खड्डे, स्ट्रीट लाईटप्रश्नी बांद्यात आज आंदोलन

खड्डे, स्ट्रीट लाईटप्रश्नी बांद्यात आज आंदोलन

Published on

८९२८०

खड्डे, स्ट्रीट लाईटप्रश्नी बांद्यात आज आंदोलन
मनसेचा पाठिंबा ः धुरींसह कल्याणकरांकडून प्रश्नास वाचा
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३ : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील मोठ्या संख्येने पडलेले खड्डे आणि उड्डाणपुलावरील बंद स्ट्रीट लाईटमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी उद्या (ता. ४) आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपला ठाम पाठिंबा जाहीर केला असून, सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी हे समर्थन अधिकृतपणे जाहीर केले आहे. सामाजिक कार्यकर्ते शामसुंदर धुरी, साईप्रसाद कल्याणकर यांच्यासह ग्रामस्थ टोल नाक्यानजीक आंदोलन करण्यासाठी बसणार आहेत.
राष्ट्रीय महामार्गावरील दुरवस्थेमुळे वाहनचालक व प्रवाशांचे जीव मुठीत घेऊन प्रवास सुरू आहे. रस्त्यावर जागोजागी खोल खड्डे पडले असून, उड्डाणपूलावरील स्ट्रीट लाईट अनेक महिन्यांपासून बंद आहेत. परिणामी, रात्रीच्या वेळी अपघातांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, उद्या सकाळपासून आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र निषेध व्यक्त केला जाणार आहे. या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करताना मनसे तालुकाध्यक्ष सावंत म्हणाले, “गेल्या अनेक महिन्यांपासून या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. रस्त्यांची देखभाल आणि स्ट्रीट लाईट वेळेत सुरू करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. परंतु, ती पार न पाडल्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. ग्रामस्थांचे हे आंदोलन रास्त असून, मनसे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास मनसे स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल.” दरम्यान, उद्या होणाऱ्या आंदोलनात स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, तसेच मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. हे आंदोलन शांततापूर्ण असले तरी, प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे; अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


अपघातांत वाढ तरीही दुर्लक्ष
दररोज शेकडो वाहनांची वाहतूक या महामार्गावरून होते. पण, खड्डे आणि अंधारामुळे अपघाताच्या घटनांत वाढ झाली आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार यांच्याकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com