आरोग्य विभागाकडून गणेशोत्सवात विशेष मोहीम
आरोग्य विभागाकडून गणेशोत्सवात विशेष मोहीम
९८८ जणांवर उपचारः रेल्वे, बस स्थानकांसह चेकपोस्टवर प्रवाशांची तपासणी
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १ : गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांच्या माध्यमातून साथरोगाचा फैलाव होऊ नये यासाठी जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेने विशेष मोहिम राबवली. २३ ते २६ ऑगस्टदरम्यान रेल्वे स्थानके, बस स्थानके व चेकपोस्टवर नियुक्त वैद्यकीय पथकांनी तब्बल ९८८ साथीचे रुग्ण शोधून त्यांच्यावर तात्काळ उपचार केले. ताप असलेल्या ६९ रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली.
जिल्ह्यातील अनेक नागरिक रोजगारानिमित्त बाहेरगावी वास्तव्यास असतात. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे नागरिक एसटी किंवा रेल्वेने मोठ्या संख्येने जिल्ह्यात परततात. त्यामार्फत साथरोग येऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून ही पथके नियुक्त केली होती. कणकवली, सावंतवाडी रोड, वैभववाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग या रेल्वे स्थानकांसह मालवण, वेंगुर्ले, कणकवली, देवगड, सावंतवाडी, कुडाळ बस स्थानके आणि आंबोली, फोंडाघाट, खारेपाटण, दोडामार्ग-करूळ या चेकपोस्टवर अशी एकूण १६ ठिकाणी तपासणी पथके कार्यरत होती. या पथकांमार्फत २३ ते २६ ऑगस्ट या कालावधीत सर्दी-खोकल्याचे ४११, तापाचे ७०, अतिसार-हगवणाचे ३३ आणि इतर किरकोळ आजारांचे ४७४ असे मिळून ९८८ रुग्ण तपासले गेले. प्रत्येक रुग्णाची माहिती संकलित करून ते कोणत्या गावी जाणार व किती दिवस राहणार याबाबत नोंद करण्यात आली. त्यानुसार संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपचार व आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
-------------
कोट
गणेशोत्सव काळात दाखल झालेल्या चाकरमान्यांकडून जिल्ह्यात साथरोग पसरू नये, यासाठी आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. नागरिकांनी तापाची किंवा इतर लक्षणे जाणवताच तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून उपचार घ्यावेत.
- डॉ. सई धुरी, जिल्हा आरोग्य अधिकारी
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.