पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरुक रहा
swt125.jpg
88741
आरोसबागः येथे पक्षी निरीक्षण करताना अभिनेत्री दिया मिर्झा, विवेक मेनन, प्रवीण सातोसकर व अन्य.
swt126.jpg
88742
आरोसबागः येथे कॅमेऱ्यात कैद केलेला तिबोटी खंड्या.
पर्यावरण, वन्यजीव संरक्षण या संवेदनशील विषयावर जागरुक रहा
अभिनेत्री दिया मिर्झाः आरोसबागमध्ये पक्षी निरीक्षणात सहभाग घेत स्थानिकांशी साधला संवाद
नीलेश मोरजकरः सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १ः कोकणातील निसर्ग, दुर्मिळ वनस्पती, पक्षी, वन्यजीवन हे खरोखरच अवर्णनीय व अद्भुत असून स्थानिकांनी पर्यावरणीय व वन्यजीव संरक्षण यासारख्या संवेदनशील व महत्त्वाच्या विषयांवर जागरूकता दाखवावी. जगातील अनेक दुर्मिळ पक्षी प्रजातींची नोंद ही कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली असून हे येथील समृद्ध पर्यावरण रक्षणाचे ज्वलंत उदाहरण असल्याची प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण सद्भावना राजदूत तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री दिया मिर्झा हिने दिली आहे. बांदा परिसरातील आरोसबाग गावात तब्बल दोन तास तिने पक्षी निरीक्षण करत स्थानिकांशी पर्यावरण रक्षणाबाबत संवाद साधला.
दिया मिर्झा या हिंदी फिल्म अभिनेत्री असून २००० मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत ‘मिस एशिया पॅसिफिक’ हा किताब मिळविला आहे. त्या संयुक्त राष्ट्राची पर्यावरण सद्भावना राजदूत आहेत. भारताच्या पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनच्या क्षेत्रातील त्या प्रमुख व्यक्ती आहेत. हवामान बदल, स्वच्छ हवा, स्वच्छ समुद्र आणि वन्यजीव संरक्षण यासारख्या महत्वाच्या पर्यावरणीय समस्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी त्या काम करत आहेत. त्यांना पर्यावरणाबाबत विशेष रुची असून वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाची त्या अधिकृत ब्रँड ॲम्बेसिडर आहेत. भारतातील पर्यावरणाचे रक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देणे हे तिचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी त्या संपूर्ण भारत देशात काम करत आहे.
पर्यावरण जनजागृती कार्यक्रमासाठी त्या गोव्यात आल्या होत्या. यावेळी त्यांनी कोकणात पक्षी निरीक्षण तसेच कोकणच्या स्वर्गीय निसर्गाची जवळून अनुभूती घेण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासोबत वाईल्ड लाईफ अभ्यासक व ‘इंडियन मॅमल्स’ या पुस्तकाचे लेखक विवेक मेनन हे होते. बांदा येथील निसर्ग अभ्यासक व पक्षी निरीक्षक प्रवीण सातोसकर यांच्याशी त्यांनी संपर्क साधत पक्षी निरीक्षणाची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
आज सकाळीच त्यांनी बांद्यात येत परिसरातील आरोसबागमध्ये पक्षी निरीक्षणाचा आनंद घेतला.
श्री. सातोसकर यांनी यावेळी त्यांना कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळणाऱ्या दोन्ही पक्षी प्रजातींची माहिती दिली. तसेच पक्षांचा अधिवास त्यांचा विणीचा हंगाम याबाबत सविस्तर माहिती दिली. येथील दुर्मिळ पक्षी व वन्यजीवांच्या अधिवासाबाबत त्यांनी कोकणवासीयांचे खास कौतुक केले. ही दुर्मिळ संपत्ती असून कोकणवासीयांनी याची जपणूक करावी, असे आवाहन त्यांनी केले. समृद्ध पर्यावरणाचा वारसा हा पुढील कित्येक पिढ्यांना पाहता यावा यासाठी आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट
तिबोटी खंड्याचे दर्शन
दिया मिर्झा यांना तिबोटी खंड्याचे विशेष आकर्षण आहे. त्यांनी या पक्षाचे दर्शन घेण्यासाठी आरोसबाग गाव निवडले. प्रवीण सातोसकर यांनी देखील त्यांना गावात तिबोटी खंड्याचे दर्शन घडविले. त्यांनी या पक्षाच्या अनेक छबी आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्या. याशिवाय त्यांना नवरंग, वेगोरचा सूर्यपक्षी हे देखील दाखविण्यात आले. एवढ्या कमी वेळात या दुर्मिळ पक्षांचे दर्शन झाल्याने तिने आनंद व्यक्त केला.
चौकट
आरोसबाग गावाचे कौतुक
आरोसबाग गावातील निसर्ग सौंदर्याचे तिने भरभरून कौतुक केले. ग्रामपंचायतने गावात जागोजागी लावलेले कचरा टाकू नयेचे फलक ही चांगली जनजागृती असल्याचे त्यांने सांगितले. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी तसेच पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी जंगलात तसेच रस्त्यावर कुठेही प्लास्टिक टाकू नये, असे आवाहन तिने केले. देशातील दहा पैकी तब्बल नऊ घुबडांच्या प्रजाती या आरोसबाग गावात सापडल्याने गावाला ‘घुबडांचे गाव’ म्हणून संबोधण्यात येते हे सांगितल्यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. ही संकल्पना चांगली असून येथील गावपण व निसर्ग टिकविणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भविष्यात पक्षी निरीक्षणासाठी व येथील निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी पुन्हा भेट देण्याचे आश्वासन त्यांने गावकऱ्यांना दिले.
चौकट
पर्यावरण रक्षण प्रत्येकाची जबाबदारी
स्थानिकांशी संवाद साधताना त्यांनी पर्यावरणीय समस्या, हवामान बदल, जलसंधारण, प्लास्टिकचा धोका, आणि वन्यजीवांचे संरक्षण या मुद्द्यांवर सखोल चर्चा केली. गावकऱ्यांनी त्यांच्या प्रश्नांना मोकळेपणाने विचारले, आणि दिया मिर्झा यांनी त्यांच्या शंका समाधान करत अनेक उपयुक्त उपाय सुचवले. पर्यावरण रक्षण ही फक्त सरकार किंवा एखाद्या संस्थेची जबाबदारी नाही, तर प्रत्येकाची आहे. आपण घराघरात कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक टाळणे, झाडे लावणे अशा छोट्या गोष्टींमधून मोठा बदल घडवू शकतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.