पायमार्ग, शेतमार्गाला मिळणार कायमस्वरूपी नोंद
-rat८p२१.jpg-
२५N९०२१५
मंडणगड : सेवा पंधरवडा पार्श्वभूमीवर शिव, पाणंद शेतमार्गाची पाहणी करताना महसूल मंडळ अधिकारी नीलेश गोडघासे व तलाठी, ग्रामस्थ
----
पाय अन् शेतमार्गास कायमस्वरूपी नोंद
अक्षय ढाकणे ः सेवा पंधरवड्यात विविध उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ८ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या कालावधीमध्ये तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. गावांतील पायमार्ग, शेतमार्गाला कायमस्वरूपी नोंद मिळणार असून पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांना अधिवास, जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात येणार आहे. नागरिकांनी सेवा पंधरवडा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार अक्षय ढाकणे यांनी केले आहे.
अभियान तीन टप्प्यामध्ये राबविण्यात येणार आहे. पहिला टप्प्यात पाणंद रस्तेविषयक मोहीम १७ ते २२ सप्टेंबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडी मार्ग, पाय मार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग व गाडी मार्ग, शेत पांदण रस्त्यांचे अभिलेख अद्ययावत करणे, त्यावर असलेले अतिक्रमण हटवणे व सदर रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देणे याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. ८ आणि ९ सप्टेंबरला ग्रामस्तरावर शिवार फेरीचे काढण्यात येईल. या कालावधीत शेतरस्ते मिळण्याबाबत, रस्त्यांबाबत तक्रारी, अतिक्रमण बाबत जास्तीत जास्त अर्ज समितीकडे सादर करावेत असे आवाहन करण्यात येत आहे. समिती रस्त्यांची यादी करुन विशेष ग्रामसभेमध्ये मान्यता घेण्यात येणार आहे.
महसूल विभागांतर्गत गाव नकाशावर नोंदी नसलेल्या परंतु वापरात असलेल्या रस्त्यांचे व अतिक्रमित रस्त्यांबाबत रस्ता अदालत घेणार आहेत. सर्व रस्त्यांची गाव नमुना १ (फ) मध्ये नोंद घेऊन सर्व रस्त्यांना क्रमांक देण्यात येणार आहे. भूमी अभिलेख मोजणी विभाग गाव नकाशावर नोंद नसलेले व व अतिक्रमित रस्त्यांची मोजणी करण्यात येणार आहे. ग्रामविकास विभागात शिवार फेरीमध्ये ग्रामपंचायत अधिकार, ग्रामविकास अधिकारी सहभागी होतील. रस्त्यांच्या प्रस्तावांबाबत विशेष ग्रामसभेचे आयोजन करुन ग्रामसभा ठराव करणेत येतील असे तहसीलदार यांनी सांगितले.