-वाहतूक कोंडीत घुसमटले चिपळूण शहर

-वाहतूक कोंडीत घुसमटले चिपळूण शहर

Published on

ग्राउंड रिपोर्ट---लोगो

-rat३p१४.jpg-
P25N89220
चिपळूण ः चिपळूण शहरात कायम होणारी वाहतूककोंडी.
-rat३p१०.jpg-
25N89187
चिपळूणचे प्रवेशद्वार असलेल्या बहादूरशेख नाक्यापासून नागरिकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते.
---
वाहतूक कोंडीत घुसमटले चिपळूण शहर
प्रवेशद्वारापासूनच कोंडी ; बेशिस्त पार्किंग, फेरीवाल्यांची अडचण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ ः चिपळूण शहरात वाहतूककोंडीचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत असून, सर्वसामान्य नागरिकांसह वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर बेशिस्त उभी केली जाणारी वाहने, फेरीवाल्यांची गर्दी आणि अवजड वाहनांची बाजारपेठेत होणारी वर्दळ यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. वाहतूक शाखेकडून काही प्रमाणात नियोजन करण्यात आले असले तरी, पोलिस कर्मचारी थोड्या वेळासाठी हटल्यावर वाहनचालक पुन्हा बेशिस्तपणे वाहने उभी करत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, चिपळूणच्या प्रवेशद्वारापासूनच म्हणजे बहादूरशेख नाक्यापासून वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते. या परिस्थितीमुळे नागरिकांचा संताप वाढत आहे. ग्रामीण भागातून शहरात येण्यासाठी जे जोडरस्ते आहेत त्या प्रत्येक जोडरस्त्यावर वाहतूककोंडीचा त्रास आहे.

*गणेशोत्सवामुळे गर्दीत भर
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावी येणाऱ्या प्रवाशांची, पर्यटकांची व वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. यामुळे आधीच अस्ताव्यस्त असलेली वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. बाजारात पावलापावलांवर वाहतूककोंडी दिसून येत असून, नागरिकांना गाडीतच बराच वेळ थांबावे लागत आहे.

*बेशिस्त पार्किंग, फेरीवाल्यांची गर्दी
शहरातील रस्ते अरुंद आहेत. त्यावर नियोजनाशिवाय चारचाकींची पार्किंग, दुचाकींची रांग तसेच कुठलाही धाक नसलेले फेरीवाले यांच्यामुळे वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे. बाजारातील मुख्य रस्त्यांवर वाहनांची मनालायेईल तशी उभी केलेली रांग ही समस्येची मुख्य कारणे ठरत आहेत. त्यामुळे अडकलेल्या वाहनांतून हॉर्नचा कर्कश आवाज नागरिकांच्या त्रासात अधिक भर घालत आहे. सामान्य नागरिकांनी पालिका प्रशासन आणि पोलिस विभागाकडे तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई, फेरीवाल्यांवर नियंत्रण आणि अवजड वाहनांना बाजारात प्रवेशबंदी ही मागणी जोर धरत आहे अन्यथा वाहतूककोंडीचा प्रश्‍न अधिकच बळावेल, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे.

*पालिकेकडून केवळ नोटीस
शहरातील अनेक व्यापारीसंकुले व खासगी इमारतींनी बांधकाम परवान्यांच्या अटींनुसार पार्किंगची सोय न करता ती जागा व्यापारी उपयोगासाठी वळवली आहे. परिणामी, रस्त्यावर वाहनांचा ताण वाढत असून वाहतूककोंडी अधिकच गंभीर होत आहे. वाढत्या वाहतूककोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी पालिका प्रशासनाने तब्बल ४८ व्यापारीसंकुले व इमारतींना पार्किंगसंदर्भात गंभीर उल्लंघन केल्याबद्दल नोटिसा बजावल्या आहेत. आवश्यक सुधारणा न झाल्यास थेट दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा पालिकेने दिला आहे; मात्र पालिकेने अद्याप कोणावरही कारवाई केलेली नाही. त्यामुळे पालिकेच्या या नोटिसीकडे मालमत्ताधारकांनी दुर्लक्ष केले आहे.

*वाहतूककोंडीची ठिकाणे
बहादूरशेख नाका, शिवाजीनगर बसस्थानक, जिप्सी कॉर्नर, मेहता पेट्रोलपंप परिसर, चिंचनाका, शिवनदी पूल, पालिका परिसर, भाजीमंडई परिसर, गांधीचौक, क्वालिटी बेकरी परिसर, पानगल्ली परिसर, गुहागरनाका परिसर, भेंडीनाका, नाईक कंपनी पूल, गुहागर बायपास प्रेवशद्वार. याठिकाणी मुख्यत्वे वाहतुकीची कोंडी होते.

*पार्किंग असलेल्या इमारती
परकार कॉम्प्लेक्स, आयशाबी कॉम्प्लेक्स, देसाई प्लाझा, स्वामी कॉम्प्लेक्स, लोकमित्र कॉम्प्लेक्स, अजिंक्य आर्केड, खेराडे कॉम्प्लेक्स याठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे.

*पालिकेने विकसित केलेले पार्किंग स्थळ
पालिकेने याठिकाणी पार्किंग स्थळ विकसित केले आहे. त्यामध्ये उक्ताड, बुरूमतळी, देसाई मोहल्ला पूल परिसर, भाजीमंडई परिसर, खेडेकर क्रीडासंकूल, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र परिसर यांचा समावेश आहे.

*पार्किंगमध्ये पावसाळ्यात पाणी
शहरातील अनेक इमारतींना पार्किंगची व्यवस्था नाही. व्यावसायिक इमारतीही पार्किंगशिवाय उभ्या आहेत. अनेक इमारतींना चक्क जमिनीच्या खाली पार्किंगची व्यवस्था देण्यात आली आहे. त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे. काही इमारतींना खाली पार्किंगची व्यवस्था आहे; परंतु तिथे पावसाळ्यात गटाराचे पाणी पार्किंगमध्ये येऊन तळे तयार होत आहे. तेथील वाहने कुठे पार्क करायची, असा प्रश्न निर्माण होत आहे.

*वाहतूककोंडीचे कारण
ग्रामीण आणि उपनगरातून विविध कामानिमित्ताने ग्रामस्थांची शहरात नेहमीच ये-जा असते. हे लोक अनेकवेळा स्वतःची वा भाड्याची वाहने घेऊन येतात. शहरात जिथे मोकळी आणि मोक्याची जागा दिसेल त्या ठिकाणी ही वाहने उभी करून ठेवतात. अनेकवेळा बाजारपेठेमध्ये, नजीक मोक्याची किंवा मोकळी पार्किंगसाठी जागा नसल्याने बाजारपेठेमध्ये रस्त्यावर वाहनचालकांकडून वाहने उभी करून ठेवली जातात. मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांची वाहनेसुद्धा रस्त्यावर एकाच ठिकाणी तासनतास उभी राहिल्याने वाहतूककोंडीला आमंत्रण मिळते.

*एकेरी वाहतुकीचे फलक शोभेसाठी
अर्बन बँकेसमोरील दोन्ही मार्ग एकेरी आहेत. खाटीक आळीतून भाजीमंडईच्या मागील बाजूने येणारा रस्ता, वडनाक्यातून येणारा रस्ता, भेंडीनाक्यातून शहराकडे येणारा रस्ता असे काही मार्ग एकेरी आहेत. त्या ठिकाणी दुहेरी वाहतूक होते. त्यामुळे वाहतूककोंडी होते. या ठिकाणी लावलेले एकेरी वाहतुकीचे फलक शोभेचे बाहुले झाले आहेत.

कोट
वर्षानुवर्षे भेडसावत असलेली शहरातील वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी पालिका, पोलिस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून ठोस उपाययोजनांची आखणी होणे गरजेचे आहे.
-संदीप लवेकर, व्यापारी, चिपळूण

कोट
शहरातील वाहतूककोंडी नियंत्रित करण्यासाठी केवळ सात पोलिस आहेत. यातील काही पोलिस केवळ दंडात्मक कारवाई करत असतात. शहर वाहतूक शाखेत चार पोलिस कर्मचारी असतात. यातील तीन महिला पोलिस कर्मचारी आहेत. चिंचनाक्यात एक आणि बहादूरशेख नाका येथे दोन कर्मचारी कार्यरत असतात. शहरांची हद्द वाढत आहेत. वाहने वाढत आहेत. त्यामुळे सात कर्मचारी अपुरे आहेत. त्यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे.
-साजिद सरगुरोह, सामाजिक कार्यकर्ते, चिपळूण

कोट
चिपळूण शहरातील वाहतूक शाखेला आणखी दहा पोलिस देण्याचे नियोजन आहे. ज्या पोलिस कर्मचाऱ्यांना चिपळूणमध्ये काम करण्याची इच्छा आहे, अशांची यादी तयार करून त्यांना चिपळूणला पाठवले जाईल. संबंधित अधिकाऱ्यांना त्या संदर्भात सूचना केल्या आहेत.
--नितीन बगाटे, पोलिस अधीक्षक, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com