खड्यांची गौर गोजीरी, देवीचं मनुष्यीकरण

खड्यांची गौर गोजीरी, देवीचं मनुष्यीकरण

Published on

- rat३१p२६.jpg, rat३१p२७.jpg-
२५N८८३७८, २५N८८३७७
खडे आणि सुपारीच्या सुबक रंगवलेल्या गौरी.
----

कोकणातील खड्यांची गौर गोजीरी, देवीचं मनुष्यीकरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ ः मुखवट्यांच्या गौरी मानवनिर्मित असल्याने त्यांच्यात जेवढी विविधता असते तेवढी खड्यांच्या गौरींमधे नाही. नैसर्गिकरित्या काय असेल तेवढीच. लेखिकेच्या लहानपणी हे खडे निवडण्याचं काम तिच्याकडे होतं. मग पंधरा दिवस आधीपासून ती परिसरातले असे छान दहा पंधरा गुळगुळीत दगड हेरुन विहिरीजवळ किंवा रामकुंडी नावाची उपविहिर होती तिथे जमा करुन ठेवायची. जाता येता त्यांना बजावायचे की आता कितीही पाऊस पडला तरी इथुन वाहून जाऊ नका. स्थिर राहिलात तरच देवत्व मिळेल, नाहीतर नशीबातला दगडपणा तसाच राहील.....आजच्या गौरीसणाच्या निमित्ताने...!
- संध्या साठे-जोशी, चिपळूण
-----
मोदक उकडीचे की तळलेले?
गौरी उभ्या की बसलेल्या?
गौरी मुखवट्यांच्या की खड्यांच्या?
घावनघाटलं की पुपो?
गणपतीचे दिवस आले की अशा असंख्य प्रश्नांना अंकूर फुटतात..सध्या समाजमाध्यमावर अधिकच. आपले सगळे सण हे निसर्गाशी जवळीक राखण्याच्या हेतूने निर्माण केले गेले आहेत त्याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष होतं.
कहाण्यांच्या पुस्तकात ज्येष्ठागौरीच्या कहाणीत खूप छान वर्णन केलंय. भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं, दोन खडे आणावे, उन पाण्याने त्यांना न्हाऊ घालावं, ज्येष्ठागौर आणि कनिष्ठागौर म्हणून त्यांची स्थापना करुन पूजा करावी. दुसरे दिवशी घावनगोडे, तिसरे दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा. सव्वाष्णीची ओटी भरावी, जेवू घालावं. संध्याकाळी हळदीकुंकू वाहून गौरींची बोळवण करावी म्हणजे अक्षय सुख लाभेल.
शहरीकरण वाढलं, निसर्गापासून माणूस दूर गेला. पण प्रथा कायम राहिल्या. म्हणजे त्या जगन्नियंत्याने सृष्टी निर्माण केली, त्यात माणूस निर्माण केला त्याच माणसाने नंतर देवाचं मनुष्यीकरण केलं. आपल्याला भावलेले, आवडलेले रुप-गुण त्याला बहाल केले.
त्यातुनच मग कधीतरी पूर्वी साधे खडे असणा-या गौरींना चेहरे मिळाले. आपापल्या आर्थिक, सामाजिक, भौगोलिक परिस्थितीनुसार दागिने आणि वस्त्रप्रावरणे मिळाली. नैवेद्यासाठी त-हेत-हेचे पदार्थ होऊ लागले. कोकणस्थ मात्र खड्यांच्या परंपरेला आजतागायत चिकटून राहिले आहेत. फक्त ज्येष्ठा, कनिष्ठा या दोन खड्यांऐवजी कुलदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता असं करीत करीत खड्यांची संख्या सातवर येऊन पोचली.
कोकणात पाण्याच्या ठिकाणी जलदेवतांचं वास्तव्य आहे असं मानतात. त्यांना आसरा असं म्हणतात आणि त्यांची संख्या सात आहे. कदाचित सात खडे आणण्यामागे हा संदर्भ असू शकेल. खड्यांच्या गौरींमधे नैसर्गिकरित्या असेल तेवढीच विविधता. पण आता खड्यांच्या गौरींमधेही विविधता चिपळूणचा वास्तूविशारद सागर मोहिते याच्या जादुई हातांनी आणली आहे. वाशिष्ठीतील गुळगुळीत गोटे दगड आणि सुपाऱ्या यांचा वापर करुन एका कोकणस्थ कुटुंबासाठी त्याने या गौरी तयार केल्या होत्या. दगड आणि सुपाऱ्यांना त्याने आधी स्त्रीत्व आणि मग देवत्व प्राप्त करुन दिलं आहे. या खड्यांच्या गौरी नीट पाहिल्यात तर लक्षात येईल की त्याने किती बारकाईने आणि सुक्ष्म विचार केला आहे. पूर्वी स्त्रिया मांडी घालून बसतांना एक पाय उभा आणि एक पाय मुडपून बसत असत.
पूर्वी लुगडं आणि चोळी यांचं मॅचिंग असायचं म्हणजे लाल लुगड्यावर हिरवी चोळी, पिवळ्यावर निळी वगैरे. ते अगदी परफेक्ट साधलं आहे. शिवाय नथ, बुगड्या, गळेसर, भाळावरची चंद्रकोर हे अलंकरणही अप्रतिम झाले आहे. नुसतं कलाकृती म्हणून या मूर्तींकडे बघितलं तरी प्रत्येक गौरीची वेशभूषा, केशभूषा आणि चेहऱ्यावरचे भाव यातलं वैविध्य दिसून येते.
असं वाटतं की सगळ्या गोलाकार बसल्या आहेत. मध्ये परात आहे, परातीत सालंकृत देवी आहे आणि आता या बोडण भरायला सुरुवात करतील. (बोडण हा कोकणस्थांचा देवीशी संबंधित एक कूळाचार आहे) क्षणभर मला असाही भास झाला की १८९३ वगैरे वर्ष चालू आहे.
काहीतरी सणवार आहे. दुपारची जेवणं झाली आहेत आणि गावातल्या रमाकाकू, उमाकाकू, गंगाकाकू, पार्वतीकाकू, राधाकाकू,
जानकीवैनी, अंबूवैनी एकत्र जमल्या आहेत. आता कुठल्याहीक्षणी त्या सारीपाटाचा पट मांडतील, फासे खुळखुळवतील आणि कवड्यांचा खेळ सुरू करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com