मतांच्या जुळवाजुळवीसाठी इच्छुकांचे प्रयत्न
मतांच्या जुळवाजुळवीचा उत्सव
आगामी निवडणुकांची तयारी; सणासुदीनिमित्ताने घरोघरी पोहचून संवाद
सावंतवाडी, ता. ८ : गणपती आले की घराघरात मोदकांचा सुगंध दरवळतो. पण यंदा मोदकांसोबत मतांचेही वास दरवळताना दिसले. एकीकडे बाप्पाच्या आरतीचा गजर सुरू असताना दाराशी एखादे ‘भावी नगरसेवक’ चरण ठेवून गेले की, घरातल्या लोकांच्या चेहऱ्यावर भक्तिभाव आणि राजकीय हिशोब, दोन्ही भाव एकत्र उमटले.
सणासुदीचा काळ म्हणजे नातलगांना भेटण्याची वेळ. पण, उमेदवारांसाठी हीच वेळ असते मतदारांशी ‘भावनिक नाते’ जुळवण्याची. गणपती दर्शनाच्या नावाखाली उमेदवारांचा लवाजमा घरोघरी हजेरी लावतो. ‘गणराया तुम्हाला सदैव सुखी ठेवो, आणि तुमचं मत मला मिळो!’ असं गुपचूप मनोमन मागत ते घराबाहेर पडतात.
आता या भेटीत भक्ती आणि राजकारणाचं ‘कॉम्बो पॅक’ मिळतं. कुणी गणेशपूजेचं साहित्य वाटतो, कुणी शिधा. पैशाची ताकद असलेले उमेदवार गणरायाला सोन्याचा हार घालतात, तर काहीजण फक्त टाळ्यांनी वातावरण भारवतात. पण, गावातल्या गप्पांमध्ये लगेच याची चर्चा रंगते.
सावंतवाडी तालुक्यात सध्या राजकारणाचं दृश्य म्हणजे अगदी शास्त्रीय नाटकच. भाजप आणि शिंदे गट मुख्य रंगमंचावर नाचताहेत, तर बाजूला ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दोन्ही तुकडे सपोर्टिंग ॲक्टर्स म्हणून उपस्थित आहेत. मुख्य प्रश्न असा की, महायुती झाली, तर नाटकात कुणाला भूमिका मिळणार आणि कुणी दिग्दर्शकाच्या खुर्चीवर दगड मारणार? नाराज उमेदवार बंडखोरीचं गाणं गाणार, हे नाटकाच्या दुसऱ्या अंकात ठरलेलं.
उद्धव ठाकरे गटाचं वेगळंच दृश्य आहे. फोडाफोडीच्या राजकारणातून गेले, तरी ग्रामीण भागांत त्यांना थोडा टाळ्यांचा आवाज मिळतोय. पण, या निवडणुकीचं मुख्य वाक्य आधीच प्रेक्षकांच्या तोंडी आलंय-“पैसा बोलेल, गणराया पाहतील.”
चौकट
लोकशाहीची कसरत
लोकशाही म्हणजे मतदारांच्या हाती असलेलं शस्त्र. पण, आता ते शस्त्र मतदार पैशाच्या पोटात लपवतोय. उमेदवार मते मागताना लोकशाहीची गाणी गातात, आणि मतदार पैशाच्या आमिषावर डोलतो. काही लोकं “हे काय उघडपणे पैसे वाटतात!” म्हणून टीका करतात. पण, त्याच उमेदवारांना पुढच्या वेळी निवडून देतात. यंदाच्या गणेशोत्सवात हे दृश्य अगदी ठळकपणे जाणवलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.