वैभववाडी विकास आराखडा वाद चिघळणार

वैभववाडी विकास आराखडा वाद चिघळणार

Published on

89246

वैभववाडी विकास आराखडा
वाद चिघळणार
४८४ हरकती दाखलः समितीसमोर होणार सुनावणी
एकनाथ पवारः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ३ः वाभवे वैभववाडी शहराच्या प्रारूप विकास आराखड्याचा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रारूप आराखड्यावरून संतप्त झालेल्या शहरातील नागरिकांनी ४८४ हरकती दाखल केल्या आहेत. या हरकतीसंदर्भात आता समितीसमोर सुनावणी होणार आहे.
वाभवे वैभववाडी शहराचा प्रारूप विकास आराखडा नगरविकास प्रधिकरणने तयार केला आहे. वैभववाडी नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ६११.८९ हेक्टर क्षेत्रापैकी ५८ टक्के जागा अर्थात ३७२.७९ हेक्टर क्षेत्र ग्रीन झोनकरीता आरक्षित करण्यात आले. याशिवाय २०.१ एकर इतकी जागा १९ विविध सुविधांकरीता आरक्षित केली आहे. यामध्ये फायर ब्रिगेडकरीता ४३ गुंठे, बगीच्या करीता ५३, स्पोर्ट कॅम्पास-५९, कप्रेशनसाठी २३, जलशुध्दीकरण युनिट-८१, लायब्ररी-१९, डंपिंग ग्राऊंड-७१, ग्रेव्ही यार्ड-५५, शैक्षणिक सकुंल-३१, भाजीपाला मार्केट-३९, वाणीज्य गाळे-४५, मटण-मासळी मार्केट-४०, प्ले ग्राऊंड-३१, ड्रामा थिअटर-५३, मलनिस्सारण-५६, म्युनसिपल कार्यालय-५३, पार्किंग-२० आणि इतर ३२ गुंठे आदीचा समावेश आहे.
शहरातील अनेकांच्या घरावर आरक्षण पडले आहे. नियोजित रस्ता रूंदीकरणामध्ये अनेकांची घरे कोसळावी लागणार आहेत. वैभववाडी बाजारपेठ उध्वस्त होणार असल्याची भिती व्यक्त करीत सुरूवातीला वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांनी नगरपंचायतीमध्ये प्रारूप आराखड्याला विरोध दर्शविला. त्यानंतर येथील आंबेडकर भवनात शहरातील नागरिकांची सभा आयोजित केली होती. या सभेत नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. नगरपंचायतीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर तोंडसुख घेतले होते. त्यानंतर या विकास आराखड्याला एकत्रित विरोध करण्याचे ठरले याशिवाय पालकमंत्री नितेश राणेंची भेट घेण्यावर सर्वाचे एकमत झाले. प्रारूप आराखड्याविरोधात नागरिकांच्या भावना प्रचंड संतप्त आहेत. या आराखड्याविरोधात आक्षेप नोंदविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यत मुदत होती. या कालावधीत शहरातील नागरिकांनी तब्बल ४८४ हरकती नोंदविल्या आहेत. या हरकतीवर सुनावणीकरीता शासनाकडून समिती गठित करण्यात येणार आहे. एकूण सात समिती सदस्य असणार असून त्यामध्ये नगरपंचायतीचे तीन सदस्य आणि शासन नियुक्त चार सदस्य असणार आहेत. त्यामध्ये एक पर्यावरण तज्ञ असणार आहे. नगरपंचायतीकडून नगराध्यक्ष श्रध्दा रावराणे, उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे, नगरसेवक रोहन रावराणे यांची निवड करण्यात आली आहे. मात्र, शासनाकडून अजूनही चार सदस्यांची निवड करण्यात आलेली नाही. समिती गठीत झाल्यानंतर नागरिकांच्या हरकतीवर सुनावणीला सुरूवात होणार आहे.

कोट
प्रारूप आराखड्यासंदर्भात ४८४ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. या हरकतीवर आता शासन नियुक्त समिती सुनावणी घेईल.या समितीत सात सदस्य असतात.त्यापैकी तीन नगरपंचायतीचे सदस्य असणार आहेत.
- प्रतिक थोरात, मुख्याधिकारी, वाभवे वैभववाडी नगरपंचायत

कोट
आम्ही जरी नगरपंचायतीचे पदाधिकारी असलो तरी आम्ही पुर्णपणे शहरातील नागरिकांच्या बरोबर आहोत. शहरातील नागरिकांवर कोणताही अन्याय होणार नाही याची खबरदारी आम्ही घेणार आहोत. पालकमंत्री नितेश राणे आहेत. त्यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी चिंता करू नये.
- रणजित तावडे, बांधकाम सभापती, नगरपंचायत वाभवे वैभववाडी

Marathi News Esakal
www.esakal.com