बिग स्टोरी- चिपळूण शहराची पुरातून सुटका नाहीच !

बिग स्टोरी- चिपळूण शहराची पुरातून सुटका नाहीच !

Published on

(बिग स्टोरी)


- rat५p१.jpg-
२५N८९६३५
चिपळूण : वाशिष्ठी नदीतील गाळ काढून सुद्धा चिपळूण शहराला पुराने व्यापले. (संग्रहित)
- rat५p४.jpg-
२५N८९६३८
शहरात भरलेले पुराचे पाणी.(संग्रहित)
- rat५p५.jpg-
२५N८९६३९
बाजारपुलापर्यंत आलेले पाणी. (संग्रहित)
----
चिपळूण शहराची महापूरातून सुटका करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवण्यात आल्या तरी १२ ऑगस्टच्या झालेल्या मुसळधार पावसानंतर शहरात पाणी भरले आणि चिपळूणकरांच्या आशेवर पाणी फेरले गेले. शासनाने आजवर केलेल्या उपाययोजनांमुळे पुराच्या पाण्याचे काही प्रमाणात नियंत्रण झाले; मात्र शंभर टक्के सुटका झाली नाही. कदाचित पाऊस वाढला असता तर शहरातील पाण्याची पातळी आणखी वाढली असती, हेही मान्य करायला हवे. सुदैवाने, दुपारनंतर पाऊस थांबला, पाण्याचा निचरा झाला आणि शहरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. पूरनियंत्रणासाठी अनेक उपाययोजना सुरू आहेत त्या निरंतर चालणाऱ्या आहेत. या सर्व गोष्टी पूर्ण झाल्यावर पूर येणारच नाही, अशी कुठलीच यंत्रणा, अभ्यासक छातीठोकपणे सांगत नाही. मुसळधार पाऊस झाला तर चिपळूणमध्ये पूर येणारच. तो रोखायचा असेल तर मोडक समितीने सुचवलेल्या उपाययोजनांकडे लक्ष देण्याची गरज आहे, असाही एक मतप्रवाह आहे.

- मुझ्झफर खान, चिपळूण
......
चिपळूणवर पुराची टांगती तलवार कायम
कोट्यवधी खर्च ; उपायांमुळे तीव्रता कमी, ‘मोडक समिती’च्या शिफारशींचे काय

नाही नाही म्हणत यावर्षी वाशिष्ठी नदीच्या पाण्याने चिपळूणच्या वेशीला शिवले. तीस ते पस्तीस फुटाची अभूतपूर्व पाणीपातळी पाहिलेले चिपळूण शहर पाच ते सात फुटाच्या पाणीपातळीला घाबरत नाही; पण चिपळूणमधील नागरिकांनी अजून कितीवेळा महापूर अनुभवायचा, हा प्रश्न आहे. पूरमुक्त चिपळूणसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना अनेकवेळा महापुराचा कटू अनुभव घेतल्यानंतरही पुन्हा पूर म्हणजे आता नागरिकांच्या डोक्यावरून पाणी चालले आहे. पाऊस थांबत नाही? कोळकेवाडी धरणातून पाणी सोडले जाते म्हणायचे की, इथल्या स्वयंघोषित अभ्यासकांचे मत विचारात घ्यायचे? शहरातील नागरिकांनी विश्वास नेमका कोणावर ठेवायचा, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शहरात पूर येण्यासाठी सह्याद्रीचे खोरे आणि शहराच्या परिसरात २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस व्हावा लागतो. गेल्या वर्षी अनेक ठिकाणी २४ तासात पावसाने २०० पेक्षा जास्त सरासरी गाठली तरीही शहरात पाणी भरले नाही. यावर्षी कळकवणे मंडळ वगळता कुठेही पावसाने २४ तासात २०० मि. मीटरची सरासरी गाठली नाही तरीही शहरात पाणी भरले. हा पाऊस शहरात पूर भरण्याइतपत नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. तरीही शहरात पाणी भरले. कमी कालावधीत झालेला जास्त पाऊस शहरात पाणी भरण्यास कारणीभूत ठरत आहे
....
(१२ ऑगस्ट रोजी)
*२४ तासांत झालेला पाऊस
चिपळुणात* १६२ मि. मी.
खेर्डी* १५७ मि.मी.
सावर्डे* १६२ मि.मी.
वहाळ* १३५ मि.मी.
असुर्डे* १६२ मि.मी
रामपूर* १६४ मि.मी.
कळकवणे* २०० मि. मी.
शिरगांव* १८३ मि.मी.
मार्गताम्हाणे* १४९ मि.मी.
----
सरासरी* १६२.४ मि. मी.
...........
यापूर्वीचे पर्जन्यमान
२०२२ मध्ये सहा जुलैला २४ तासात सर्वोच्च पाऊस कोळकेवाडी धरण परिसरात १८९ मि. मी. तर पोफळी येथे त्याच दिवशी १६२ मि. मी. पडला होता. २०२३च्या पावसाळी हंगामात कोळकेवाडी धरण परिसरात १९ जुलै रोजी २२७ मि.मी. तर पोफळी येथे त्याच दिवशी २४५ मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली होती. यावर्षीच्या हंगामात १६ ऑगस्ट रोजी कोळकेवाडीत २३० मि. मी. आणि १९ ऑगस्ट रोजी पोफळीत १८४ मि. मी. अशी सर्वोच्च नोंद झाली आहे. मंगळवारी कोळकेवाडी येथे चोवीस तासात पडलेला २३० मि.मी. पाऊस २०२३ आणि २०२४च्या पर्जन्यमानापेक्षा कमी होता. त्या दिवशी वाशिष्ठीच्या २ हजार १६९ चौरस किलोमीटरएवढ्या अवाढव्य खोऱ्यामध्ये २०० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला असण्याची शक्यता आहे.

*ढगफुटीसारखा पाऊसच कारणीभूत
वाशिष्ठी पात्रात एकूण पाच ठिकाणच्या खोऱ्यांतून पावसाचे पाणी येते. खेडच्या पंधरागावमधून, तिवरे, कोळकेवाडी, पोफळी आणि अडरे-अनारी या भागातून आलेले पाणी हे वाशिष्ठी नदीला मिळते. यातील फक्त कोळकेवाडी धरण आणि पोफळीतील वळण बंधारा त्या खोऱ्यातील पाणी नियंत्रित करते; मात्र पोफळीतील धरण गाळाने भरलेले आहे. उर्वरित ठिकाणचे पाणी थेट नदीला येऊन मिळते शिवाय पोफळी आणि कोळकेवाडी येथील पाऊस धरण व्यवस्थापन विभागाकडून मोजला जातो. उर्वरित ठिकाणची मोजदाद नाही. मंगळवारी पुराच्यावेळी दसपटीतून वाहणाऱ्या नद्यांतील पुराचे रौद्ररूप त्या खोऱ्यात झालेल्या अतिवृष्टीचे परिणाम दर्शवणारे ठरतात. त्यामुळे पावसाची समोर आलेली आकडेवारी कमी दिसत असली तरी उर्वरित खोऱ्यामध्ये ढगफुटीसारखा झालेला पाऊसच मंगळवारच्या पुराला काहीसा कारणीभूत ठरला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

*बाजारपेठेचा अभ्यास आवश्यक
चिपळूणला यापूर्वी २००५, २००६, २०१९ आणि २०२१ असा चारवेळा महापूर येऊन गेला आहे. २००५च्या अगोदरही चिपळूणला महापूर येऊन गेले आहेत. १९८९च्या पुरानंतर चिपळूण शहरासाठी कृती आराखडा तयार केला गेला. बाजारपेठ स्थलांतरित करण्याचे सुचवण्यात आले. अर्थातच, स्थानिकांनी ही खर्चिक बाब असल्याने त्यास नकार दिला. त्यामुळे प्रशासनाने वाशिष्ठी नदीची पूररेषा निश्चित केली. यात बाजारपेठ पूररेषेत असल्याचे निश्चित करण्यात आले. त्याचा नागरिकांना तोटा झाला. विमा भरपाईत अडचणी निर्माण होत गेल्या. त्या वेळी चिपळूण फार विस्तारलेले नव्हते. आता चिपळूणची लोकसंख्या आणि विस्तार खूप वाढला आहे. बाजारपेठेत वाढीसाठी वाव नसल्यामुळे कुठे डोंगर पकडून तर कुठे पाणथळ जागेत भर टाकून शहर विस्तारत आहे. येथे होलसेल व रिटेल बाजार चालतो.
जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आणि सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून चिपळूणची ओळख आहे. मुसळधार पाऊस झाल्यानंतर वाशिष्ठी नदीचे पाणी शहरात येतेच त्याशिवाय शहरात नवनवीन ठिकाणी पाणी भरत आहे. चिपळूण शहराचा आकार कपबशीसारखा आहे. शहराच्या चारही बाजूने डोंगर आहे. डोंगरावरून येणारे पाणी वाशिष्ठी नदीला जाऊन मिळते. चिपळूण शहर पूर्वी तळ्यांचे शहर म्हणून ओळखले जायचे. डोंगरावरून येणारे पाणी या तळ्यांमध्ये साचले जायचे. तळी फूल भरल्यानंतर ते पाणी वाशिष्ठी नदीकडे जायचे. हल्ली शहरात केवळ नावालच तळी उरल्या आहेत. ९० टक्केहून अधिक तळी विकासाच्या नावाखाली बुजवून त्या ठिकाणी इमारती बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे डोंगरावरून येणारे पाणी शहरात न साचता थेट वाशिष्ठीकडे जाण्यासाठी मार्ग शोधत असते; मात्र या पाण्याच्या मार्गात अनेक अडथळे असल्यामुळे शहरात पाण्याचा फुगवटा मारतो आणि शहरात पाणी साचते. या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. शहरातील नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमणे आणि पूरपट्ट्यातील अनधिकृत बांधकामे असे अनेक घटक याला कारणीभूत आहेत. यावर जशी ठोस कारवाई होत नाही तशीच ती पुराच्या पाण्यावर उपाययोजना म्हणूनही होत नाही, हे नागरिकांचे दुर्दैव आहे

*मोडक समिती शिफारशींवर कार्यवाही आवश्यक
जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुराचा अभ्यास करण्यासाठी सरकारकडून मोडक समिती स्थापन करण्यात आली. या समितीने यापूर्वी आलेले पूर आणि त्या वेळचा पाऊस यांचा तुलनात्मक अभ्यास करत काही निष्कर्ष काढले. उपाययोजनांसह काही शिफारशीही सुचवत शासनाला १२८ पानी अहवाल सप्टेंबर २०२२मध्ये सादर केला. त्यातील मानक कार्यप्रणाली म्हणजे भरती-ओहोटीवर कोळकेवाडी धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्याचे नियोजन सोडले तर आजतागायत या अहवालावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही. पावसाळ्यापूर्वी एनडीआरएफचे पथक येणे, गाळ काढणे, रेड अलर्ट असताना प्रशासन सतर्क असणे या पलीकडे महापुरावर उपाययोजना होत नाहीत. अतिवृष्टीच्या काळात एनडीआरएफचे पथक नाईक कंपनी येथील वाशिष्ठी नदीची पाहणी करतात, पाण्याची पातळी मोजून नागरिकांचे सांत्वन करतात.

*पूरनियंत्रणासाठी झालेले प्रयत्न
मोडक समितीने जून ते ऑगस्ट २०२२ या तीन महिन्यात येऊन गेलेले पूर आणि त्या वेळचा पाऊस यांचा तुलनात्मक अभ्यास करत काही निष्कर्ष काढले. उपाययोजनांसह काही शिफारशीही सुचवत शासनाला १२८ पानी अहवाल सप्टेंबर २०२२मध्ये सादर केला; मात्र त्यातील मानक कार्यप्रणाली म्हणजे भरती-ओहोटीवर कोळकेवाडी धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्याचे नियोजन सोडले तर आजतागायत या अहवालावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही. नदीपात्रातील अतिक्रमणे हटवून पाण्याचा प्रवाह विनाअडथळा निर्माण करणे, हा महापूर रोखण्याचा पहिला उपाय आहे; परंतु सध्या अनेक ठिकाणी नदीतच सिमेंटची बांधकामे केली जात आहेत. भरतीच्यावेळी वाशिष्ठीच्या पुराचा निचरा न होण्याची आणि फुगवटा मारण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील महत्त्वाचे कारण हे की, वाशिष्ठीच्या उपनद्यांच्या खोऱ्यात किती पाऊस झाला आणि त्याचा वाशिष्ठी पुरावर एकत्रित परिणाम काय होतो, तेही बघणे आवश्यक आहे. वाशिष्ठीचे खोरे हे २१६९ चौरस किलोमीटरएवढे अवाढव्य असून, जगबुडी नदी ही वाशिष्ठीची उपनदी आहे. जगबुडी पूरपरिस्थितीच्या काळात वाशिष्ठी नदी धोक्याच्या पातळीवरून अधिकच्या १.५ मीटरने वाहत असते. शेवटी हे पाणी करंबवणे खाडीत वाशिष्ठीला मिळते. त्याचाही मोठा परिणाम चिपळूण शहरातील पुराच्या पाण्याचा निचरा लवकर न होण्यावर होतो. जलसंपदा विभागाने गेल्या चार वर्षात वाशिष्ठी नदीतून टप्पा क्रमांक १ आणि दोनमधून २०.३८ लाख घनमीटर गाळ उपसा केला असून, त्यावर १३ कोटी ४१ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. मुरादपूर परिसराला वाशिष्ठी नदीत २० कोटीची भिंत उभारून संरक्षण दिले गेले. वाशिष्ठीचा जुना पूल तोडण्यात आला. कोळकेवाडीचे अवजल नियंत्रित करण्यात आले.

*पुराची सर्वसाधारण कारणे
वाशिष्ठीसह शहरातील नाल्यात झालेले अतिक्रमण, शहरातील पाण्याचा वेळेवर निचरा न होणे, महामार्गाचे चुकीचे काम ही सर्वसाधारण पुराची कारणे समोर येत आहेत.

*जागतिक तापमानवाढीचे बदल,
अतिवृष्टी, अकस्मात ढगफुटी, खाड्या नद्या, ओढे यांची बदललेली रचना, गाळाने भरलेल्या नद्या, तुंबलेली व अरुंद झालेली गटारे.

*बचाव समितीची भूमिका महत्त्वाची
चिपळूण शहराला महापूरातून मुक्त करण्यासाठी चिपळूण बचाव समितीने सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून अनेक उपाययोजना केल्या आहेत. बचाव समितीच्या पाठपुराव्यामुळे मोडक समिती नेमली गेली. कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची एसओपी कार्यरत झाली. वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यात आला. नदीकिनारी संरक्षक भिंती बांधण्यात आल्या. शिवनदीतून गाळ करण्यास सुरुवात झाली. शहरातील नाले स्वच्छ करण्याची मोहीम अधिक तीव्र झाली.
---
- rat५p२.jpg-
२५N८९६३६
कोट
नव्या पूररेषेनुसार, शहरात नवीन बांधकाम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यावर पळवाट म्हणून जुन्या इमारती पाडून तेथे नव्या इमारती बांधल्या जात आहेत. या इमारती बांधताना इमारतीच्या चारही बाजूने संरक्षण भिंती बांधल्या जात आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी अडून त्या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. नवीन इमारत बांधताना पार्किंगला संरक्षण भिंत असू नये.

बापू काणे, माजी उपनगराध्यक्ष चिपळूण पालिका
....

- rat५p३.jpg-
२५N८९६३७
कोट
पालिका दरवर्षी नाले, पऱ्हे स्वच्छ करते; मात्र पूर ओसरल्यानंतर त्या नाले आणि पऱ्हेत प्लास्टिक बाटल्या आणि इतर कचऱ्याचा खच दिसतो. आम्ही यावर्षी प्लास्टिकमुक्तीची मोहीम शहरात राबवली. त्याशिवाय महापूरावर अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्याचा चांगला परिणाम यावर्षी दिसून आला आहे.
विशाल भोसले, मुख्याधिकारी चिपळूण पालिका
---
- rat५p६.jpg-
P२५N८९६४०
कोट
पुरामुळे शहराचा विकासदर कमी होत आहे. त्याचा परिणाम गुंतवणुकीवर झाला आहे. सरकारने चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी विशेष पॅकेज द्यावे. त्यातून आम्ही आवश्यक उपाययोजना करून घेऊ.
राजेश वाजे, अध्यक्ष चिपळूण बचाव समिती.
---
- rat५p७.jpg-
P२५N८९६४१
कोट
केवळ गाळ काढून पूर थांबणार नाही. महापुरातून १०० टक्के सुटका हवी असेल तर वृक्षतोड थांबली पाहिजे. नवीन वृक्षतोड झाली पाहिजे. नद्यांचे आणि नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन व्हायला पाहिजे. चिपळूण हे तळ्यांचे शहर होते ही ओळख पुसली जात आहे, ही दुर्दैवाची बाब आहे.
समीर कोवळे, पर्यावरणप्रेमी, चिपळूण
---
- rat५p८.jpg-
२५N८९६४२
कोट
कोळकेवाडी धरणाच्या पाण्यामुळे वाशिष्ठीला पूर येतो, अशी ओरड यापूर्वी केली जात होती; परंतु आता अतिवृष्टीच्या काळात कोयना प्रकल्पातील वीजनिर्मिती नियंत्रित केले जाते. तरीही शहरात पाणी भरत असेल तर त्या कारणांचा शोध घेतला पाहिजे.
संजय चोपडे, मुख्य अभियंता, महानिर्मिती पोफळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com