ग्राऊंड रिपोर्ट
-rat४p२०.jpg-
25N89523
रत्नागिरी : हेड पोस्ट ऑफिससमोरील पार्किंग झोन.
-rat४p२१.jpg-
25N89524
रामआळी-मारूती आळी जोडणारा पार्किंग झोन.
-rat४p२२.jpg-
25N89525
एसटी स्टॅंडसमोर पार्किंग झोन केला आहे; मात्र एसटी बसेस आल्यानंतर या ठिकाणी अनेकदा वाहतूककोंडी होते.
---
ग्राऊंड रिपोर्ट ....लोगो
सणासुदीला किंवा कोणत्याही उत्सवाला रत्नागिरी शहरात यायच म्हटंल की, कुठे वाहने लावायची (पार्किंग) या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागते. त्यामुळे खरेदीला किंवा फिरायला येणाऱ्यांच्या उत्साहावर विरजण पडते. गेल्या २० वर्षांपासून नेहमी भेडसावणाऱ्या या प्रश्नाकडे पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. वाढते शहरीकरण आणि वाहनांच्या वाढत्या संख्येचा विचार करून शहरात पार्किंगसाठी आरक्षित असलेले २० भूखंड अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. २० वर्षांमध्ये शहरामध्ये पालिकेने फक्त सहा भूखंडच पार्किंगची विकसित केली आहेत. पे अॅण्ड पार्कचा तर पत्ता नाही आणि पार्किंगची ठिकाणे बाजारपेठ सुरू होण्यापूर्वी फुल्ल झालेली असतात. खरेदीसाठी येणाऱ्यांना गाड्या लावायला जागाच शिल्लक नसते. त्यात अन्यत्र रिकाम्या जागेवर वाहने लावल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून नो-पार्किंग म्हणून दंडात्मक कारवाई होते. मग शहरात वाहने पार्किंग करायची कुठे, या समस्येने वाहनधारक हैराण आहेत. पालिका आणि वाहतूक पोलिस याचा विचार करणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- राजेश शेळके, रत्नागिरी
---
शहर वाढलं… पार्किंग मात्र गायब!
रत्नागिरीत नियोजनाचा अभाव ; वाहनतळाची संख्या कमी, २० आरक्षित जागा
रत्नागिरी शहराचा गेल्या २० वर्षांमध्ये चांगलाच विस्तार झाला आहे. आजूबाजूच्या परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. निवासी, व्यापारी इमले, संकुलांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ही संख्या आता ३० हजारांकडे गेली आहे. त्या तुलनेत पायाभूत सुविधाही विकसित केल्या जात आहे. भविष्यात २५ ते ३० वर्षांचा विचार करून शहराचा आराखडा तयार केला जात आहे. एकीकडे शहराचा चेहरामोहरा बदलत असताना मोठी उणीव भासते ती वाहन पार्किंगची. वाहनं ही माणसांची गरज बनली आहे. दळणवळणाचे मुख्य साधन आहे. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहने आहेत; परंतु या सर्वांचा सारासार विचार केला तर रत्नागिरी शहराच्या मुख्य बाजारपेठेत कमालीची सुधारणा झाली आणि हळूहळू विस्तार होत आहे. बाजारपेठ वाढत चालली आहे; परंतु त्या तुलनेत पार्किंगची सोय पालिकेकडून करण्यात आलेली नाही. पार्किंगसाठी शहरामध्ये जवळपास २० आरक्षित जागा आहेत; परंतु गेल्या २० वर्षांमध्ये त्यापैकी दोन-चार जागाच विकसित झाल्या आहेत.
---
* सण, उत्सवाला समस्या
गणेशोत्सव, आषाढी एकादशी, शिमगोत्सव, दिवाळी, दसरा, पडवा, दहीहंडी आदी सणासुदींसाठी शहरात मोठ्या प्रमाणात लोकं खरेदीला किंवा फिरायला येतात. तेव्हा प्रामुख्याने ही समस्या जाणवते. पालिकेने शहरामध्ये गेल्या २० वर्षांमध्ये फक्त आठवडा बाजार, मारुती मंदिर, पोस्ट ऑफिससमोर, रामआळी, कलेक्टर कंपाउंड, एसपी ऑफिस या ठिकाणी पार्किंग व्यवस्था आहे. मुख्य रस्त्याच्या बाजूला दुचाकीसाठी पार्किंग आहे. ते स्थानिक लोकांच्या गाड्यांनीच फुल्ल होते. खरेदी किंवा फिरायला येणाऱ्यांना वाहने लावण्यासाठी पार्किंगच मिळत नाही. या समस्येचा परिणाम थेट बाजारपेठेवर होत असून, अनेक ग्राहक प्रशस्त पार्किंग असलेल्या मॉल किंवा अपना बाजारात खरेदीसाठी जाणे पसंत करत आहेत.
*प्रमुख ठिकाणी पार्किंगचा अभाव
रत्नागिरी शहरातील नाचणे, मिरजोळे एमआयडीसी, राममंदिर रोड, साळवीस्टॉप, थिबा पॅलेस, जुना बसस्टँड परिसर, जयस्तंभ चौक या ठिकाणी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना पार्किंगची सोय अपुरी आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अनधिकृतपणे वाहने लावली जात असल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो आणि अपघातांची शक्यता वाढते. शहरात सर्वत्र नो पार्किंगचे बोर्ड आहेत; परंतु पार्किंगसाठीचे बोर्ड दिसत नाहीत. त्यामुळे पार्किंगसाठीचे भूखंड विकसित करण्याची गरज आहे.
*पार्किंग नसल्याने वाहतूककोंडी
पालिकेचे जेमतेम पार्किंग प्लॉट आहेत ते आधीच फुल्ल झालेले असतात. परिणामी, पार्किंग जागा नसल्याने अनेक वाहनधारक गाड्या रिकाम्या जागांमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला उभी करतात. आधीच रस्त्यामध्ये फळ, भाजीपाला विक्रेते बसलेले असतात. त्यापुढे वाहने लागतात. अर्धा रस्ता त्याने व्यापतो आणि वाहतूककोंडी निर्माण होते. त्यामुळे वाहतूक पोलिस आणि पालिकेने हॉकर्स झोन तयार करून दिले तरच ही कोंडी फुटण्याची शक्यता आहे.
* कारवाईमध्येच अधिक रस
एकीकडे वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतूक शाखेकडून जोरदार दंडात्मक कारवाई सुरू आहे. पार्किंगचे अनेक प्लॉट आरक्षित आहेत; मात्र त्यांचा विकास झालेला नाही. त्यामुळे नो पार्किंगची कारवाई होते; परंतु पार्किंगसाठी कुठे जागा आहे हे दाखवणारी कोणतीच यंत्रणा कार्यरत नाही. वाहतूक कोंडी सोडवण्यापेक्षा पोलिसांना कारवाईतच रस असल्याचे दिसते. त्यामुळे मुख्य उद्देश बाजूला राहून शहरातील वाहतुकीवर त्याचा परिणाम होत असल्याचे वाहनधारकांचे मत आहे.
*...असे नियोजन हवे
एकीकडे वाहतूक पोलिस नो पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांवर कारवाई करतात तर दुसरीकडे पालिकेने शहरात चार ते पाचच ठिकाणी पार्किंगचे प्लॉट विकसित केले आहेत. त्या जागा नेहमी वाहनांनी भरलेल्या असतात. त्यामुळे बाजारात खरेदीला आल्यास वाहने पार्किंग करण्याचे असे बोर्डच दिसत नाहीत. पालिकेशी समन्वय करून वाहतूक शाखेने आदी पार्किंगच्या जागा विकसित केल्या पाहिजेत. त्यानंतरही नो पार्किंगमध्ये वाहने लावली तर कारवाई केली पाहिजे असे नियोजन करण्याची गरज आहे.
*तज्ज्ञांचे मते अन् उपाययोजना
शहर नियोजन तज्ज्ञांच्या मते, रत्नागिरीसारख्या शहरात ‘मल्टीलेव्हल पार्किंग’, ‘पेडपार्किंग झोन्स’ तसेच ‘वनवे ट्रॅफिक सिस्टिम’ लागू करणे गरजेचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेने वाहनांवरील करामधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही हिस्सा पार्किंगसाठी खर्च करावा, अशी शिफारसही त्यांनी केली आहे.
कोट...
शहराचा विस्तार होत असल्याने पालिकेने शहरातील पार्किंगचे प्लॉट विकसित करण्याची गरज आहे; परंतु त्या तुलनेत असलेले पार्किंग प्लॉट कमी पडत आहेत. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना पार्किंग मिळत नाही म्हणून बाजारात येत नाहीत. त्याचा बाजारपेठेवरही परिणाम होत आहे. ग्रामीण भागातून येणारी व्यक्ती त्यालाही निश्चित कुठे वाहन पार्किंग करायचे हे माहीत नसते. नको तिथे वाहन लावले की, वाहतूक पोलिसांकडून कारवाई होते. हे सर्व कुठेतरी थांबायला हवे.
- नीलेश भोसले, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
कोट
शहरात पार्किंगसाठी असलेले आरक्षित प्लॉट पालिकेने विकसित केल्याशिवाय पार्किंगचा प्रश्न सुटणार नाही. पोलिसांना दंड देण्यापेक्षा लोक पे अॅण्ड पार्किंग केले तर तिथे पैसे भरतील; पण कोणाला याचे गांभीर्य नाही. कित्येक वर्षे आम्ही याबाबत ओरडतोय. पार्किंग मिळत नसल्याने ग्राहक तुटत आहेत. पोस्टाजवळ पार्किंग आहे ते रिकामे असते. शांती सुपरमार्केटसमोर फेरीवाले बसल्यामुळे तिथे पार्किंग करून दिले जात नाही. हे काम कोणाचे आहे, कोण लक्ष देत नाही.
- गणेश भिंगार्डे, शहराध्यक्ष, व्यापारी महासंघ
कोट
शहरामध्ये पार्किंगसाठी आरक्षित असलेले भूखंड लवकरच विकसित केले जाणार आहेत तसेच पे अॅण्ड पार्किंगचाही आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे पार्किंगची समस्या कमी होईल. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यावर आमचा भर आहे.
-वैभव गारवे, मुख्याधिकारी, रत्नागिरी पालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.