सदर
वसा वसुंधरा रक्षणाचा...
विनाश-काले विपरीत बुद्धी...
(१ सप्टेंबर टुडे ३, फोटोसह घ्यावी)
श्री गणेश विसर्जनाच्या अनेक दुर्दैवी घटनांनंतर आज पासून शासन-प्रशासन आणि प्रत्येक नागरिकांनी आता; प्रत्येक सण, उत्सव, समारंभ हा पर्यावरण पूरकच करण्यात येईल याकडे कटाक्ष ठेवणे आणि आजपासूनच कटाक्षाने मानसिक बदल घडवण्याकडे प्रशासनाने लक्ष देणे अत्यावश्यक गोष्ट आहे.
डॉ. प्रशांत परांजपे. दापोली
---
गौरी गणपतीच्या सणाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने पर्यावरण पूरक गणेश विसर्जन आणि गणेशोत्सव या विषयाबाबत आदेश जारी केला होता. त्यानुसार पाच फुटापर्यंतच्या सर्वच प्रकारच्या गणेशमूर्ती या कृत्रिम तलावात विसर्जित कराव्यात असे आदेशात नमूद करण्यात आले होते. अपवादात्मक परिस्थिती वगळून संपूर्ण महाराष्ट्रात या आदेशाचे विसर्जन झाल्याचं दुर्दैवी चित्र पाहायला मिळाले आहे. यामुळे जलप्रदूषण झालंच आहे. त्याच पद्धतीने निर्माल्य विसर्जित करण्यात आले, त्या निर्माल्यामध्ये प्लास्टिकचे हार, कापराच्या डब्या, उदबत्तीचे प्लास्टिकचे पुडे आदी अनेक प्रकारच्या प्लास्टिकच्या किंवा अविघटनशील वस्तूंचा प्रचंड प्रमाणात भरणा झालेला किंवा असलेला दिसून आला आहे. त्यामुळे या निर्माल्यापासून खत निर्मिती प्रक्रियेमध्ये प्रचंड अडचणी निर्माण झाल्या आहेत.
*काय कारणे असू शकतात?
आमच्यापर्यंत शासनाचा अध्यादेश पोहोचलाच नाही... नागरिकांचे एक मत.
शासन प्रशासन स्तरावरून तळागाळापर्यंत प्रभावीपणे मानसिक बदल घडवण्यात आलेले अपयश .
कुठलाही आदेश आला तरी आम्ही परंपरागत जलस्रोतांमध्येच विसर्जन करणार ही असलेली चुकीची आणि हेकेखोर मनोवृत्ती.
शासनाने सांगितलेल्या गोष्टी न पाळल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणचे जलस्रोत हे प्रदूषित झाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांनी कृत्रिम तलावाची व्यवस्था केली होती. मात्र अशा कृत्रिम तलावात काही ठिकाणी दोन किंवा तीनच गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्याचं लक्षात आलं.
अपवादात्मक काही स्थानिक स्वराज्य संस्थांनी कृत्रिम तलावाचाच वापर केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ही निश्चितच अभिनंदनीय गोष्ट आहे. पण अशा स्थानिक स्वराज्य संस्था हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच कमी आहेत.
मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन हे समुद्रात किंवा जलस्त्रोतात करण्याची संमती देण्यात आली होती. मात्र विसर्जनानंतर या मूर्तींचे विघटन करण्याचे काय स्वरूप आहे, हे शासनाने जाहीर केलेलं नाही.
त्यामुळे एकंदरीतच शासनाच्या धोरणांमध्ये सुद्धा पूर्णतः पारदर्शकता नाही असेच दिसून येते.
मात्र सद्यःस्थितीत किमान आदेश दिला गेला हेही नसे थोडके; असे म्हणून पुढच्या वर्षी १००% (लहान- मोठ्या, खासगी आणि सार्वजनिक) पर्यावरण पूरक गणेश विसर्जन होईल (कृत्रिम तलावातच) आणि पर्यावरणपूरक मूर्तींची निर्मिती आणि पर्यावरण पूरक मूर्तींचीच प्रतिष्ठापना केली जाईल याकडे आजपासूनच कटाक्ष देणे आणि त्या पद्धतीने मानसिक बदल घडवण्याकडे शासन प्रशासनाने लक्ष देणे अत्यावश्यक गोष्ट आहे.
गणेश विसर्जन प्रसंगी अनेक ठिकाणी अपघात झाल्याचेही वृत्त आले आहे. हे सर्व टाळता आले असते जर कृत्रिम तलावाचा विसर्जना करता वापर करण्यात आला असता.
गणेश विसर्जन आणि ध्वनी व वायू प्रदूषण
गणेश विसर्जनादरम्यान प्रचंड मोठ्या आवाजाचे डीजे लावण्यात आले अतिशय बीभत्सपणे अर्थात त्यामुळे नाचणे झाले. या कर्ण कर्कश आवाजामुळे अनेकांच्या शरीरावर विपरीत परिणाम झाले आहेत. काही ठिकाणी डीजे समोर नाचणाऱ्या युवकांचे कान पूर्णतः बधिर झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दुसरीकडे फटाके वाजवल्यामुळे आग लागून मंत्री महोदयांच्या जिवावरही बेतण्याची वेळ आली होती. असे अनेक प्रसंग घडले आहेत. कोणत्याच गोष्टीचा नियम पाळणे ही गोष्ट अंगवळणी पडली नसल्यामुळे आणि कचऱ्याचे वर्गीकरण या गोष्टीचा कोणताही संबंध दुर्दैवाने अशिक्षित आणि शिक्षित नागरिकांशी न आल्यामुळे आज भक्ती भावाने पूजन केल्यानंतर जो निर्माल्य या भक्तगणांनी निर्माल्य कलशामध्ये टाकला तो नुसताच निर्माल्य न टाकता त्या समवेत अनेक अविघटन शील कचऱ्या समवेत टाचण्या लावलेली केळीची तोरणं आदी प्रकारचा कचरा बंदी असलेल्या प्लास्टिक कॅरी बॅग मध्ये गुंडाळून निर्माल्य कलशात टाकला होता.
कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची हाताला सवय नसल्यामुळे आणि चुकीच्या भ्रामक संकल्पनांचा प्रचंड असा पगडा पांघरून घेतल्यामुळे आज छोट्या छोट्या चुकीच्या गोष्टीतून मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होत आहे. एका बाजूला काही संस्था निर्माल्यापासून खत निर्मिती किंवा धूप स्टीक बनवण्याचा प्रकल्प हाती घेत असतानाच... दुसऱ्या बाजूला मात्र अशा संस्थांना काम करताना प्रचंड अडथळा निर्माण करण्याचा विडाच जणू सर्वसामान्य जनतेने उचललेला दिसून येतो आहे.
प्रत्येक नागरिकाने आपल्या नित्य पूजेचा निर्माल्य विसर्जित करताना एक स्वतंत्र पिंप किंवा निर्माल्य कलश हा आपल्या घरी ठेवावा त्याच्यामध्ये नेमाने आणि घरामध्ये सत्यनारायण किंवा कोणतीही पूजा अर्चा झाल्यानंतर जो निर्माल्य राहतो त्याचे विसर्जन त्याच्यामध्ये करावे. त्यात कल्चरचा वापर करून उत्तम असं त्याचं सेंद्रिय खत निर्माण करून आपल्याच परिसरातील झाडांना ते खत घालावं. म्हणजे निसर्गचक्र पूर्ण होईल आणि पुनर्निर्माण केल्याचा आत्मिक आनंद होऊन निसर्गदेवतेचाही मान राखता येईल आणि जी आपण पूजा करतो आहोत ती देवापर्यंत पोहोचेल. आपण आज जे काही करतो आहोत ते थोतांड आहे. तो देखावा आहे. कारण मूर्ती कशा प्रकारचे आणावी याचे आम्ही कोणतेच भान राखलेलं नाही. आपल्यामुळे निसर्गात कोणती हानी होणारे , पाण्याचे प्रदूषण कसं होणार आहे याची जाणीवही आपण करून घेत नसल्यामुळे आज ही गंभीर परिस्थिती ओढवली आहे.
२०५० ला आज २५ वर्ष शिल्लक असतानाच भारत भूमीवरचा जरी विचार केला तरी देखील कोठे ना कुठे प्रलय आणि दुष्काळ हा घडून येतोच आहे. नुकताच पंजाब मध्ये हाहाकार माजला असून पंजाब मधील २४ जिल्हे हे पूर्णतः पाण्याखाली गेल्याच विदारक असं दृश्य आहे. वातावरणाचा बदलणे हा नियम आहे आणि तो तंतोतंत पाळला जातोय. निसर्ग हा मानवाच्या अतिक्रमणांना कधीही माफ करणार नाही. त्यामुळे वेळीच जागे होणं अत्यावश्यक आहे आज निश्चय करूया, की आपल्या घरातील प्रत्येक सण ,उत्सव हा पर्यावरण पूरकच असेल. माझ्या घरातील कोणत्याही धार्मिक कृत्यानंतर जलस्रोतांमध्ये कोणतेही विसर्जन होणार नाही. याची खूणगाठ जर प्रत्येकाने बांधली तर उद्याचा होणारा विनाश हा कमी करणे शक्य होईल.
(लेखक शाश्वत पर्यावरण विकास या विषयातील डॉक्टरेट पदवीधर आहेत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.