाणी व मंगलाष्टके म्हणत गौराईंचे पूजन करतात. ही आरास ही केवळ सौंदर्य नव्हे, तर घरात सुख, शांती, मंगलमयता आणि समृद्धी नांदावी यासाठी केलेली भक्तिपूर्वक सजावट असते. गौराई आगमन ही परंपरा केवळ धार्मिक नसून सांस्कृतिक वारसा आहे. ग्रामीण भागात गौरी पूजन हे शेतसंपन्नतेचे प्रतीक मानले जाते. स्त्रियांना स्वतःची सर्जनशीलता व्यक्त करण्यासाठी आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी गौराई पूजन हा एक सणासारखा सोहळा आहे. कोकणातील या परंपरेतून आईचे माहेरपण, स्त्रीशक्तीचा गौरव आणि कौटुंबिक बंध अधिक घट्ट होतात.
गौरी हा जणू कौटुंबिक ऐक्याचा उत्सव असतो. गौराईच्या दिवसांत कुटुंबीय, नातेवाईक आणि पाहुण्यांचा मोठा जमाव घरात असतो. गौराईच्या पूजेनंतर पक्वान्न, लाडू, करंज्या, पुरणपोळी यांचा बेत असतो. संध्याकाळी स्त्रियांचे एकत्र येऊन केलेले गौरीगीतांचे गायन घराघरात ऐकू येते. या परंपरेतून घरातील स्त्रीशक्तीचे सामर्थ्य, कुटुंबातील ऐक्य आणि नात्यांची गोडी अधोरेखित होते.
---
(स्वतंत्र तीन एकाखाली एक अशा घ्याव्यात)

*हळदीच्या गौरी
हिंदू धर्मात गौरीला शिवाचे शक्तीस्वरूप मानले जाते. पार्वतीलाच गौरी असेही म्हटले जाते. या गौरीची मूर्ती बनविण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. त्यामुळे तिला हळदीची गौरी म्हटले जाते. हळदीच्या गौरीदिवशी सुवासिनी महिला हळदीच्या झाडाचे रोप घेऊन पाण्याच्या झऱ्या‍च्या ठिकाणी जातात. त्या ठिकाणी हळदीच्या रोपाची मनोभावे पूर्जाअर्चा करून त्या रोपाला गौरी म्हणून विविधांगी गाणी म्हणत आनंदोत्सव साजरा करीत घरी आणण्याची वर्षानुवर्षाची परंपरा आजही जपली जात आहे. हळदीच्या गौरीसाठी हळदीचे रोप उपलब्ध व्हावे म्हणून अनेक घर परसांमध्ये हळदीच्या रोपांची लागवड केलेली असते. अशाच प्रकारे तेरड्याच्या गौरी बनवण्याची प्रथा आहे.

*खड्यांच्या गौरीची प्रथा!
कोकणातील खड्यांच्या गौरी कोकणस्थ ब्राह्मणांकडून पुजल्या जातात. सात खड्यांचा वापर केला जातो. माहेरवाशीण गौरींना सुपात तेरडा आणि सात खडे घेऊन येते, ज्यांचे घरात स्वागत केले जाते आणि नंतर त्यांची हळदीच्या खांबासोबत विसर्जन केले जाते. गौरीचा पहिला दिवस ‘माहेरवाशीण’ म्हणून गौरींना घरात आणण्याचा असतो. सोबत असणारी मुलं झांजा वाजवत आणि तोंडात पाणी घेऊन वाहत्या पाण्याजवळून खड्यांच्या गौरी घेऊन येतात. पायावर दूध-पाणी घालून आणि तिला ओवाळून घरात घेतलं जातं. पहिल्या दिवशी गौरीला तांदळाची भाकरी आणि भाजीचा नैवेद्य दाखवतात. दुसऱ्या दिवशी गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी गौरीला वडे उसळ करण्याची देखील पद्धत आहे. रात्री गौरीची आरती करतात. गौरी आगमनानंतर रात्री घरोघरी महिला पारंपरिक खेळ खेळतात. गणपतीसोबत विसर्जन केलं जाते.

*दापोलीत सिंहासनी
बसलेल्या गौरीचे पूजन
दापोली तालुक्यात जालगाव येथील खुळे कुटुंब गौराईची सिहासनावर बसवलेल्या मूर्तीचे पूजन करतात. याआधी ही प्रथा परंपरा ते मुंबईत साजरी करत. ही परंपरा यावर्षीपासून ते दापोलीत सुरू करत असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. अंगणातून घरात गौराई आल्यावर श्री गणरायाच्या शेजारी तिचा पाट मांडला जातो. त्याची पूजा केली जाते. भाकरी-भाजी, गोडधोड पदार्थ यासोबतच परंपरेनुसार घावन-घाटल्याचा नैवेद्य, काळ्या भोपळ्याची आणि गवारीच्या शेंगांची मिश्र भाजी करण्याची प्रथा आहे.
----
- rat३१p३.jpg-
P25N88324
गौरी रडवल्याच्या प्रथेप्रमाणे गाणी म्हणताना महिला.

*गौरी रडवल्याची मंडणगडातील परंपरा
मंडणगड तालुक्यात आजही अत्यंत पारंपरिक पद्धतीने गौरी सणाच्या प्रथा जपल्या आहेत. गावातील पाणवठा, वेशीवरील मंदिरातून गौरीचा मुखवटा घेऊन महिला भक्तिभावाने घरी आणतात. या आगमनासाठी माहेरवाशिणी व सासुरवाशिणी रानातून चिरडा गोळा करून सुपात बसवतात. डोक्यावर गौराई घेतलेल्या महिलांसोबत मुले-बाळे, वाजत-गाजत गाण्यांच्या तालावर घरी जातात. घराच्या माळ्यावर गौराईचे आगमन होते. संध्याकाळी गौराईला नवी साडी, दागिने, फुलांनी सजवणे ही परंपरा अजूनही टिकून आहे. पारंपरिक गाणी, ओवसे आणि खेळांनी वातावरण रंगते. नवविवाहित व कुमारिका मुलींचे ओवसे हा सोहळ्याचा खास आकर्षण ठरतो. महिलावर्ग फेर धरून नाचतो, फुगडी, कोंबडा, पिंगा यासारखे खेळ रंगतात. मध्यरात्र उलटल्यावर ‘गौर रडविणे’ ही परंपरा अजूनही कायम आहे. महिला गौरीच्या मुखाकडे एकटक पाहत विरहगीते गातात. या आर्त सुरांमध्ये गौराई खरंच रडते असा भास होतो. हा क्षण सासर-माहेर याचा भावबंध अधोरेखित करणारा ठरतो. विसर्जनाच्या दिवशी गौरीला गोडाचा नैवेद्य दाखवून, केळीच्या पानात पोळ्या बांधून तिची मोठ्या भक्तिभावाने पाठवणी केली जाते.
लवतील आंबे, लवतील जांबे लवत मोंगर जाई
गौराई निघाली सासराला तिला गं आंदण काय..
अशी विरहगीते म्हणत निरोप देण्याची मंडणगड तालुक्यातील ही परंपरा आजही घराघरांत जिवंत असून गणेशोत्सवाच्या उत्साहाला अधिक रंगत आणते.
---
- rat३१p४.jpg-
P25N88325
ओवसे भरलेले सूप

*गौरीपूजनात नववधूंचा ओवसा
गौरीपूजनात कोकणात ओवसा हा नववधूंचा एक पारंपरिक सण म्हणजेच प्रथा संपन्न होते. गौराईचे आगमन पूर्वा नक्षत्रात होते तेव्हा नववधूंचा ‘ओवसा’ हा सण साजरा करतात. यावर्षी ओवसा होणार आहे. विवाहानंतर नववधूला ही संधी लगेचच येणाऱ्या गणेशोत्सवात मिळतेच, असे नाही. मात्र गौरी ज्यावेळी पूर्वा नक्षत्रात येतात, त्यावेळी स्त्रिया हा सण मोठ्या भक्ती भावाने साजरा करतात. पूर्वा नक्षत्रात गौरी येण्याचा योग, हा दोन ते तीन वर्षांनी येतो. ओवसा याचा अर्थ ‘ओवाळणे’ असा आहे. ग्रामीण भागात याला ओवसणे, ववसा असेही म्हटले जाते. ज्येष्ठा किंवा पूर्वा नक्षत्रात ज्यादिवशी गौरीपूजन येत असेल, त्याचदिवशी नवविवाहिता आणि ज्यांचा ओवसा लग्नानंतर वर्षभरात घ्यायचा राहून गेला आहे, अशा सौभाग्यवतीही ओवसा घेऊ शकते. हा ओवसा पाच किंवा दहा सुपांचा असतो.
गौरीच्या दिवशी सुहासिनींकडून ओवसे भरण्याची कित्येक वर्षापासूनची प्रथा आहे. हे ओवसे भरण्यासाठी सुपांची आवश्यकता असते. बांबूच्या सहाय्याने पर्यावरणपूरक सुपे अनेक कुटुंबांकडून तयार केली जात असत. सुपे वळण्याच्या माध्यमातून त्या कारागिराचे हस्तकौशल्य अधोरेखित होत असून अशा कारागिरांना त्या माध्यमातून रोजगारही मिळतो. कालपरत्वे बदल होत बांबूच्या सहाय्याने तयार केलेल्या सुपांसोबत प्लॅस्टिकच्या सुपांचाही वापर केला जात आहे.
---
- rat३१p५.jpg-
25N88326
गौरीचा आकर्षक मुखवटा

*असे तयार होतात गौरीचे मुखवटे
गणपतीच्या मूर्तीप्रमाणे आकर्षक, रेखीव आणि देखण्या गौराईच्या मूर्तीला वा मुखवट्याला भक्तांकडून प्राधान्य दिले जाते. विविध रूपांमधील गौराईची कोरीव नक्षीकाम केलेली पूर्वी लाकडी मूर्ती असायची. सुतारकाम करणाऱ्‍या व्यावसायिकांसह गणेशमूर्ती घडविणारे अनेक कारागीर गौराईचे मुखवटे बनवितात. त्यासाठी जंगली लाकडाऐवजी कोरीव काम करण्यास उपयुक्त ठरणारे शिवण, सागवान यासारख्या झाडांच्या लाकडाचा उपयोग केला जातो. त्यात शिवणीची लाकूड सहज आणि स्वस्त दरात उपलब्ध होते. त्या तुलनेमध्ये सागवानाचे लाकूड उपलब्ध होत असले तरी, त्याची किंमत जास्त असते. त्यामुळे गौरीचा मुखवटा बनविण्यासाठी सागवानाच्या लाकडाऐवजी शिवणीच्या लाकडाला अधिक प्राधान्य दिले जाते. या लाकडावर हस्तकौशल्यातून नक्षीदार कोरीव काम करून गौरीचा मुखवटा तयार केला जातो. काही कारागिरांकडून गौरीचा केवळ मुखवटा (चेहरा) तयार केला जातो. तर, काही कारागीर पूर्ण उभी असलेली गौराई तयार करतात. त्यात लाकडावर केलेल्या नक्षीकामाला अंतिम हात देवून अधिक रेखीवपण वा नजाकत दिला जातो. अनेक दिवस मेहनत घेऊन जिवंतपणा आणलेल्या मुखवट्याला आकर्षक रंगसंगती देवून वैविध्यतता आणली जाते. गौराईच्या या मातीच्या शाडूच्या मातीपासून वा पीओपीच्या असतात. शाडूच्या मातीच्या मूर्ती गणेश चित्रशाळांमध्ये तयार केल्या जातात. बाजारात आता प्लॅस्टिकचेही रेडीमेड गौराईचे मुखवटे उपलब्ध होतात.
---
*गौरीला मटणाचा नैवेद्य
कोकणातील गौरीला मटणाचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. नैवेद्याला मांसाहार करण्याची प्रथा नेमकी कशी आहे आणि कधीपासून चालू आहे याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र, ही परंपरा पूर्वापार चालत आलेली असल्याचे सांगितले जात आहे. हा नैवेद्य दाखविताना गणपतीच्या मूर्तीसमोर तात्पुरता पडदा लावला जातो जेणेकरून गौरीला दाखविलेला नैवेद्य गणपतीला दिसू नये अशी अनोखी श्रद्धा यामागे असते. काही ठिकाणी मांसाहार न करता गोडधोड केले जाते.
---
- rat३१p१९.jpg-
25N88357
पोलादपूर येथे सडवलीतील बुरूड वस्तीत गौरी पूजनासाठी बनवलेली सूपं.
---
कोट १
‘गणराज आर्ट’ या आमच्या गणेश चित्रशाळेमध्ये गेल्या दीडशे वर्षापासून हस्तकौशल्यातून शाडूच्या गणेश मूर्ती घडविल्या जात आहे. त्यासोबत लाकडावर कोरीव काम करून गौराईचे आकर्षक अन् रेखीव मुखवटे आणि मंडपीही तयार करतो. गौराईचा मुखवट्याच्या कोरीव कामासाठी थोडी मेहनत घ्यावी लागते. मात्र, आपल्या हस्तकौशल्यातून घडलेल्या देखण्या गौराईचा मुखवटा भक्त्यांच्या घरच्या गणेशोत्सवाचा आनंद जेव्हा अधिक द्विगुणित करतो तेव्हा खऱ्‍या अर्थाने आपणाला आनंद अन् समाधान मिळते.
- राजेश सागवेकर, गोवळ, राजापूर
----
कोट २
खुळे कुटुंबाची गौराईची परंपरा गेल्या ६० वर्षांपासून चालत आली आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे मागील अनेक दशके आम्हाला मुंबईतच गौराई बसवावी लागत होती. मूळ गावी पिढ्यानपिढ्यांच्या घरात पुन्हा गौराई प्रतिष्ठापित करण्याचा आनंद वेगळा आहे. गावकऱ्यांसोबत ही परंपरा पुन्हा अनुभवायला मिळणार असल्याने आनंद आहे.
- अविनाश खुळे, दापोली
----
कोट ३
गौरी आगमन हा विशेषतः आम्हा महिलांसाठी आनंदाचा आणि भावबंधाचा क्षण आहे. सासर आणि माहेर याचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे. यानिमित्ताने कुटुंब, नातेवाईक आणि जुन्या मैत्रिणी यांची भेट होऊन आठवणीना उजाळा मिळून त्यातून बालपणातील सोनेरी दिवसांचा पूर्वानुभव मिळतो.
- अमिषा शिगवण, मंडणगड
-----
कोट ४
गौरीचा उत्सव तीन दिवसांचा असतो. गौरी हे पार्वतीचे रूप म्हणून ओळखले जाते. काही जण मूर्तीच्या रूपात तर काहीजण तिरड्यांच्या फुलांच्या स्वरूपात गौरी आणतात. घरी आणल्यानंतर तिचा साजशृंगार केला जातो. त्यानंतर रात्री गौरीचा नाच, म्हणजेच फुगड्या खेळल्या जातात. त्या दिवशी कुटुंब एकत्र येते, यामुळे नाती जपली जातात. सासरहून माहेरी आलेली महिला स्वतःला गौराईमध्ये पाहत असते.
– धनश्री पारस पावसकर, पूर्णगड, रत्नागिरी
----
कोट ५
गणपती, गौरी सजावटीसाठी सोनतळ, तिरडा, कवडल, रानफुले असा फुलोरा लागतो. रानातून गोळा करून त्याची आम्ही विक्री करतो. त्याला चांगली मागणी असल्यामुळे विक्री होते. गणपती पूजनाच्या दिवशी आणि आदल्या दिवशी या विक्रीतून सर्वसाधारणपणे नऊ हजार रुपये मिळाले. गौरीच्या अनुषंगानेही फुलोऱ्याची विक्री करत आहोत. गणपती बाप्पा आणि गौराईच्या कृपेने चांगले पैसे मिळाले आहेत.
– मनीषा खांबल, राजापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com