जिल्हा बँकेत लिपीक पदांसाठी भरती
swt323.jpg
89287
सिंधुदुर्गनगरीः येथे पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी. सोबत उपाध्यक्ष अतुल काळसेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे व अन्य संचालक.
जिल्हा बँकेत लिपीक पदांसाठी भरती
अध्यक्ष मनीष दळवीः केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवाशांना प्राधान्य
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३ः सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत तब्बल ७३ लिपिक पदांच्या जम्बो भरतीला राज्याच्या सहकार विभागाने हिरवा कंदील दिला आहे. या भरतीची प्रक्रिया सरळ सेवेमार्फत होणार असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व जलदगतीने राबविण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या सात कंपनीतील आयबीपीएस (IBPS) या नामांकित कंपनीची निवड केली आहे. विशेष म्हणजे केवळ जिल्ह्यातील नागरिकांनाच या भरतीत उतरता येणार आहे. तशी परवानगी शासनाची घेण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
याबाबत माहिती देण्यासाठी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी उपाध्यक्ष अतुल काळसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक अरविंद रावराणे, निता राणे, संदीप परब, गजानन गावडे, गणपत देसाई, प्रज्ञा ढवण, समीर सावंत, रवींद्र मडगावकर, प्रकाश मोर्ये उपस्थित होते.
यावेळी श्री. दळवी म्हणाले, ‘‘सेवानिवृत्ती, स्वेच्छा निवृत्ती यामुळे जिल्हा बँकेत मोठ्या प्रमाणात रिक्त पदे झाली होती. सध्या जिल्हा बँकेत २५० रिक्त पदे आहेत. यामुळे गेली सात ते आठ वर्षे बँकेचा कारभार पूर्ण क्षमतेने हाकताना मर्यादा येत होत्या. त्यासाठी गेली दोन वर्षे सातत्याने जिल्हा बँक राज्याच्या सहकार विभागाकडे रिक्त पदभरती करण्यास परवानगी मागत होती. अखेर सहकारी विभागाने पहिल्या टप्प्यात ७३ पदे भरती करण्यास मान्यता दिली आहे. तर ही प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ७० पदांच्या भरतीला मान्यता मिळणार आहे. जानेवारी २०२६ पर्यंत ही दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘बँकिंग क्षेत्रात मोठा अनुभव असलेल्या तसेच केंद्र आणि राज्य शासनाची भरती प्रक्रिया राबविणाऱ्या आयबीपीएस या कंपनीला भरती प्रक्रियेचा ठेका देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे. राज्यात सध्या अनेक जिल्हा बँकांत भरती प्रक्रिया सुरू आहे. मात्र, मोठा कालावधी उलटला तरी ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. कारण त्या प्रक्रियेविरोधात न्यायालयात धाव घेतली गेलेली आहे. मात्र, आयबीपीएस कंपनीने आतापर्यंत घेतलेली एकही भरती प्रक्रिया न्यायालयात गेलेली नाही. त्यामुळे बँकेने या कंपनीची निवड केली आहे. या प्रक्रियेत बँकेचा कोणताही हस्तक्षेप राहणार नाही. याबाबत प्रलोभने दाखविणाऱ्या व्यक्ती आढळल्यास थेट बँकेशी संपर्क साधावा. आम्हाला ही प्रक्रिया पारदर्शक करावयाची आहे.’’
विशेष म्हणजे या भरतीत फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांनाच अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करताना अधिवास प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. राज्यातील जिल्हा बँकांमध्ये प्रथमच जिल्हा कार्यक्षेत्रापुरती मर्यादित अशी ऐतिहासिक भरती होत आहे. तसेच २००८ नंतर ही पहिली मोठी जाहीर भरती असल्याने जिल्ह्यातील सुशिक्षित तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित तरुण-तरुणींनी या भरतीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. दळवी यांनी केले.
भरण्यात येणाऱ्या ७३ पदांसाठी कोणतेही आरक्षण नाही. केवळ गुणवत्ता हाच एकमेव निकष आहे. आम्हाला गुणवत्ता धारक कर्मचारी आवश्यक असल्याने आयबीपीएस कंपनीची निवड केली आहे. यासाठी वयाची अट ३५ वरून ३८ करून घेण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २१ ते ३८ वयोगटातील तरुण-तरुणींनी याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा. इच्छुक उमेदवारांच्या बँकिंग क्षेत्रातील परीक्षेची भीती घालवण्यासाठी जिल्हा बँकच्यावतीने जिल्हाभरात तीन ठिकाणी मार्गदर्शन करणारी शिबिरे किमान आठ आठ दिवसांची घेण्यात येणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
चौकट
उद्यापासून अर्ज प्रक्रियेस सुरवात
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या www.sindhudhurgdcc.com या संकेत स्थळावर शुक्रवारी (ता.५) पहाटे ५ वाजल्यापासून ते ३० सप्टेंबर २०२५ रात्री १२ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ठेवण्यात आली आहे. अर्ज दाखल करताना अधिवास प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक आहे. एकूण १०० गुणांची परीक्षा होणार आहे. ९० गुण लेखी परीक्षा आणि १० गुण मुलाखतीसाठी राहतील. यातील ५ गुण अनुभवाला प्राधान्य देण्यासाठी असणार आहेत. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडल्यावर लेखी परीक्षा होईल. परीक्षा केंद्रे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोवा येथे असणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.