टाकळ्यापासून साकारले चविष्ट मोदक

टाकळ्यापासून साकारले चविष्ट मोदक

Published on

swt42.jpg
89435
टाकळा या रानभाजीपासून तयार केलेले मोदक.
swt43.jpg
89436
मोदक बनविताना जाई नाईक.

रानभाजी टाकळ्यापासून साकारले चविष्ट मोदक
वायंगणीतील जाई नाईक या गृहिणीचा प्रयोग; खवय्यांना चाखता आली नवी चव
एकनाथ पवारः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ४ः जिल्ह्यातील वायंगणी तळेकरवाडी येथील जाई सुनील नाईक या महिलेने ‘टाकळा’ या रानभाजीपासून चविष्ट मोदकांची निर्मिती केली आहे. टाकळ्यापासून प्रथमच मोदक बनविले असून यावर्षीच्या गणेशोत्सवात आंबा, काजू, फणसांच्या मोदकांसोबत टाकळ्यापासून बनविलेल्या मोदकांची चव देखील ग्राहकांना चाखता आली.
गणेशोत्सव काळात मोदकांना मोठी मागणी असते. गेल्या काही वर्षांमध्ये आंबा, काजू, फणस या कोकणातील तीन महत्त्वपूर्ण फळांपासून मोदकांची निर्मिती केली जात होती. जिल्ह्यात शेकडो उद्योजक या काळात मोदक निर्मिती करतात. त्यातून कोट्यवधीची उलाढाल होते; परंतु या यादीत आणखी एका महत्त्वपूर्ण मोदकांची नोंद यावर्षी झाली आहे. कोकणात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रानभाज्या मिळतात. कोकणातील प्रमुख रानभाज्यांमध्ये टाकळ्याचा समावेश आहे.
या रानभाजीला विविध भागांनुसार नावे आहेत. (कॅशिया टोरा) टायकुळ, टायकाळा, तरोटा, तरवड अशा विविध नावांनी देखील या वनस्पतीला ओळखले जाते. या टाकळ्याचा अधिकतर उपयोग भाजीकरिता केला जातो; परंतु याच टाकळ्यांपासून वायंगणी तळेकरवाडी येथील नाईक या गृहिणीने चवदार मोदकांची यशस्वी निर्मिती केली आहे. यामध्ये त्यांनी टाकळा भाजी, खोबरे, गुळ, तुप आणि वेलचीचा उत्कृष्ट मिश्रण केले आहे. यावर्षी जाई यांनी वेंगुर्ल्यासह विविध बाजारपेठांमध्ये टाकळ्यांच्या मोदकांची तीनशे पाकिटांची विक्री केली. २१ मोदकांच्या एका पाकिटाची किंमत त्यांनी ८० रूपये इतकी ठेवली होती.

चौकट
रानभाजी पाककलेत सिंधुदुर्गामध्ये प्रथम
वसुधंरा विज्ञान केंद्राच्या वतीने रानभाजी महोत्सव आणि पाककला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सौ. नाईक यांच्या टाकळा मोदकाला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला. त्यामुळे या मोदकांची चर्चा सर्वदूर पोहोचली आहे.

चौकट
मोदकाला सासू, सासऱ्यांचे नाव
सौ. नाईक यांनी अतिशय उत्कृष्ट मोदक बनविले असून हे मोदक त्यांनी ‘शिवप्रभा’ नावाने बाजारपेठेत आणले आहेत. त्यांच्या सासऱ्याचे नाव शिवराम होते तर सासूचे नाव प्रभा आहे. त्यामुळे त्यांनी ‘शिवप्रभा’ असे नाव या ब्रँडला दिले आहे.

कोट
रानभाज्यांचा केवळ भाजीचा वापर न होता तो विविध माध्यमातुन उपलब्ध करून देण्यासाठी मोदकाचा हा प्रयोग केला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात आम्ही हे उत्पादन ग्राहकांना उपलब्ध करून दिले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात मोदक निर्मिती केली जाणार आहे
- जाई नाईक, मोदक उत्पादक, वायगंणी तळेकरवाडी

एक नजर...
* टाकळ्यापासून मोदकनिर्मितीचा कोकणातील पहिला प्रयोग
* टाकळा वनस्पती औषधी
* विविध आजारांवर या वनस्पतीच्या पाने, फुले, बिया, मुळे यांचा वापर
* या वनस्पतीला आयुर्वेदात खूप महत्त्व
* पावसाळ्यात कोकणातील प्रत्येकाच्या आहारात ही रानभाजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com