अमेरिकेतही दरवळतो गणेशोत्सवाचा सुगंध

अमेरिकेतही दरवळतो गणेशोत्सवाचा सुगंध

Published on

swt28.jpg
88851
अमेरिकाः येथे उमेश गुरव व कुटुंबीयाकडून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
swt29.jpg
88852
अमेरिका ः प्रतिष्ठापना केलेली गणरायाची सुंदर देखणी मूर्ती.

अमेरिकेतही दरवळतो गणेशोत्सवाचा सुगंध
गुरव कुटुंबीयांकडून पूजनः स्थानिकही होताहेत सहभागी
नीलेश मोरजकरः सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २ः ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर, आरती, भजनाचे सूर, उकडीचे मोदक आणि घरभर पसरलेलं भक्तीमय वातावरण हे दृश्य कोकणात नसल, तरी अमेरिकेतील एका घरात मात्र अगदी अस्सल कोकणी ढंगात दरवर्षी पाहायला मिळत. हळवल (ता. कणकवली) येथून अमेरिकेत स्थायिक झालेलं उमेश गुरव व कुटुंबीय गेल्या सात वर्षांपासून आपल्या घरी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहे. या कुटुंबासाठी गणपती केवळ देव नसून, तो आपल्या मातृभूमीशी, संस्कृतीशी असलेलं नातं जपण्याचं एक माध्यम आहे. उमेश हे एका कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून कार्यरत आहेत. तर पत्नी सायली ह्या फूड गृहउद्योगचा व्यवसाय सांभाळतात. येथे गणपती उत्सवात मराठी, भारतीय व्यक्ती यांच्यासोबतच स्थानिक अमेरिकन देखील तितक्याच भक्तीभावाने सहभागी होतात.
गुरव कुटुंबीयांचे मूळ गाव हळवल असून, घरातील उमेश गुरव व सायली गुरव दांपत्याने अमेरिकेत स्थायिक झाल्यावरही आपली संस्कृती जपायचं ठरवलं. ‘गणपती हा फक्त सण नाही, तो आमचा आत्मा आहे’, असं सांगत त्यांनी २०१९ पासून आपल्या घरात दरवर्षी बाप्पाची स्थापना सुरू केली. गुरव कुटुंबीय कॅलिफोर्निया राज्यात फ्रॅमोंट शहरात राहतात. इथल्या इंडियन बाजार नावाच्या ग्रोसरी स्टोअर्समधून गणेश मूर्ती घरी आणली जाते. याठिकाणी मुंबईतून मूर्ती आयात केल्या जातात. तीन आठवडे आधी गणपती मूर्तीचे आगाऊ बुकिंग करावे लागते. पहिल्या दिवशी विधिवत पूजन केल्यानंतर उकडीचे मोदक, वरणभात व भाजीचा नैवेद्य दाखवून आरती केली जाते.
दरवर्षी याठिकाणी गणपतीची मूर्ती महाराष्ट्रातूनच मागवली जाते, तर पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंपासून नैवेद्यापर्यंत सगळं पारंपरिक पद्धतीने केलं जातं. घरात छोटेखानी पण देखणं मंडप उभारला जातो, आरत्या म्हणतात, मुलं श्लोक म्हणतात, आणि संपूर्ण घर गणेशमय होत असल्याचे गुरव यांनी सांगितले. दहा दिवसांचा हा उत्सव शेवटी विसर्जनासह संपतो. अमेरिकेत जल प्रदूषण टाळण्यासाठी नदी किंवा समुद्रात मूर्ती विसर्जन करण्यासाठी बंदी असल्याने घरच्या घरी पारंपरिक पद्धतीने मूर्तीचे विसर्जन केले जाते. गोड अश्रूंनी बाप्पाला निरोप देताना सगळेजण ‘पुढच्या वर्षी लवकर या’चा गजर करत नवीन वर्षाची उत्सुकता मनात साठवतात.

चौकट
कौटुंबिक आणि सामाजिक पर्व
गुरव कुटुंबीयांचं हे घरगुती गणेशोत्सवाचे रुपांतर आता एका सामाजिक उपक्रमात झालं आहे. स्थानिक मराठी व भारतीय कुटुंबांना उत्सवात आमंत्रित केलं जातं. महिला एकत्र येऊन भजन गातात, लहान मुलांचं आरतीचे कार्यक्रम होतात, पारंपारिक जेवण बनवलं जातं आणि सर्वजण एकत्र बसून बाप्पाचं विसर्जन होईपर्यंत आनंद साजरा करतात.

चौकट
नवीन पिढीला संस्कृतीची ओळख
गुरव कुटुंबातील दुसऱ्या पिढीतील सदस्य असलेली व अमेरिकेत वाढलेली त्यांची मुलगी इरा ही देखील उत्सवात हिरीरीने सहभागी होते. मुलांना आरत्या शिकवणं, नैवेद्य बनवायला मदत घेणं, पूजेसाठी फुले वेचायला लावणं हे सगळं मुलांमध्ये भारतीयतेचं बियाणं पेरतं आहे.

चौकट
संस्कृतीचं जतन
विदेशात राहूनही आपल्या संस्कृतीशी प्रामाणिक राहणं, पारंपरिक सण जिवंत ठेवणं आणि पुढच्या पिढीला ते सोपवणं ही खरी सांस्कृतिक राष्ट्रसेवा आहे. गुरव कुटुंबीयांचं हे कार्य अनेकांनाही प्रेरणा देत आहे की, “देश कुठलाही असो, पण आपल्या मातीचं नातं मनात असेल, तर सणांचं रूपांतर परंपरेत होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com