जपुया बीज वारसा

जपुया बीज वारसा

Published on

जपुया बीज वारसा---------लोगो

(२६ ऑगस्ट टुडे ३)

कोकणात गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर नांगरणीला सुरुवात करून जमिनीच्या मशागतीची कामे अक्षयतृतीयेपर्यंत पूर्ण केली जातात. त्यानंतर बीजपूजन करून परसबागेत आळे करून लावायच्या बियाणांची, मुख्यतः घेवडा, दोडका, घोसाळी अशा भाज्यांच्या बियाणांची पेरणी केली जाते. जून महिन्यात पाऊस सुरू झाला की पुढे चार महिन्यांत येणाऱ्या विविध सणांचा विचार करून भोपळा, मका, चिबूड, तवशी, काकडी, पडवळ, भेंडी, मुळा, लाल माठ, राजगिरा यासारख्या भाज्या लावल्या जातात. या भाज्यांची स्थानिक पातळीवरील बियाणी पेरली जातात. परसबाग हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे त्या परस्परांमध्ये या भाज्यांच्या बियाणांची देवाणघेवाण करतात आणि तयार झाल्यावर भाज्या एकमेकींना दिल्या जातात.
- rat१p४.jpg-
25N88617
- कुणाल अणेराव, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, सृष्टिज्ञान संस्था
-------
कोकणातील परसबागेतील
पारंपरिक लागवड

अक्षयतृतीयेच्या दिवशी बियाणी पेरल्यानंतर पुढच्या महिन्याभरात अंगणात मांडव बांधायला घेतले जातात. त्यावर वेळी भाज्या चढवायला सुरुवात केली जाते. पावसाळा सुरू झाला की जोमाने वाढलेले वेल बहरू लागतात आणि या मोसमी भाज्या मिळायला सुरुवात होते. पाऊस सुरू झाला की जैवविविधतेने संपन्न अशा सह्याद्रीच्या कुशीत विविध रानभाज्या येण्यास सुरुवात होते. शेवळं, टाकळा, करटुली, अळिंबी, केनी, कुर्डू, भारंगी, कुळू, घोळ, कवळा, फोडशी, काकडा, तेरअळू, मुलेंढी, थरमरा, आकूर, भोपळ्याचा पाला व फुले, अगस्ता किंवा हादग्याची फुले, बांबूचे कोंब अशा कितीतरी भाज्या मिळायला सुरुवात होते.
साधारणतः पहिल्या पावसानंतर सुरू झालेला रानभाज्यांचा हंगाम ऑक्टोबरपर्यंत चालू राहतो. आपल्या नेहमीच्या आहारात समावेश असलेल्या भाज्या मुख्यतः शेतात रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरून पिकवल्या जातात. मात्र रानभाज्या या नावाप्रमाणेच रानावनात, माळरानावर, शेतांच्या बांधांवर निसर्गतःच उगवून येतात. प्रत्येक ऋतूनुसार निसर्गात उगवून येणाऱ्या भाज्यांचे सेवन करणे हा आपल्या आहारसंस्कृतीचा भाग आहे. जसे की-श्रावणी सोमवारचा उपास सोडायला कवळा भाजी, संपत शनिसाठी केनी-कुर्डूची भाजी, गोकुळाष्टमीला शेवग्याच्या पाल्याची भाजी अशा त्या दिवशी त्या भाज्या खाल्ल्या जातात आणि त्यांचे महत्त्वही घरातील व्यक्तींच्या मनात ठसते. आजही पावसाळा सुरू झाल्यावर कुडाच्या शेंगांची भाजी आवर्जून बनवली जाते आणि ती कडू असली तरी घरातील सर्व सदस्यांना खावी लागते. कारण गढूळ पाण्यामुळे होणाऱ्या पोटातील जंतूसंसर्ग कमी करण्याची ताकद कुड्याच्या शेंगामध्ये आहे, हे परंपरेने लोकांना माहिती आहे.
वर्षा ऋतूमधील आरोग्याच्या स्थितीनुसार शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांची पूर्तता रानभाज्यांच्या सेवनातून पूर्ण होते. रानभाज्यांमध्ये असलेले तंतुमय पदार्थ अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात आणि आपल्या शरीरातील चयापचय क्रिया सुरळीतपणे चालू राहते. या भाज्या अनेकदा निवडायला किचकट, चवीलाही कडू-तुरट असल्याने खाण्यासाठी पसंत पडत नाहीत. बाजारात या भाज्या उपलब्ध झाल्या तरी या स्वच्छ कशा कराव्या, कशा शिजवाव्या हे माहीत असणारे खूप कमी लोक आहेत. म्हणून रानभाज्या या नेहमी ओळखीच्या आणि खात्रीलायक भाजीवाल्यांकडून घ्याव्यात. रानभाजी योग्य प्रकारे स्वच्छ धुवून मगच वापरावी.
रानभाज्या सेवनाचे हे फायदे असले तरीही वर्षातून एकदाच मिळणाऱ्या या भाज्यांचे प्रमाणही आता कमी होत चालले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे रानभाज्यांचा अधिवास असलेले रान, माळरान, वनक्षेत्र, शेतजमीन हे कमी होत चालले आहेत.
रानभाज्यांना मिळत असलेल्या चांगल्या किमतीमुळे रानभाज्या कशाही उपटून, ओरबाडून बाजारात आणल्या जातात. त्यामुळे अनेकदा या भाज्यांचे जीवनचक्र पूर्ण होत नाही. या सर्वांचा परिणाम रानभाज्यांच्या उपलब्धतेवर झाला आहे. रानभाज्या ओळखणारे आणि जंगलात फिरून त्या गोळा करणारे माहीतगार लोकही कमी होत आहेत. त्यामुळे रानभाज्या खाण्याचे प्रमाण वाढविण्याच्या बरोबरीने रानभाज्यांच्या अधिवासांचे संरक्षण होणे आणि त्याबद्दल लोकांमध्ये जाणीव-जागृती होणे आवश्यक आहे.
(लेखक स्वत: शेतकरी असून आदिम बियाणी संवर्धन करत आहेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com