बांदा मार्केटचे रुप बदलले, गोव्यात शोधले ग्राहक ः नव्या संधी शोधून घडविले बदल
द बिग स्टोरी
swt311.jpg
88351
निसर्गाच्या कुशीत विसावलेलं बांदा गाव.
बांदा बाजारपेठेचा उत्कर्ष
बांदा मार्केटचे रूप बदलले
उत्तर गोव्यात शोधले ग्राहक ः नव्या संधी शोधून घडविले बदल
लीड
पूर्वीच्या काळी तळकोकणावर अधिराज्य गाजविणारे शहर म्हणजे बांदा. आदिलाबाद ते बांदा हा शेकडो वर्षांचा या शहराचा प्रवास आणि इतिहास हा थक्क करणारा आहे. शिवकाळात बांदा हे जल वाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र होते. सिंधुदुर्गातील सर्वाधिक वेगाने प्रगती साधणारे शहर म्हणून बांद्याची ओळख निर्माण होत आहे. बाजारपेठ, तसेच शेतमालातून कोट्यवधीची उलाढाल होत असलेले हे शहर सावंतवाडी तालुक्याची आर्थिक राजधानी म्हणूनही ओळखले जाते. सर्व सोयींनी युक्त बाजारपेठेमुळे या शहराला जिल्ह्यात महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. गोव्याचा शेजार लाभल्याने व दर्जेदार उत्पादनांनी युक्त असलेली बांदा बाजारपेठ आज गोवावासीयांना विशेष आकर्षित करत आहे. उत्तर गोव्यातील ९० टक्के ग्राहक बांदा बाजारपेठेत खरेदीसाठी येतात. बांद्याची ऐतिहासिक बाजारपेठ, येथील उत्पादने, ग्राहकांची संख्या, एकूण उलाढाल, भविष्यातील संधी, मार्केटचे बदललेले स्वरूप याचा सविस्तर घेतलेला आढावा...
- नीलेश मोरजकर
......................
‘बांदे’ ते बांदा
इतिहासात बांदा शहराला वेगळे महत्त्व आहे. शहराला बाराव्या शतकापासूनची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. परिसरातील डिंगणेपासून थेट शिरशिंगेपर्यंत ४८ गावांचा बांदा परिसर होता. बाराव्या शतकापासून विजयनगर साम्राज्यात या ४८ गावांच्या महालाचे प्रमुख ठाणे म्हणून शहराला मान्यता मिळाली होती. त्या वेळच्या सुलतानांनी या परिसराची राजधानी म्हणून बांद्याला मान्यता दिली व या परिसराला ‘बांदे महाल’ हे नाव दिले. यापूर्वी या भागाला ‘तळकोकण सुभा’ असेही म्हटले जात असे. देवगिरीच्या दरबारात सापडलेल्या मोडी कागदपत्रांमध्ये या गावाचा ‘बांदे’ असाच उल्लेख आढळतो; परंतु संस्थान काळानंतर या गावाला ‘बांदा’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
मुस्लिम राजवटीच्या काळात बांद्याकडे सत्ताकेंद्र म्हणून पाहिले जायचे. बांदा शहर त्या काळी राजकीय, सांस्कृतिक घडामोडींचे केंद्र होते. या शहराने मुस्लिम, पोर्तुगीज, डच वसाहती जवळून पाहिल्या आहेत. सावंतवाडी संस्थानकाळात या भागाचे ‘बांदा-पेठा’ असे नामकरण झाले व बांद्यास तालुक्याचा दर्जा मिळाला. इतिहास काळापासून बांदा ही समृद्ध बाजारपेठ म्हणून ओळखली जात आहे.
बांदा शहरात आजही सध्याचे पोलिस ठाणे येथे डचांच्या वखारी असून सागरी मार्गाने जगभरातून येणारा संपूर्ण माल येथील वखारीत साठवण्यात येत होता. येथूनच हा माल गोव्यात व स्वराज्यात पाठविला जात असे. पोर्तुगीज आणि मुघल यांच्यात समझोता झाल्याने व्यापाराची देवाणघेवाण इथूनच होत होती. याठिकाणी देशातील नामांकित व्यापारी व्यापार करत असत. त्यामुळे बांदा शहराला व्यापाराची परंपरा शेकडो वर्षांपासूनची आहे. आजही बांदा बाजारपेठेचा वेगाने विस्तार होत असून उद्योग-व्यापाराच्या विविध संधी येथे निर्माण झाल्या आहेत. नजीकच्या गोवा, कोल्हापूर व बेळगाव येथील मार्केटशी तुलना करता बांदा ही छोटी बाजारपेठ असूनही आज मोठी उलाढाल करत आहे. बांदा बाजारपेठेत आज पाचशेहून अधिक व्यापारी आस्थापना आहेत. दर्जेदार कपडे, दागिने, भांडी, काजू उत्पादने, कोकणी मेवा यासाठी ही प्रसिद्ध बाजारपेठ आहे. सण, उत्सव, लग्नसराईसह अन्य धार्मिक कार्यांच्या खरेदीसाठी ग्राहक बांदा बाजारपेठेला पसंती देतात. यामध्ये गोव्यातील ग्राहकांची संख्याही लक्षणीय आहे. दर्जेदार व स्वस्त माल यामुळे ग्राहक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
बाजारपेठेचे नाव
दर्जेदार, स्वस्त मालासाठी प्रसिद्ध
बांदा बाजारपेठ ही शेतीमाल उत्पादनासह दर्जेदार कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या प्रमाणात वस्त्र दालने असून सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी दर्जेदार कपडे उपलब्ध आहेत. गोवा राज्यातील ९० टक्के ग्राहक लग्नबस्ता खरेदीसाठी बांदा बाजारपेठेत येतात. दर्जेदार व उत्कृष्ट मालासमवेतच तुलनात्मकदृष्ट्या स्वस्त माल मिळत असल्याने ग्राहक निश्चिंतपणे खरेदी करतात.
शेतमालामुळे ओळख
दर्जेदार साहित्यासह बांदा बाजारपेठ शेतीमाल व गावठी उत्पादनासाठी देखील प्रसिद्ध आहे. वाल, चवळी, वांगी, कंदवर्गीयातील कनगर, करांडे, भुईमूग, काकडी, लाल भाजी, मुळा, गावठी मिरची, कुळीथ, भेंडी, दोडकी, कलिंगड, केळी, नारळ, सुपारी, आंबा, पपई, ड्रॅगन फ्रुट, व्हिएतनाम फणस यांना ग्राहकांची मोठी मागणी असते. गोव्यातून थेट मडगावपासूनचे ग्राहक गावठी शेतीमाल खरेदी करण्यासाठी बांदा बाजारपेठेत येतात. या माध्यमातून लाखोंची उलाढाल होते.
समस्यांचा वेढा
बांद्यात येणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढतीच असल्याने त्या प्रमाणात ग्राहकांना सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. सर्वांत मोठी समस्या पार्किंगची आहे. ग्राहकांना आपले वाहन घेऊन थेट बाजारपेठेत येता येत नसल्याने त्यांच्या सोयीसाठी सुसज्ज वाहनतळ, स्वच्छतागृह उभारणे आवश्यक आहे.
गोव्याशी ऋणानुबंध
बांदा व गोवा यांचे वेगळे ऋणानुबंध आहेत. गेल्या अनेक पिढ्यांपासून बांदा व गोव्यात रोटी-बेटीचे व्यवहार होत असल्याने ही बाजारपेठ गोव्यात सुप्रसिद्ध आहे. अनेक वर्षांपासूनचे नातेसंबंध असल्याने गोव्यातील ग्राहकांचा बांदा बाजारपेठेकडे कल वाढलेला आहे. बांद्याची कापड बाजारपेठ संपूर्ण गोव्यात परिचित आहे. गोव्यातील पणजी, मडगाव, वास्को या प्रमुख शहरांतील ग्राहक खरेदीसाठी बांद्यात येतात. गोव्यातील ग्राहक संख्या लक्षात घेता बांदा शहरातील व्यापाऱ्यांनी देखील अनेक बदल केले आहेत. मार्केटला आधुनिकतेचा साज असल्याने व्यापाऱ्यांनी देखील काळानुरूप बदल स्वीकारलेला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘मॉल’ सुद्धा मागे पडतील, अशा पद्धतीने वस्त्रदालनांची निर्मिती करण्यात आली आहे. लग्नाच्या कपडे खरेदीसाठी विविध सवलती, तसेच प्रत्येक कुटुंबाला कपडे निवडण्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहक विशेष आकर्षित होत आहेत. कोल्हापूर, बेळगावच्या तुलनेत बांदा ही पर्यायी व मोठी बाजारपेठ उपलब्ध झाल्याने वर्षभरात लाखो गोवेकर खरेदीसाठी बांद्यात येतात.
सुरक्षित व्यापारी पेठ
बांदा ही काजूसाठी सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी काजूवर प्रक्रिया करणारे कारखाने आहेत. त्यामुळे बांदा बाजारपेठेत उत्तम दर्जाचा काजू मिळतो. येथील काजूला देश-विदेशांत मागणी असल्याने बांदा ही काजूची बाजारपेठ म्हणूनही प्रसिद्ध आहे. बांदा परिसरातील १६ हजार ९४२ हेक्टरवर काजूची लागवड होते. लगतच्या दोडामार्ग तालुक्यात २९४७ हेक्टरवर काजूचे उत्पादन घेण्यात येते. त्यामुळे बांदा बाजारपेठेत काजू बी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. बांदा शहर, तसेच परिसरात काजूवर प्रक्रिया करणारे लघु व मध्यम उद्योग असल्याने या ठिकाणीच बियांवर प्रक्रिया होऊन हा काजू विक्रीसाठी उपलब्ध होतो. त्यामुळे हंगामात, तसेच या काजूमधून वर्षभरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. येथील काजू उत्तम प्रतीचा व चविष्ट असल्याने त्याला अधिक मागणी असते. त्यामुळे काजू खरेदीसाठी बांदा ही ग्राहकांसाठी चांगली बाजारपेठ ठरत आहे. काजूसमवेतच कोकम, सुपारी, नारळासाठी बांदा ही चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्रासह परराज्यांतील मोठे व्यापारी बांदा बाजारपेठेतून शेतमाल खरेदी करतात. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून दर्जेदार माल देणारी बांदा ही सुरक्षित व्यापारी पेठ म्हणून ओळखली जाते.
चौकट
बांदा शहरातील प्रमुख आस्थापना
कापड व्यावसायिक - ७० ते ८०
सुवर्णकार - २०
हॉटेल्स व स्नॅक सेंटर - ६० ते ७०
भांड्यांची दुकाने - १०
इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल रिपेअरिंग - १५
किराणा/भुसार दुकाने - ५०
टेलरिंग - २५
बेकरी - १५
स्टेशनरी - १५
बँगल्स - २५
आईस्क्रीम पार्लर व कोल्ड्रिंक - ४०
गॅरेज - २० ते २५
............................
swt312.jpg
88352
साईप्रसाद काणेकर
कोट
बांदा बाजारपेठ ही काजूसाठी प्रसिद्ध आहे. बांदा दशक्रोशीतील काजूचा दर्जा हा देशात सर्वोत्तम आहे. त्यामुळे देशातील कारखानदार काजू खरेदीसाठी बांदा बाजारपेठेला प्रथम प्राधान्य देतात. गोव्यातील जुने, तसेच परंपरागत काजू बागायतदार हे येथील व्यापाऱ्यांशी असलेले नातेसंबंध, तसेच विश्वास यामुळे काजू बीची बांदा बाजारपेठेत विक्री करतात. बांदा बाजारपेठेतील काजू हा अव्वल मानांकित आहे.
- साईप्रसाद काणेकर, ग्रामपंचायत सदस्य तथा काजू व्यापारी, बांदा
swt313.jpg
N88353
राजाराम धारगळकर
कोट
बांदा ही दर्जेदार कपड्यांसह सुवर्णालंकरांसाठी देखील प्रसिद्ध आहे. याठिकाणी अप्रतिम व विविध कलाकुसरीच्या दागिन्यांची घडणावळ होते. गोव्यातील महिला ग्राहकांना हे दागिने प्रिय आहेत. त्यामुळे त्यांची पसंती ही बांदा बाजारपेठेतील सुवर्ण पेढ्यांना असते. बांदा ही वेगाने विकसित होणारी बाजारपेठ असल्याने भविष्यात याठिकाणी मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
- राजाराम ऊर्फ आबा धारगळकर, सुवर्णकार तथा उपसरपंच, बांदा
swt314.jpg
88354
रुपाली शिरसाट
कोट
बांदा बाजारपेठेचे सिंधुदुर्ग व गोव्यातील ग्राहकांत असलेले महत्त्व अनन्यसाधारण आहे. गावठी शेतमाल व दुर्मीळ, नैसर्गिक भाज्या केवळ बांदा बाजारपेठेतच उपलब्ध होत असल्याने यासाठी गोव्यातील ग्राहक विशेष आकर्षित होतात. गोव्यात काही न मिळणारी औषधेही बांद्यात मिळत असल्याने मडगाव, पणजी येथून देखील ग्राहक बाजारपेठेत येतात.
- रुपाली शिरसाट, ग्रामपंचायत सदस्य बांदा, भाजप बांदा मंडल महिला अध्यक्ष
swt315.jpg
N88355
प्रियांका नाईक
कोट
बांदा ही सर्वार्थाने सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. प्रतिवर्षी लाखो ग्राहक बाजारपेठेला भेट देऊन खरेदी करतात. या बाजारपेठेला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. दिवसेंदिवस शहरीकरण होत असल्याने वाहनांची संख्या देखील वाढत आहे. भविष्यात बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांना कशा पद्धतीने सुविधा पुरविण्यात येतील, याबाबत शहरातील व्यापाऱ्यांशी चर्चा करून या सुविधा पुरविण्याबाबत बांदा ग्रामपंचायत प्रशासन प्रयत्नशील राहील.
- प्रियांका नाईक, सरपंच बांदा
swt316.jpg
88356
मंदार कल्याणकर
कोट
बांदा ही घाऊक व किरकोळ व्यापार पेठ म्हणून प्रसिद्ध आहे. सुवर्णालंकार, कपडे, किराणा, सिमेंट, फटाके मोठ्या संख्येने सहज उपलब्ध होतात. येथील व्यापारी हे व्यवसायाभिमुख आहेत. येथील व्यापाऱ्यांनी पिढ्या न् पिढ्या आपला व्यवसाय जपला आहे. बाजारपेठेला ऐतिहासिक संदर्भ असले, तरीही नवउद्योजकांनी नावीन्यपूर्ण गोष्टी अमलात आणून आपला व्यवसाय ‘ग्लोबल’ बनविला आहे. त्यामुळे तेथील बाजारपेठेला गोव्यातील ग्राहकांची पहिली पसंती असते. ज्या नावीन्यपूर्ण संकल्पना व बदल जागतिक बाजारपेठेत येतात, त्या बांद्यातही तत्काळ सहज मिळत आहेत. भविष्यात बांदा बाजारपेठेला प्रचंड संधी उपलब्ध आहेत. मात्र ज्या काही समस्या आहेत, त्या व्यापारी बांधव स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्यावर भर देत आहेत.
- मंदार कल्याणकर, कापड आणि बांधकाम व्यावसायिक, बांदा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.