सावंतवाडी : खड्ड्यांचे नगरदर्शन

सावंतवाडी : खड्ड्यांचे नगरदर्शन

Published on

88843
88929

सावंतवाडी शहरात खड्ड्यांचे नगरदर्शन
खड्डे स्थानिकांना देतात ‘मुफ्त मसाज’ सेवा अन् चिखलाचे मोफत डिझाईन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ः शहरातल्या रस्त्यांवरून जर तुम्ही मोटार, स्कुटर, अगदी सायकलही चालवत निघालात तर एक गोष्ट हमखास अनुभवायला मिळते. रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यांवर रस्ता आहे, हा प्रश्न अगदी तत्वज्ञानाच्या उंचीवर पोहोचतो.
गणेशोत्सव आला की शहरात चाकरमानी, भाविक, पर्यटक सगळे धावून येतात. पण नगरपालिकेने त्यांचं स्वागत आरतीने नाही तर खड्ड्यांच्या माळा घालून केलं आहे. एवढ्या खड्ड्यांची रेलचेल आहे की गूगल मॅपने सुद्धा ‘रस्ता शोधत आहे’ असं सांगून हार मानली आहे.
नगरपालिकेला मुख्याधिकारी नाही, पण खड्ड्यांना मात्र ‘मुख्य’ पदवी नक्की मिळाली आहे. इतके दिवस हे खड्डे स्थानिक लोकांना ‘मुफ्त मसाज’ सेवा देत होते, पण आता तर भाविकांच्या गाड्यांनाही तीच सेवा मिळतेय. वाहनचालकांच्या पाठीवरच्या मणक्यांनी पालिकेविरुद्ध ठराव मांडलाय, असं वाटतं.
नारायण मंदिराजवळचा खड्डा दोन वेळा नागरिकांनी स्वतः बुजवला. म्हणजे भक्तांनी देवाला फुलं वाहायच्या आधी खड्ड्याला खडी वाहिली. खड्ड्यांच्या या अनोख्या पूजा-पद्धतीतून सावंतवाडीकरांनी ‘सामाजिक बांधिलकी’ची नवी व्याख्या जगाला दिली आहे.
पालिका कार्यालयासमोरचे खड्डे म्हणजे जणू प्रशासनाचे आरसेच. ‘आम्ही आहोतच खड्ड्यात’ हा संदेश ते मुक्या भाषेत रोज देतात. बाजारपेठेत खरेदीला जाणारे ग्राहक एक वस्तू मोफत घेऊन येतात. शर्टावर, साडीवर किंवा पँटवर चिखलाचे मोफत डिझाईन.
गतवर्षी कधीतरी पालिकेने थोडा सिमेंट काँक्रिट टाकून दिलासा दिला होता. पण यावर्षी मात्र सिमेंट-पाणी यांचं नातं सुद्धा फुटल्यासारखं दिसतं. परिणामी खड्ड्यांचा उत्सव अगदी गणेशोत्सवाइतकाच मोठा झाला आहे.
आता प्रश्न एकच : सावंतवाडीचे रस्ते सुधारणार कधी?
की हे खड्डेच सावंतवाडीचे नवीन पर्यटन-स्थळ म्हणून घोषित होणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com