पोलिस २६ तासांहून अधिककाळ रस्त्यावर
९००३६
पोलिस २६ तासांहून अधिककाळ रस्त्यावर
गणेश विसर्जन मिरवणूक ः कोल्हापुरात किरकोळ वादावादी, सौम्य लाठीमार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः विसर्जन मिरवणुकीसाठी शनिवारी सकाळी सातपासून रस्त्यावर तैनात पोलिसांचा बंदोबस्त दुसऱ्या दिवशी सकाळी नऊपर्यंत थांबून होता. इराणी खणीकडे विसर्जनाच्या ठिकाणी असलेला बंदोबस्त दुपारपर्यंत ठेवला. मिरवणुकीदरम्यान मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर चौकात, महाद्वार चौकात मंडळांना पुढे घेताना पोलिसांना किरकोळ लाठीमार करावा लागला. दुसऱ्या दिवशीही काही मंडळांनी मिरवणुका काढल्याने मुख्य मार्गांवर वाहतूक विस्कळीत बनली होती.
आगमन मिरवणुकांमध्ये दिसलेल्या जल्लोषामुळे विसर्जन मिरवणुकीचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. साउंड सिस्टीमकडे वाढलेला कल यामध्ये अधिकच भर घालणारा होता. गणेशोत्सवाच्या आधीपासून पोलिसांकडून करण्यात आलेल्या प्रबोधनाला फारसे यश आले नाही. मात्र, विसर्जन मिरवणुकीत किरकोळ घटना वगळता पोलिसांनी चांगल्या पद्धतीने बंदोबस्त हाताळला. विसर्जन मिरवणुकीसाठी पंधराशे पोलिसांसह होमगार्ड, जलदकृतीदलाच्या तुकड्या, व्हाईट आर्मीसह अनेक स्वयंसेवी संस्था बंदोबस्ताकामी मदत करीत होत्या.
शनिवारी सकाळीपासून अत्यंत शांततेत व पारंपरिक बाज जपणाऱ्या मिरवणुका मुख्य मार्गावरून जात होत्या. सायंकाळनंतर प्रमुख मंडळांचा प्रवेश होताच गर्दी वाढली. चेंगराचेंगरीचे प्रकार वेळीच रोखण्यासाठी पोलिसांना किरकोळ लाठीमार करावा लागला. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर चौक, महाद्वार चौक, पापाची तिकटी या ठिकाणी सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक फायदेशीर ठरली.
पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार यांच्यासोबत उपअधीक्षक तानाजी सावंत, सुवर्णा पत्की, प्रिया पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलिस निरीक्षक संजीव झाडे, सुशांत चव्हाण, श्रीराम कन्हेरकर, किशोर शिंदे, मानसिंग खोचे, नंदकुमार मोरे यांच्यासह अधिकारी मिरवणूक मार्गावर फिरून गर्दीवर नियंत्रणाच्या सूचना करीत होते. तसेच मंडळांनी पुढे जाण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देताना दिसून आले.
अकरा दिवस चोख बंदोबस्त
गणेश आगमनापासूनच पोलिसांवर बंदोबस्ताची जबाबदारी असल्याने या काळात रजा, सुटी देण्यात आली नव्हती. रविवारीही काही मंडळांच्या मिरवणुका असल्याने आजही त्यांच्यावर अतिरिक्त ताण पडला. शहरातील मुख्य मार्ग गर्दीने व्यापल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठीही शहरातील इतर मार्गावर पोलिस तैनात होते.
वाढदिनी बंदोबस्तात व्यस्त
पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांचा शनिवारी वाढदिवस होता. आदल्या रात्री मिरवणूक मार्गाची पाहणी करून पुन्हा सकाळी लवकर दाखल झाले. दिवसभरात महाद्वार रोड, ताराबाई रोड, कोळेकर तिकटी, मिरजकर तिकटी, टेंबे रोड मार्गावरून अनेकदा त्यांनी फिरून पाहणी केली. यानंतर विसर्जनाच्या ठिकाणी पोहोचून तेथील गती वाढण्यासाठीही काही सूचना केल्या. जिल्हाधिकारी अमोल येडगे हेदेखील सायंकाळी पापाची तिकटी येथे पोहोचले. रविवारी सकाळी शेवटच्या गणेशमूर्तीची आरती करूनच पोलिस अधीक्षक गुप्ता परतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.