मळगावमध्ये कौटुंबिक ऐक्याचा ''ओवसा''
swt320.jpg
89255
मळगावः येथील राऊळ व गांवकर कुटुंबातील सुहासिनींचा गौरी पूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
मळगावमध्ये कौटुंबिक ऐक्याचा ‘ओवसा’
गौरीपूजन सोहळाः राऊळ, गावकर घराण्यांचा पारंपरिक वारसा
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. ३ः वर्षांनुवर्षांची परंपरा असलेल्या मळगाव येथील देवस्थानचे मानकरी राऊळ (कुळ) व गावकर (थळ) घराण्यातील सुहासिनी महिलांचा एकदिवसीय गौरी पूजन, विसर्जन व ओवसा कार्यक्रम गणेश चतुर्थीच्या सातव्या दिवशी मंगळवारी (ता. २) परंपरेनुसार उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला. सायंकाळी गौरीचे थाटात विसर्जन करण्यात आले. गौरी पूजनाची ही परंपरा ही दोन्ही घराणी एकोप्याने जोपासत आली आहेत.
गणेशोत्सवातील प्रत्येक घटकाला आपले वैशिष्ट्य आहे. गणेशोत्सवात जशी गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते, त्याचप्रमाणे गौरी पूजनालाही वेगळे महत्त्व आहे. गौरीपूजन ही परंपरा कौटुंबिक ऐक्य, स्नेह व भक्तिभावाचे प्रतीक आहे. प्रत्येकाच्या परंपरेप्रमाणे गौरीदेवी पूजनाचा कार्यक्रम एक, दोन व तीन दिवस चालतो. या पारंपरिक सोहळ्याचा वारसा वर्षांनुवर्षे मळगाव येथील राऊळ व गावकर घराण्यांनी जतन केला आहे. या दोन्ही घराण्यांत एक दिवस गौरी पूजन व सायंकाळी गौरीचे विसर्जन केले जाते.
यंदाही गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी राऊळ व गावकर घराण्यातील सुहासिनी महिलांचा एक दिवसीय गौरी पूजन कार्यक्रम पार पडला. सकाळी ढोल-ताशांच्या गजरात विहिरीवरून कुमारिका मुलीला घेऊन गौरीला थाटात दोन्ही ठिकाणी आणण्यात आले. त्यानंतर गौरीला नटवून पारंपरिक साडी परिधान करून अलंकार व फुलांनी सजविण्यात आले. तिचे पुरोहितांच्या उपस्थितीत विधिपूर्वक पूजन करण्यात आले. गौरी पूजनादरम्यान महिलांनी ‘ओवसा’ देवीसमोर मांडून आपला ओवसा भरण्याचा पारंपरिक विधी पार पाडला. यावेळी नवविवाहितांना पहिला मान दिला जातो. त्यानुसार नवोदित जोडप्यांचा ओवसा भरणे कार्यक्रम प्रथम पार पडला. त्यानंतर उर्वरित महिलांचा कार्यक्रम झाला. सर्वांच्या उपस्थितीत महाआरती व गाऱ्हाणे पार पडले. त्यानंतर सर्व राऊळ घराण्यातील महिलांनी वाजतगाजत ढोल-ताशांच्या गजरात येथील गावकर घराण्यातील गौरीचे दर्शन घेतले, तर गावकर घराण्यातील महिलांनी राऊळ घराण्यातील गौरीचे दर्शन घेतले. नंतर आपापल्या ठिकाणी आल्यावर उपस्थित सर्वांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. देवीसमोर महिलांनी विविध प्रकारच्या फुगड्या सादर केल्या.
सायंकाळी पुन्हा एकदा ढोल-ताशांच्या गजरात व शंखनादात गौरीचे थाटात विसर्जन करण्यात आले. विसर्जनानंतर शेवग्याच्या पाल्याची भाजी व भाकरी असा प्रसाद उपस्थित सर्वांना वाटप करण्यात आला. सामूहिक गाऱ्हाणे झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या सोहळ्यात लहान मुलांपासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. यामुळे हा सोहळा धार्मिकतेसोबतच सांस्कृतिक उत्सवाचे दर्शन घडविणारा ठरला. अशी ही गौरी पूजनाची राऊळ व गावकर घराण्यांची एक हजार वर्षांची अखंड परंपरा आजही पूर्वापार श्रद्धेने चालू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.