तेंडोली-तांबाडगेवाडी कॉजवे पाण्याखाली

तेंडोली-तांबाडगेवाडी कॉजवे पाण्याखाली

Published on

88625

कॉजवे की जलक्रीडा केंद्र?
तेंडोली-तांबाडगेवाडी येथील ग्रामस्थांसाठी पावसाळी साहस मोफतच
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ः कुडाळ तालुक्यात तेंडोली-तांबाडगेवाडीला जाणारा कॉजवे परत एकदा पाण्याखाली गेला. ग्रामस्थ म्हणतात, ‘पावसाळा आला की आमचा रस्ता पाण्यात जातो.’ पण प्रत्यक्षात पाहिलं तर हे ग्रामस्थ खरे भाग्यवानच ! इतरांना स्विमिंग पूल, वॉटरपार्कसाठी पैसे खर्च करावे लागतात; पण इथं मात्र निसर्ग स्वतःहून ‘फ्री वॉटर अॅडव्हेंचर’ ची सोय करतो. विद्यार्थ्यांना शाळेत जायचं तर, गृहपाठासोबत ‘पाणबुड्यांचा सराव’ ही होतो. ग्रामस्थांना वैद्यकीय उपचार हवे असतील तर आधी ‘नदीच्या पाण्यातून आरोग्य तपासणी’ पार करावी लागते. नऊ लाख खर्च करून बांधलेला हा कॉजवे आता पर्यटन स्थळ ठरत चाललाय. ‘पावसाळी सेल्फी पॉइंट’ म्हणून त्याला सरकार मान्यता देईल का, असा प्रश्न लोक विचारू लागले आहेत.
दरवर्षी ग्रामस्थ मागणी करतात – ‘कॉजवेची उंची वाढवा.’ पण प्रशासन मात्र म्हणतं – ‘उंची कमीच राहू द्या, नाहीतर पुढच्या वर्षी बातमी कशावर लिहिणार?’
सखल भागात असलेला हा कॉजवे सतत पाण्याखाली जात असल्याने वाहतूक वारंवार बंद होते. थोड्याशी पावसाने देखील या कॉजवेवर पाणी येते. दोन-तीन दिवस पाणी कमी होत नाही. रविवारी (ता. ३१) कॉजवेवर पाणी आल्याने वाहतूक बंद होते. त्यामुळे ऐन गणेशोत्सव काळात वाडीतील लोकांचा गावाशी संपर्क तुटला. कॉजवेवर पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली आहे. या कॉजवेची उंची वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थ वारंवार करीत आहेत.
संततधार पावसामुळे येथून वाहणाऱ्या उज्ज्वला नदीचा प्रवाह वाढला आहे. या पाण्यातून वाहून आलेले लाकडी ओंडके, झाडी, नारळाची झावळे कॉजवेला अडकली आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रवाह कॉजवेवरून जोरात सुरू आहे. दरवर्षी पावसाच्या दिवसात या वाडीतील लोकांचा गावाशी असलेला संपर्क तुटतो. तेंडोली-तांबाडगेवाडीत सध्या पंचवीस-तीस घरांची लोकवस्ती आहे. त्यामुळे ग्रामस्थांची आणि शालेय विद्यार्थ्यांची या पुलावरून सतत ये-जा सुरू असते. कॉजवेवर पाणी आल्यावर ग्रामस्थांना आपली वाहने कॉजवेच्या अलीकडे रस्त्यावर उभी करून ठेवावी लागतात. त्यामुळे पावसाळ्यात वैद्यकीय किंवा अन्य कामांसाठी मोठी कसरत करावी लागते. सध्या गणेशोत्सव सुरू असतानाच हा कॉजवे पाण्याखाली गेल्याने गणेशभक्त व ग्रामस्थांची गैरसोय निर्माण झाली.
तेंडोली-तांबाडगेवाडीत जाण्यासाठी नऊ-दहा वर्षांपूर्वी साधारण ९ लाख ९६ हजार रुपये खर्च करून नवीन कॉजवे बांधला होता. त्यामुळे ग्रामस्थांना वाहतूक करणे सोयीचे जात होते; परंतु त्याची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात थोडा पाऊस पडला तरी त्यावर पाणी येते. या कॉजवेची उंची वाढविणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी पावसाळ्यात या कॉजवेचा एका बाजूचा काही भाग खचला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी तात्पुरती डागडुजी केली होती. या साकवाचे लोखंडी खांब व पत्रे पूर्ण गंजले असल्याने कधीही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कॉजवेची पुनर्बांधणी करून उंची वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com