बाप्पा चालले गावाला, चैन पडेना आम्हाला

बाप्पा चालले गावाला, चैन पडेना आम्हाला

Published on

swt77.jpg
89902
पिंगुळी ः शेटकरवाडी येथे गणेशांना भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला.
swt78.jpg
89904
डिगस : दशक्रोशीत गणरायांचे थाटात विसर्जन करण्यात आले. (छायाचित्रेः अजय सावंत)

बाप्पा चालले गावाला, चैन पडेना आम्हाला
कुडाळात गणरायांना निरोपः ‘पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ७ः तालुक्यात अकरा दिवसांच्या श्री गणेशाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. पिंगुळी शेटकरवाडी येथील सुमारे ७० गणरायांचे विसर्जन करण्यात आले.
सतत सुरू असणारा पाऊस श्री गणेशाच्या आज अकराव्या दिवशी थांबल्याने गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे, चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, ‘गणपती गेले गावाला, चैन पडे ना आम्हाला’, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत तालुक्यात अकरा दिवसांच्या गणरायांचे विसर्जन करण्यात आले. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवला होता. रात्रीपर्यंत गणेश विसर्जनाचा उत्साह सुरू होता. श्रींच्या आरत्या, गाऱ्हाणी यामुळे वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. पणदूर आणि कडावल दशक्रोशीत शनिवारी (ता. ६) सायंकाळी गणपतींच्या विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. पणदूर, डिगस, अणाव, वेताळबांबर्डे, हुमरमळा, आवळेगाव, कडावल, भडगाव, निरुखे, पांग्रड, वर्दे, घोडगे, सोनवडे, भरणी, जांभवडे, कुसगांव, गिरगाव, हिर्लोकसह दशक्रोशीत गणपती बाप्पांना जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला.
शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही काही ठिकाणी बाप्पांच्या विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. पणदूर व कडावल दशक्रोशीतील हातेरी, पिठढवळ नद्या तसेच डिगस चोरगेवाडी व तळेवाडी तलाव यासह ओहोळांमध्ये ठिकठिकाणी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

चौकट
ढोल पथकांमुळे सोहळ्यात रंगत
पिंगुळी शेटकरवाडीमध्ये सुमारे १०० घरे आहेत. यामध्ये चार ते पाच घराण्यांचा एक गणपती असे मिळून सुमारे ७० ते ७५ गणराय विराजमान होतात. काल एकाच दिवशी वाडीतील ६१ गणरायांना ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या नामघोषात निरोप देण्यात आला. यावेळी चार घरातील ढोल पथकांनी केतन लाड, रोहित शेटकर, मुन्ना राणे, साईराज राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्यात रंगत आणली. यामध्ये महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता. एक तास आरतीचा कार्यक्रम झाल्याने परिसर भक्तिमय झाला.

Marathi News Esakal
www.esakal.com