कौशल्य स्पर्धेकरिता नोंदणीचे आवाहन
कौशल्य स्पर्धेकरिता
नोंदणीचे आवाहन
सिंधुदुर्गनगरीः चीनच्या शांघाई येथे जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ होणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी ३० सप्टेंबरपर्यंत https://skillindiadigital.gov.in वर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे. जागतिक कौशल्य स्पर्धा ही ऑलिंपिकसारखी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा आहे. यापूर्वी ४७व्या स्पर्धेत ५० देशातील १०,००० उमेदवारांनी ६३ सेक्टरमध्ये सहभाग घेतला होता. स्पर्धेत वयोमर्यादा एकमेव निकष असून, काही क्षेत्रांसाठी १ जानेवारी २००४ किंवा २००१ नंतर जन्मलेले उमेदवार पात्र आहेत. पात्र संस्थाः आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग कॉलेज, हॉस्पिटॅलिटी, कौशल्य प्रशिक्षण संस्था, कॉर्पोरेट ट्रेनिंग, कला व ज्वेलरी इत्यादी.
----------------
दिव्यांगांसाठी मोफत
संगणक व प्रशिक्षण
सिंधुदुर्गनगरीः शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, मिरज येथे दिव्यांगांसाठी संगणक व व्यावसायिक प्रशिक्षण मोफत सुरू आहे. प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण मंडळाची मान्यता असलेले आहे. संगणक (एमएस ऑफिस)–किमान ८ वी पास, मोटर व पंपिंग उपकरणे (इलेक्ट्रीक)–किमान ९ वी पास (वयोमर्यादा: १६ ते ४० वर्षे), प्रशिक्षण कालावधी १ वर्ष, मोफत राहणी, जेवण, प्रॅक्टीकल्स, नेटवर्किंग, इंटरनेट, व्यवसायायोग्य प्रशिक्षण, फोटोसह प्रवेश अर्ज अधिक्षकांकडे पाठवावा किंवा समोर जमा करावा. आवश्यक कागदपत्रे : शाळा सोडल्याचा दाखला, दहावीचे प्रमाणपत्र, अपंगत्व प्रमाणपत्र, आधार कार्ड, डोमिसाईल, उत्पन्न दाखला इ. संस्थेचे उद्दिष्ट : ग्रामीण-शहरी दिव्यांगांना व्यावसायिक कौशल्य प्राप्त करून स्वरोजगार आणि समाजात सक्षमता प्रदान करणे.
-------------
वेंगुर्ले पोलीस ठाण्यात
महापूजेसह नाट्यप्रयोग
वेंगुर्लेः वेंगुर्ले पोलीस ठाणे येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने उद्या (ता.९) सकाळी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. तसेच सायंकाळी ६ वाजता ‘क्रोध शंभूचा वध झाला, सूर्याचा आरंभ गज स्वरूपाचा’ हा पौराणिक संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. या नाट्यप्रयोगात दत्तप्रसाद शेणई, बाबा मयेकर, बंटी कांबळी, मामा माळकर, सागर गांवकर, प्रसाद शिरोडकर, उदय मोर्ये, नीळकंठ सावंत, महेंद्र कुडव, प्रशांत मयेकर, केशव खांबल यांचा समावेश आहे. त्यांना संगीतासह संकेत कुडव, किसन नेमळेकर व विनायक चव्हाण यांची साथ मिळेल.
--------------
योगेश सकपाळ
यांचे यश
वेंगुर्लेः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १५ जूनला घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेत (सेट-सहाय्यक प्राध्यापक) योगेश सुधाकर सकपाळ यांनी शिक्षणशास्त्र या विषयातून पात्रता मिळवून यश संपादन केले आहे. त्यांनी १९० गुण मिळविले. सध्या ते वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण-खवणेश्वर येथील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असून तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळखले जातात. शिवाजी विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बी.ए. अभ्यासक्रमात त्यांच्या समीक्षात्मक लेखाचा पूरक वाचन साहित्य म्हणून समावेश झाला आहे.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.