वादळी वातावरणामुळे मासेमारीवर परिणाम

वादळी वातावरणामुळे मासेमारीवर परिणाम

Published on

वातावरणामुळे मासेमारीवर परिणाम
बाजारात मासळी अत्यल्प; दर वधारल्या मार्केटमध्ये शुकशुकाट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ ः वातावरणातील बदलामुळे समुद्र खवळलेला असून अनेक नौका मासेमारीसाठी जाऊ शकलेल्या नाहीत. मात्र ज्या नौका समुद्रात मासेमारीसाठी गेल्या, त्यांना पुरेशी मासळी मिळालेली नाही. मासळी कमी असल्याने दर कडाडले आहेत. त्यामुळे रत्नागिरीतील मासळी मार्केटमध्ये शुकशुकाट होता.
पावसाळी मासेमारी बंदी १ ऑगस्टला संपल्यानंतर नौका समुद्रात जाऊ लागल्या. पुढील काही दिवसांतच हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिला होता. त्यामुळे नौका बंदरातच उभ्या होत्या. धोक्याचा इशारा संपल्यानंतर मासेमारी नौका समुद्रात जाऊ लागल्या, तेव्हा वातावरण बिघडलेलेच होते. उंचच उंच लाटा उठत असल्याने मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांची जाळींचे नुकसान होते. जाळ्यात मासळी मिळण्याऐवजी, त्या जाळ्यांनाच पीळ बसून ती फाटली जातात. अशी जाळी दुरुस्त करण्यासाठी हजारो रुपये खर्च येतो. पर्यायाने मासेमारी सध्या फारच कमी झाली आहे. समुद्रातील मासे खाणाऱ्या केंड माशाव्यतिरिक्त इतर चविष्ट मासळी फारच कमी प्रमाणात मिळत आहे. हा केंड मासा फिशमिल कंपन्यांना विकला जातो. लेप जातीचा मासा मात्र बऱ्यापैकी मिळत होता, असे मच्छीमारांनी सांगितले.
खवय्यांना आवडणारी मासळी मिळालीच नसल्याने मार्केटमध्ये आलेल्या माशांचे दर चढे होते. त्यामध्ये पापलेटचा किलोचा दर १ हजार रुपये इतका होता. लहान सुरमई ६०० रुपये किलो दराने मिळत होत्या. बांगडा १३० ते १५० रुपये तर सौंदाळा आकारानुसार ३०० ते ३५० रुपये दराने विकला जात होता. लहान कोळंबीचा १ किलोचा दर २५० रुपये तर मोठ्या कोळंबीचा दर ४०० रुपये इतका होता. त्यामुळे खवय्यांची मासळी मार्केटमध्ये फारच कमी गर्दी होती.
-------
चौकट
सरंगा गायब
सरंगा किंवा हलवा खवय्यांच्या आवडीचा मासा रत्नागिरीतील मासळी मार्केटमधून गायब होता. हाच मासा पंधरा दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात मिळाला असल्याने दरही कमी होते, असे मच्छी व्यावसायिक महिलांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com