शहरातील अडचणींचा विचार करुन वृक्ष लागवड करा
शहराचा विचार करून वृक्ष लागवड करा
नागरिकांची मागणी ; रस्त्यांच्या कडेला लागवड अडचणीची
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ ः यावर्षी नगर पालिकेने शहरातील विविध भागात १ हजार २०० वृक्षांची लागवड करण्याचा निर्धार केला आहे. हे उदिष्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे; मात्र बऱ्याच ठिकाणची वृक्ष लागवड मोठ्या रस्त्यांच्या कडेलाच केली जात असल्याने भविष्यात अडचणी येणार आहेत. त्यामुळे भविष्यातील अडचणींचा विचार करून वृक्ष लागवड करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
सर्वत्र होणारी वृक्षतोड, त्या बदल्यात न होणारी लागवड याचा परिणाम वातावरणावर होत आहे. दरवर्षी उष्म्यात मोठी वाढ होताना दिसत आहे. यावर्षी तर उष्म्याने अधिकच हैराण केले होते. वातावरणातील बदलाचा परिणाम म्हणून अवकाळी पावसाने मे महिन्यात १० दिवस तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे काही निसर्गप्रमी सातत्याने पालिका व वनविभागाकडे पत्रव्यवहार करून वृक्ष लागवड करण्याची मागणी करत आहेत तसेच बदलणाऱ्या पर्यावरणाला पूर्वपदावर आणण्यासाठी पावसाळ्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याच्या सूचना शासनस्तरावरून केल्या जात आहेत.
दरवर्षी पालिकेच्या उद्यानविभागाच्या माध्यमातून जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून वृक्ष लागवड केली जाते. यावर्षी १२०० वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार उद्यानविभागाचे प्रमुख प्रसाद साडविलकर यांनी ताम्हण, बांबू, फणस, आंबा, चिंच, काजू आदी प्रकारची वृक्ष येथे उपलब्ध केली आहेत. त्यांच्या लागवडीचा प्रारंभ ५ जूनला केला. तेव्हापासून वृक्ष लागवड सुरू झाली आहे; मात्र पालिकेने उपलब्ध केलेली बहुतांशी झाडे ही मोठा विस्तार होणारी आहेत. ती शहरातील मुख्य रस्त्यांच्या अगदी कडेला लावण्यात आली आहेत. त्यामुळे भविष्यात ती बहरल्यानंतर त्यांच्या फांद्या रस्त्यांवर, विद्युततारांवर पडण्यासह झाडे पडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वी भरबाजारपेठेत मोठी फांदी पडल्याने आता अनेक बाबी चर्चेत आल्या आहेत.
चौकट...
ही आहे समाधानाची बाब
गेल्या तीन वर्षात येथे लावलेल्या ४ हजार वृक्षांपैकी ३ हजार वृक्ष जगले आहेत. यासाठी उद्यानविभागात काम करणारे कर्मचारी, उद्यानविभागाचे प्रमुख साडविलकर यांनी ठरवून दिलेल्या वेळेनुसार झाडांची देखभाल करत आहेत. त्यामुळे त्यांची मेहनत कामी येत असून, ही समाधानाची बाब आहे. याचा विचार करता नव्याने होणारी वृक्ष लागवड सुरक्षित जागांवर करण्याची मागणी होत आहे.
कोट
शहर परिसरात यावर्षी वृक्ष लागवड करताना काही नागरिकांना विश्वासात घ्यावे, असे नगर परिषदेला सुचवण्यात आले होते; मात्र प्रशासनाने तसे केले नाही. जी वृक्ष लागवड होतेय ती कौतुकास्पद आहे. तरीही भविष्यातील अडचणी लक्षात घेऊन योग्य जागांवर झाडे लावणे गरजेचे असून, त्यांच्या उंचीचे नियोजनही आत्तापासूनच करण्याची गरज आहे. सर्वांना विश्वासात घेऊन लागवड केल्यास ते अधिक सोयीचे ठरेल.
– प्रकाश उर्फ बापू काणे, सामाजिक कार्यकर्ते, चिपळूण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.