रेल्वे विलंबाने, रस्त्यावर वाहतूक कोंडी
- rat८p२.jpg-
२५N९०१४३
चिपळूण ः मुंबईकडे निघालेल्या चाकरमान्यांना संगमेश्वर परिसरात वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.
---
‘पुढच्या वर्षी सुखाचा प्रवास होवो’
कोकणभक्तांची प्रार्थना ; रेल्वे विलंबाने, रस्त्यावर वाहतूक कोंडी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ : गणेशोत्सवासाठी कोकणात लाखो भाविक दाखल झाले होते. गौरी-गणपती विसर्जनानंतर ते परतीच्या प्रवासाला लागले. मात्र रस्ते आणि रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या कोकणवासीयांची प्रचंड रखडपट्टी झाली. पावसाचा मनस्तापही कोकणकरांना सहन करावा लागला. त्यामुळे, ‘पुढच्या वर्षी तरी आगमनाचा आणि परतीचा प्रवास सुखाचा होवो,’ अशी प्रार्थना कोकणात आलेल्यांकडून करण्यात आली.
कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या, विशेषतः गणपती सणासाठी सोडण्यात आलेल्या जादा गाड्यांमुळे वेळापत्रकावर थोडा परिणाम झाला होता. काही गाड्या विलंबाने धावत होत्या. नियमित गाड्या एक ते दोन तास, तर गणपती विशेष रेल्वे पाच ते सहा तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे मुंबईत वेळेत पोहोचून नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी रुजू होण्याच्या वेळांवर पाणी फिरले. परिणामी, चाकरमान्यांच्या पदरी नेहमीप्रमाणेच निराशा आली.
चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासातही पावसाचे विघ्न होतेच. चिपळूण, संगमेश्वर रेल्वेस्थानकावर अनेक प्रवासी विशेष रेल्वेच्या प्रतीक्षेत तासंतास उभे होते. रेल्वे वेळेत न आल्यामुळे त्यांचे पुढील नियोजन कोलमडले. मोबाईल हातात घेऊन अॅपवर रेल्वेचे ‘स्टेटस’ कुठे आहे ते शोधण्यापलीकडे प्रवाशांकडे पर्याय उरलेला नव्हता. ज्यांना रेल्वे मिळाली, तेही वारंवारच्या क्रॉसिंगमुळे वेळेत घरी पोहोचू शकले नाहीत.
एकाच वेळी शेकडो वाहने रस्त्यावर आल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. आतापर्यंत माणगाव, इंदापूर या ठिकाणी अनेकदा अशा प्रसंगांचा चालकांना सामना करावा लागलेला होता. यावर्षी संगमेश्वरपासूनच कोकणवासीयांचा प्रवास कासवगतीने सुरू झाला होता. संगमेश्वर येथे पुलाचे काम अर्धवट आहे. जुन्या अरुंद पुलामुळे या ठिकाणी कोंडी होत आहे. माणगाव, इंदापूरच्या पुढे पोलादपूर, पळस्पे, पेण या परिसरात असलेल्या खड्ड्यांमुळे खोळंब्यात भरच पडली. संगमेश्वर, माणगाव, इंदापूर, पेण, पळस्पे यांसह काही ठिकाणी वाहने अनेक तास एकाच ठिकाणी उभी होती.
मुंबई-गोवा महामार्गावर स्थानिक पोलीस, महामार्ग पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांचे गणेशोत्सवाच्या सुरुवातीला उत्तम नियोजन होते. परिणामी, कोकणात जाताना फारसा त्रास सहन करावा लागला नाही. मात्र, परतताना चित्र उलटे होते. पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांचे नियोजन बिघडलेले दिसले. वाहनांची संख्या आणि कोंडी पाहून पोलीस, होमगार्ड हतबल झाले होते. अनेक ठिकाणी रुग्णवाहिकाही अडकल्या होत्या.
चौकट १
महामार्गावर हॉटेलमध्ये गर्दी
ग्राहकांची उसळलेली गर्दी पाहता, अनेक हॉटेल्समध्ये पदार्थांचे दर वाढवले होते. पाण्याच्या बाटलीपासून थंडपेय, अन्नपदार्थांपर्यंत वाढीव दर आकारले जात होते. एकाच वेळी झालेली गर्दी, त्यामुळे वाढलेली मागणी, त्यातच कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे हॉटेलचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. हॉटेलमध्ये जागा मिळण्यासाठी एक ते दोन तास प्रतीक्षा करावी लागत होती.
-------
कोट
‘कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांची सोय झाली खरी, परंतु पनवेलला पोचेपर्यंत क्रॉसिंगचा खेळ सुरू होता. त्यामुळे प्रवास स्वस्तात झाला असला, तरी उशीर मात्र जास्त झाला.’
विनय कदम, ठाणे (मूळ गाव : चिपळूण)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.