इच्छुक उमेदवारांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा

इच्छुक उमेदवारांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा

Published on

इच्छुक उमेदवारांसाठी
प्रशिक्षण कार्यशाळा
चिपळूण : परशुराम एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट चिपळूणच्यावतीने येणाऱ्या नगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सोमवारी, १५ सप्टेंबर रोजी अभिरुची हॉटेल येथे सकाळी १० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत होणार आहे. या कार्यशाळेत उमेदवारांना निवडणूक प्रक्रिया, आचारसंहिता, प्रचार धोरण, जनसंपर्क तंत्र, संवादकौशल्य तसेच आधुनिक डिजिटल माध्यमांचा वापर याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ही लोकशाही मजबूत करण्याची पायरी असल्याने उमेदवारांकडे कायदेशीर माहिती, प्रभावी संवादकौशल्य आणि समाजाभिमुख दृष्टिकोन असणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यशाळेत नामनिर्देशन प्रक्रिया, खर्चाचे पारदर्शक नियोजन, मतदारांशी संवाद, सोशल मीडियाचा विधायक वापर, प्रचार यंत्रणा व स्वयंसेवक व्यवस्थापन यांसारख्या मुद्द्यांवर भर दिला जाणार आहे. जबाबदार नेतृत्वगुण विकसित करणे व मतदारांशी विश्वासार्ह नाते निर्माण करण्याचे महत्त्वही अधोरेखित केले जाणार आहे.

‘राष्ट्रभाषा प्रचार’च्या
उपाध्यक्षपदी शेखर निकम
खेड ः पुणे येथील महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या उपाध्यक्षपदी चिपळूणचे आमदार शेखर निकम तर राज्य कार्यकारिणीच्या सदस्यपदी रत्नागिरी जिल्हा राष्ट्रभाषा प्रचार समितीचे जिल्हा संघटक गोविंद राठोड यांची निवड झाली आहे. संचालक पदावर जयराम फगरे यांची निवड झाली. महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या पुणे येथील कार्यालयात झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ही कार्यकारिणी पुढील पाच वर्षांसाठी काम पाहणार आहे. या वेळी अध्यक्षपदी राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी, द्वितीय उपाध्यक्ष म्हणून सदानंद महाजन, कार्याध्यक्ष म्हणून डॉ. सुनील देवधर तर कोषाध्यक्षपदी मधुमिलिंद मेहंदळे यांची निवड करण्यात आली. अन्य कार्यकारिणी असे डॉ. बंडोपंत पाटील, नागेश बिराजदार, नागेश बंडे (सोलापूर), प्रकाश सुतार (कोल्हापूर), संजय भारद्वाज, सत्येंद्र सिंह, संजय लेले, माधव माटे, डॉ. प्रसाद जोशी व अॅड. एन. डी. पाटील (पुणे), बन्सीलाल गाडी लोहार (नाशिक) व डॉ. हेमचंद वैद्य (वर्धा). आमदार निकम व गोविंद राठोड यांची राज्य कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल त्यांच्या समितीतर्फे व रत्नागिरी जिल्ह्यातून राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या शिक्षक कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

विद्यार्थ्यांकडून
गुरूंना मानवंदना
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील जि. प. शाळा पूर्णगड नं.१ या शाळेमार्फत विद्यार्थ्यांनी शिक्षकांची वेशभूषा करून आपल्या गुरूंना मानवंदना दिली. भविष्यात आम्हीही तुमचा वारसा चालवणार, अशा प्रकारची ग्वाही जणू त्यांनी आम्हाला दिली. विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषा व त्यांना पालकांनी केलेले सहकार्य यामुळेच हा उपक्रम यशस्वी झाला. उपक्रम यशस्वितेसाठी मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाविषयी शाळा व्यवस्थापन समिती, पालक, केंद्रप्रमुख संजय राणे, शिक्षणविस्तार अधिकारी बीट पावस भाग्यश्री हिरवे यांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com