सिंधुदुर्गात २८ हजार ''लखपती दीदी''
सिंधुदुर्गात २८ हजार ‘लखपती दीदी’
उमेद अंतर्गत सर्वेक्षणः कौटुंबिक उत्पन्न लाखापेक्षा जास्त
विनोद दळवीः सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ५ः उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २८ हजार १२३ महिलांचे कौटुंबिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त झाले आहे. अभियान अंतर्गत ‘लखपती दीदी’ म्हणून मार्च २०२५ अखेर केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती पुढे आली आहे.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील गरीब, गरजू, वंचित, घटस्फोटीत, विधवा अशा महिलांचे स्वयंसहायता समूह तयार करून त्या समुहांना दशसूत्रीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते. या माध्यमातून महिलांना बचतीची सवय लावणे, अंतर्गत कर्ज वितरण करणे, उपजीविकेची माध्यमे उपलब्ध करून देणे व महिलांच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावणे, महिलांना कुटुंबात आणि समाजात सन्मानाची वागणूक मिळून त्यांना स्वाभिमानी जीवन जगता यावे, या उद्देशाने उमेद अभियानात यंत्रणा परिश्रम घेते. ग्रामीण भागातील महिलांना बचतगट समुहाच्या माध्यमातून संघटित करून त्यांना विविध व्यवसायाभिमुख प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी आवश्यक भांडवल पुरविले जाते.
बचतगट समुहाच्या माध्यमातून संघटित झालेल्या महिला आर्थिक परिस्थितीने गरीब असतात. त्यांना विविध स्वयंरोजगार देऊन आर्थिक सक्षम करण्याचा अभियानाचा उद्देश आहे. अशाप्रकारे जिल्ह्यातील एक लाख ३ हजार ९६० महिला समुहाच्या माध्यमातून संघटित झालेल्या आहेत. जिल्ह्यात ५० प्रभाग संघ असून त्यात ५७२ ग्रामसंघ कार्यरत आहेत. एवढ्या ग्राम संघाअंतर्गत ९ हजार ८७२ महिला समूह सक्रियपणे काम करीत आहेत. हे महिला समूह विविध प्रकारचे व्यवसाय करीत आहेत. त्यातून त्यांनी स्वयंरोजगार निर्माण केला असून, त्यांना आपला आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत होत आहे.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या राज्यस्तरीय कक्षाने लखपती दीदी अंतर्गत सिंधुदुर्ग कक्षाला कार्यरत महिला समुहातील २७ हजार ७९३ महिलांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त करण्याचे उद्दिष्ट दिले होते. यात सिंधुदुर्ग जिल्ह्याला १०० टक्के यश आले आहे. जिल्ह्यातील २८ हजार १२३ महिलांच्या कुटुंबांचे एक लाखापेक्षा जास्त कौटुंबिक उत्पन्न झाले आहे. उद्दिष्टांच्या १०१.८२ टक्के काम झाले आहे.
चौकट
७५ हजारांचा जोखीम निधी
महिला समुहातील एस.सी. आणि एस.टी. प्रवर्गातील महिलांना जोखीम प्रवणता निधी वितरित करण्याची तरतूद आहे. या प्रवर्गातील महिलांची आर्थिक स्थिती खूपच नाजूक असल्यास हा जोखीम प्रवणता निधी दिला जातो. यात ७५ हजार रुपये एवढे अनुदान दिले जाते. हा निधी परतफेड करायचा असून त्याला व्याज नाही.
कोट
जिल्ह्यातील महिला समूह चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. केवळ शासकीय योजनेचा फायदा उठविण्यासाठी हे समूह कार्यरत नाहीत. त्यामुळेच २०२४-२५ या आर्थिक वर्षात २८ हजारपेक्षा जास्त महिला लखपती दीदी बनल्या आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखांच्या वर गेले आहे.
- वैभव पवार, जिल्हा समन्वयक, ''उमेद'' सिंधुदुर्ग कक्ष
............................
चौकट
तालुकानिहाय लखपती दीदी
तालुका*उद्दिष्ट*साध्य
देवगड*३९८१*४१०३
कुडाळ*४१७२*३८३५
सावंतवाडी*४१७३*४५७९
वेंगुर्ले*३१२०*२९९०
दोडामार्ग*२२०९*२६११
कणकवली*४३५२*४०९३
मालवण*३९३५*४०४७
वैभववाडी*१६४१*१८६५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.