परिश्रमाच्या जोरावर आकारला व्यवसाय
मालिकेचे नावः बलशाली नारीशक्ती
कोलगावः भाग ३
नाव :- स्वामी समर्थ उत्पादक गट
स्थापना :- १० डिसेंबर २०१९
सदस्य संख्या :- १५
प्रभाग :- कोलगाव
गाव :- कोलगाव
तालुका :- सावंतवाडी
swt107.jpg
90555
कोलगवः तिळाचे लाडू पॅकिंग करताना स्वामी समर्थ उत्पादक गटाच्या महिला.
swt108.jpg
90556
कोलगावः गणेशोत्सवानिमित्त करंज्या करताना स्वामी समर्थ उत्पादक गटाच्या महिला.
परिश्रमाच्या जोरावर आकारला व्यवसाय
कोलगावमधील समूहः नावीन्यपूर्ण प्रयोग ठरली यशाची गुरुकिल्ली
विनोद दळवी : सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १०ः कोणत्याही व्यवसायाला चिकाटी आणि अथक परिश्रमांची जोड मिळाली की, त्या व्यवसायाला निश्चित ऊर्जितावस्था येते. मग तो व्यवसाय सर्वसामान्य असो अथवा नवखा. कोलगाव येथील स्वामी समर्थ उत्पादक गटाने सुध्दा याच जोरावर यशस्वीतेची शिडी चढायला सुरुवात केली आहे. पारंपरिक लाडू हा व्यवसाय करताना त्यात आणलेली नावीन्यता या व्यवसायाला उभारी देणारी ठरली आहे. नाचणी लाडू, नाचणी पापड, तीळ चिक्की हे नावीन्यता दर्शविणारे पदार्थ या व्यवसायाची वेगळी ओळख निर्माण करीत आहेत.
स्वामी समर्थ उत्पादक गटाची १० डिसेंबर २०१९ ला कोलगाव येथे स्थापन झाली. या उत्पादक गटात एकूण १५ महिला सदस्य सहभागी आहेत. गटाला १८ फेब्रुवारी २०२० ला राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पांतर्गत दोन लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. या निधीचा उपयोग गटाच्या व्यवसाय वृद्धीसाठी मोठ्या प्रमाणात झाला आहे. या उत्पादक गटाच्या माध्यमातून उत्पादन व सेवा देणे, हा व्यवसाय केला जातो. भांडवलाच्या कमतरतेमुळे गटाने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत बीज भांडवल योजनेतून ४ लाखांचा प्रस्ताव केलेला आहे. त्याला शासनाने मंजुरी सुध्दा दिलेली आहे.
स्वामी समर्थ उत्पादक गट उत्पादित करीत असलेल्या उत्पादनात शेंगदाणा लाडू, चुरमुरे लाडू, तीळ लाडू अशा विविध गोड लाडवांचा समावेश आहे. तसेच उडीद पापड बनविले जातात. याचबरोबर नाचणी लाडू, नाचणी पापड, तीळ चिक्की हे हटके पदार्थ उत्पादित केले जात आहेत. मुळात तीळ आणि नाचणी हे पौष्टिक आहेत. त्यात अनेक जीवनसत्त्वे आहेत. त्यामुळे नाचणी लाडू, नाचणी पापड, तीळ चिक्की हे पदार्थ ग्राहकांच्या मनात घर करून गेले आहेत. स्वादिष्ट, रुचकर पदार्थ खाताना शरीराला सुध्दा पोषण मिळत असल्याने स्वामी समर्थ उत्पादक गटाची लोकप्रियता वाढत आहे.
याचबरोबर हा उत्पादक गट सण-उत्सव यांचाही फायदा आपल्या व्यवसायासाठी करून घेत आहे. कोकणातील प्रसिद्ध गणपती उत्सवावेळी लागणारा फराळ सुध्दा हा गट बनवितो. हे सर्व उत्पादन स्थानिक बाजारपेठ, नजीकच्या गोवा बाजारपेठेतील विविध घाऊक विक्रेत्यांना पुरवले जाते. प्रभागसंघ कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून कच्चा माल म्हणजे नाचणी, तांदूळ खरेदी करतो आणि त्यावर गरजू ग्राहकांना, लहान किराणा दुकानांना विक्री करतो. उकडा तांदूळ, कोकम, कोकम आगळ यांसारखी उत्पादने या उत्पादक गटाला स्थानिक नागरिक विक्री करतात. या अनेक व्यवसायांमुळे स्वामी समर्थ उत्पादक गटाची वार्षिक उलाढाल ८ लाखापर्यंत पोहोचली आहे.
या गटातील महिलांनी ‘आर-सेटी’ या शासनमान्य संस्थेकडून मसाले आणि पापड बनवणे प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे गटातील महिला सदस्य परिपूर्ण प्रशिक्षित झालेल्या आहेत. एकंदरीत या उत्पादक गटातील सर्व सदस्य कष्टाळू व मेहनती आहेत. त्यांनी आपल्या व्यवसायासाठी दुसऱ्या एका स्वयंसेवी संस्थेकडून वैयक्तिकरीत्या कौशल्य प्रशिक्षण देखील पूर्ण केलेले आहे. भविष्यात व्यवसाय वृद्धीसाठी ही प्रशिक्षणे त्यांना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत.
या उत्पादक गटाने ‘महालक्ष्मी सरस’मध्ये दोन वेळा भाग घेतला होता. यासाठी वैभव पवार, स्वाती रेडकर यांचे मार्गदर्शन लाभले. निकिता साटेलकर, संचिता केनवडेकर, यशश्री साटेलकर यांच्या नियंत्रणाखाली उर्वरित बारा सदस्य महिला गट विकसित होण्यासाठी परिश्रम करत आहेत.
कोट
समूह सुरू करताना असलेला विश्वास आणि मैत्री आज अनेकपटीने वाढली आहे. नियमित बैठका कोणत्याही विशेष सूचना न देता घेतल्या जातात. सर्व सदस्य आपली जबाबदारी ओळखतात. सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शकपणे होत असल्याने समूहातील सदस्यांना मोठ्या रकमेचे कर्ज मिळू लागले आहे. यामुळे कामासाठी बाहेर जाण्याची गरज न पडता घराजवळच रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
- निकिता साटेलकर, अध्यक्ष, स्वामी समर्थ उत्पादक गट
कोट
आमच्या समूहात सर्व सदस्यांमध्ये अतूट मैत्री आहे. त्यामुळे केवळ आर्थिकच नाही तर, एकमेकांच्या सुख-दुःखातही सहभागी होतो. समूहातील आर्थिक उलाढाल वाढल्याने दर महिन्याला सुमारे पाच ते साडेपाच हजार रुपये व्याजाच्या स्वरूपात नफा मिळतो. आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यामुळे घरात व समाजात आमचा सन्मान आणखी वाढला आहे.
- संचिता केनवडेकर, सचिव, स्वामी समर्थ उत्पादक गट
कोट
आम्ही सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ स्वयंसहायता महिला समूह म्हणून एकत्र आलो. व्यवसाय वाढत गेला तसे आम्ही खाद्यपदार्थ निर्मितीचा समर्थ उत्पादक गट स्थापन केला. या माध्यमातून व्यावसायिक मार्गदर्शन मिळाले आणि आमची उत्पादने ''महालक्ष्मी सरस'' सारख्या प्रतिष्ठित प्रदर्शनांमध्ये नेण्याची संधी मिळाली. या यशस्वी वाटचालीचा आम्हाला मनापासून अभिमान आहे.
- यशश्री साटेलकर, उपाध्यक्ष, स्वामी समर्थ उत्पादक गट