पक्ष मजबुतीसाठी भाजपचा उत्तर रत्नागिरीवर डोळा
राजकारणाचे वारे---लोगो
पक्ष मजबुतीसाठी भाजपचा ‘उत्तर’वर डोळा
प्रशांत यादव यांच्यापाठोपाठ वैभव खेडकरांचा प्रवेश ; शिंदे शिवसेनेला धक्का
सिद्धेश परशेट्ये ः सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २ : जिल्ह्याच्या उत्तर भागातील मतदारसंघातील पक्ष मजबुतीसाठी भाजपने पावले उचलली आहेत. चिपळूणमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते प्रशांत यादव यांचा प्रवेश करून घेतल्यानंतर खेड येथील मनसेने हकालपट्टी केलेले वैभव खेडेकर यांना पक्षात सामावून घेण्यावर भर दिला आहे. दोन्ही नेत्यांवर शिंदे शिवसेनेचा डोळा होता. मात्र भाजपने राजकीय डाव टाकत यादवांपाठोपाठ खेडेकरांना भाजपवासी केले. त्यामध्ये महायुतीमधील घटक पक्ष शिंदे शिवसेनेला धक्का देतानाच दोन्ही मतदारसंघातील महत्वाच्या तालुक्यांमध्ये आपले शिलेदर तयार केले आहेत. खेडेकर यांच्या प्रवेशामुळे भाजप बळकट होणार आहे.
खेडे येथील वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपला तालुक्यात ग्रामीण पातळीवर अधिक मजबूत पाय रोवता येतील, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. खेडेकर यांचा पक्षप्रवेश सोहळा गुरुवारी (ता. ४) मुंबई येथील भाजपाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. खेडेकर यांच्या प्रवेशामुळे गेल्या वीस वर्षात खेड तालुक्यातील मनसेच्या अस्तित्वाला धक्का बसणार आहे. खेडसह जिल्ह्यात त्यांनी मनसेला उर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न केले होते. राज ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेल्या वैभव खेडेकर यांनी खेड पालिकेवर सुमारे पंधरा वर्षे वर्चस्व ठेवले तर खेड तालुक्यातील भरणेसह अन्य ग्रामपंचायतीमध्येही मनसेचे प्राबल्य निर्माण केले होते. विविध विषयांवर आंदोलने करत राजकीय करिअर निर्माण केले होते. असे असतानाच खेडेकर यांना मनसेने बडतर्फ केले. त्यामुळे कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. गेल्या काही कालावधीत वैभव हे खेड तालुक्यापुरतेच मर्यादित राहतील अशी व्यवस्था पक्षातील स्पर्धकांनी करून ठेवली होती. त्यांनी नेमणूक केलेल्या यादीलाच स्थगिती दिली गेली. त्यामुळे पक्षातील त्यांच्या वर्चस्वला धक्का बसला होता. त्यामुळे त्यांची घुसमट सुरूच होती. भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे निमित्त झाले आणि त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला गेला. त्याचा फटका मनसेलाच बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये भाजपही प्रत्येक मतदारसंघात आपले शिलेदार तयार करून पक्ष वाढविण्यावर भर देत आहे. त्याचे एक पाऊल चिपळूण येथील प्रवेशाने पडले होते. पाठोपाठ खेडेकर यांना आपलेसे करत राज्याचे मंत्री नीतेश राणे यांनी दुसरा धक्का दिला आहे. खेडेकरांसोबत अनेक कार्यकर्तेही त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे तालुक्यात भाजपची घौडदौड सुरळीत होणार हे निश्चित आहे. तालुक्यात भाजप ताकदवान होण्यास खेडेकर यांचा प्रवेश उपयुक्त ठरेल अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
----
कोट १
आम्ही सर्व कार्यकर्ते वैभव खेडेकर यांच्यासोबत होतो आणि पुढेही राहणार आहोत. भाजपमध्ये प्रवेश करून आम्ही तालुक्यातील विकासाच्या लढाईसाठी अधिक बळकट होऊ.
- संतोष नलावडे, चिपळूण
कोट २
विकास हा भाजपच्या माध्यमातून होतो, अशा ठाम विश्वासाची ग्वाही मिळत असल्याने सर्वसामान्य जनता आणि त्यांचे नेतृत्व करणारे पदाधिकारी भाजपमध्ये डेरेदाखल होत आहे. येणाऱ्यांचा योग्य तो सन्मान राखला जात आहे.
-नीतेश राणे, बंदर विकास मंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.