सदर

सदर

Published on

जपूया बीज वारसा--- लोगो
(२ सप्टेंबर टुडे ३)
आदिम बियाणी काळाच्या ओघात नष्ट होत चालली आहेत, त्याप्रमाणे स्थानिक जनावरांच्या प्रजातीही नष्ट होत आहेत. जनावरांचेही विविध संकरित वाण विकसित झाले आहेत. भरपूर दूध आणि अंडी मिळावीत, मांस विक्रीसाठी जनावरे लवकर उपलब्ध व्हावीत म्हणून त्यांना स्टिरॉईडस् दिली जातात. ही दूध, अंडी आणि मांस खाल्ल्याचे विपरीत परिणाम आता दिसायला सुरुवात झाली आहे. त्यांनी हृदय रोग, हार्मोन्सचे असंतुलन अशा विविध आजारांना आमंत्रण दिलेले आहेत. हे पाहता आदिम बियाणांच्या बरोबरीने आपण आपल्या पशुधनाच्या स्थानिक जैवविविधतेचे रक्षण करणे आवश्यक आहे.
- rat८p१.jpg -
P25N90142
- कुणाल अणेराव, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, सृष्टीज्ञान संस्था

----
आदिम बियाणी अन् पशुधनांचे
स्थानिक वाण
गणेशोत्सव सुरू होण्याआधी पोळा साजरा केला जातो. शेतीमधील गाई-बैलांचे महत्त्व ठसवणारा हा सण आहे. मात्र सध्या पूजा करण्यासाठी सुद्धा कोकणात गाई-बैल शोधावे लागतात. शेतीमध्ये विविध यंत्रे आणि उपकरणे आल्यामुळे बैलांचे काम कमी झाले आहे. तसेच मनुष्यबळ नसल्यामुळे गाई-गुरांचे पालन करणे सोपे राहिलेले नाही. शिवाय जंगलतोड झाल्यामुळे अन्नाच्या शोधात बिबटे गावात येत असतात. त्यामुळे आपले पशुधन सांभाळणे खूपच जोखमीचे झाले आहे. असे असले तरी आदिम बियाणांची शेती सेंद्रिय पद्धतीने करत असताना त्यात पशुधनाचे खूप महत्त्व आहे. कारण सेंद्रिय खते बाहेरून विकत घेतल्यास ती प्रचंड महाग पडतात. त्यात गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, डुकरे, मासे अशा जनावरांचा समावेश होतो. त्यातही आदिम बियाणांप्रमाणे पारंपरिक स्थानिक जनावरांचे वाण असतील तर ते एकमेकांना पूरक ठरतात. सेंद्रिय पद्धतीने शेती करताना खत, कीटकनाशके, मातीचा पोत सुधारणे आणि नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी जनावरे मदत करतात. ही जनावरे सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात महत्त्वाचे योगदान देतात.
शेतातील तण, धान्य काढल्यानंतर राहिलेली धाटं हे सारे खाऊन, मोठ्या प्रमाणावर शेण-लेंड्यांची निर्मिती होते. याद्वारे जमिनीतील कर्ब, नत्र, स्फुरद, आणि पालाश या पोषक तत्वांचे चक्रीकरण पूर्ण होते. जनावरांनी खाल्लेली ही पोषक तत्त्वे शेण आणि मूत्राद्वारे मातीत परत येतात. सेंद्रिय कचरा नैसर्गिकरीत्या कुजून त्याचे खत तयार होण्यासाठी पंधरा दिवस ते एक महिना लागू शकतो. मात्र शेण आणि मूत्राच्या माध्यमातून हा सेंद्रिय कचरा अगदी एक दिवसात खत म्हणून वापरण्यासाठी उपलब्ध होतो.
गाई-म्हशींच्या शेणापेक्षा आणि कंपोस्टपेक्षा शेळ्या-मेंढ्यांच्या लेंड्यांमध्ये जास्त पोषक घटक असतात. म्हणूनच पूर्वी धनगरांना खास आमंत्रित करून त्यांच्या मेंढ्या आणि शेळ्यांना रात्रभर शेतात ठेवले जात असे. त्यांचे जमिनीत मिसळलेले मूत्र आणि शेण हलकी नांगरट करून मातीचा कस वाढवण्यासाठी वापरले जाई.
अन्नसुरक्षा आणि पोषण सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही या पशुधनाचे महत्त्व आहे. आपल्या रोजच्या आहारातील अत्यंत आवश्यक घटक म्हणजे प्रथिने, ही आपल्याला दूध, अंडी, मांस यासारख्या पशूपदार्थांमधून मिळतात. शिवाय अतिरिक्त दूध, अंडी, मांस विकल्यामुळे शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा स्रोत ठरतो.
भारतात सहिवाल, लालसिंधी, गीर, थार पारकर, ओंगल, काक्रेज, निमारी, हलीकर, अमृत महल, मालवी, खेरीगर अशा मुख्य प्रजातींच्या दुभत्या गायी तसेच त्यांच्या बैलांचा जड कामांसाठी वापर करता येतो. त्यात अनेक स्थानिक विविधता दिसून येते.
महाराष्ट्रात मराठवाड्यातील देवणी आणि लाल कंधारी, पश्चिम महाराष्ट्रातील खिल्लार, उत्तर महाराष्ट्रातील डांगी, विदर्भातील गौळाऊ आणि कोकणातील कपिला अशा गायींच्या प्रजाती आढळतात. तर भारतात म्हशींच्या मुऱ्हा, सुरती, मेहसाणा, जाफराबादी, भादवरी, निली-रावी यासारख्या विविध प्रजाती असून महाराष्ट्रात पंढरपुरी आणि नागपुरी या म्हशींच्या मुख्य प्रजाती आहेत.
भारतातील हिमालयापासून ते पश्चिम आणि पूर्व घाट रांगांमध्ये शेळ्या-मेंढ्या मोठ्या प्रमाणावर पाळल्या जातात. त्यात स्थानिक पातळीवर प्रचंड विविधता दिसून येते. महाराष्ट्रात सुरती, दख्खनी, उस्मानाबादी आणि मलबारी या शेळ्यांच्या जाती आढळतात. तर मेंढ्यांच्या दख्खनी व नेल्लोर या प्रमुख जाती आहेत. महाराष्ट्रातील मेंढ्यांपासून लोकर खूप कमी मिळते. मात्र त्या मांस उत्पादनासाठी उपयुक्त आहेत.
--------
(लेखक स्वत: शेतकरी असून आदिम बियाणी संवर्धन करत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com