''मांडावरचा गणपती'' जपतोय परंपरा

''मांडावरचा गणपती'' जपतोय परंपरा

Published on

swt12.jpg
88627
वेत्ये वरचीवाडीतील गावकर कुटुंबीयांचा श्री गणेश

‘मांडावरचा गणपती’ जपतोय परंपरा
वेत्ये-वरचीवाडीचा उत्सवः ग्रामस्थांच्या एकोप्याचे दर्शन
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. १ः वेत्ये वरची गावकरवाडी येथील अकरा गावकर कुटुंबियांचा मानाचा ‘मांडावरचा गणपती’ म्हणून गावात प्रसिद्ध असलेल्या उत्सवाची परंपरा गावकर कुटुंबासह वाडीतील ग्रामस्थ पिढ्यानपिढ्या जपतानाच एकोप्याचेही दर्शन घडवितात.
वेत्ये गावकरवाडीतील गावकर कुटुंबियांचा हा गणपती दरवर्षी सात दिवसांचा असतो. त्यामुळे वाडीतील इतरही ५१ घरगुती गणपतींचे सुद्धा मांडावरच्या गणपतीसोबत सात दिवस मनोभावे पूजन केले जाते. या वाडीत जवळजवळ २५० लोकसंख्या असून येथील सर्व कुटुंबे गुण्यागोविंदाने राहतात. दिवसेंदिवस लुप्त होत चाललेल्या चालिरीती गावातील गावकर कुटुंबीय व इतर समाजातील कुटुंबे जपत मोठ्या उत्साहात गणेश चतुर्थी सण साजरा करतात.
गणेश चतुर्थी दिवशी सर्वप्रथम या वाडीतील गावकर कुटुंबियांच्या घरी (मांडावर) श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजन केले जाते. त्यानंतर वाडीतील इतर ठिकाणी घरातील मंडळी विधिवत श्री गणेशाचे मनोभावे पूजन करतात. या वाडीत जवळजवळ ५१ घरगुती श्री गणेशांचे पूजन केले जाते. सातही दिवस दुपारी आरती, महानैवेद्य, सायंकाळी भजन, फुगड्या आदी कार्यक्रम केले जातात.
गौरी पूजन (ओवसा) हा पाच, सहा किंवा सातव्या दिवशी केला जातो; मात्र वेत्ये वरची वाडीतील गावकर कुटुंबियांचा ओवसा गणपतीच्या पाचव्या दिवशीच साजरा केला जातो. या दिवशी गावकर कुटुंबियांच्या व इतर समाजातील सुहासिनी महिला एकत्र येत हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करतात. गौरी विसर्जनानंतर सायंकाळी सर्व गावकर कुटुंबांसोबत इतर ५१ कुटुंबांतील महिला भाकरी व शेवग्याच्या पाल्याची भाजी हा प्रसाद मांडावर एकत्र येत सर्वांना वाटप करतात.
सातव्या दिवशी गणपती विसर्जनावेळी मूळ मांडावर गावकर कुटुंबियांच्या घरी वाडीतील सर्व कुटुंबांकडून आपापल्या परीने साहित्य एकत्रित करून येथे महानैवेद्य बनवून तो येथील वाडीतील घराघरातील गणरायाला दाखविला जातो. मांडावार महाप्रसादाचे वाटप केले जाते. वाडीतील इतर कुटुंबांचा नवसाचा प्रसाद मांडावर एकत्रित करून विसर्जनानंतर सर्वांना वाटप केला जातो. विसर्जनावेळी वाडीतील कुटुंबातील सर्व गणपती एकत्र येतात. मांडावरचा मानाचा गणपती आल्यानंतरच इतर गणपतींचे विसर्जन केले जाते. मानाचा गणपती आल्यानंतर विसर्जन कुंडाजवळ देवापुढे गाऱ्हाणे, नवस फेडणे, बोलणे आदी कार्यक्रम करून एकत्रित आरती केली जाते, त्यानंतर नामघोष करत मांडावरच्या गणपतीसोबत सर्व गणपतींचे विसर्जन केले जाते. विसर्जन झाल्यावर परत गावकर कुटुंबीय व वाडीतील ग्रामस्थ या मांडावर एकत्रित येऊन प्रसाद वाटप करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com