सदर

सदर

Published on

-rat१३p१.jpg-
P२५N९१२२२
डॉ. महेंद्र गुजर
---
(सदरासारखे घ्यावे.)

भुताची जमीन म्हणून प्रसिद्ध असलेला तुकडा विकत घेतला. त्या जागेत भुते फिरतात, अशा भाकडकथांवर विश्वास न ठेवता ती जमीन खरेदी करून हो आमची मुले हीच मोठी भुते आहेत, असे सांगत ठामपणे पुढे पाऊल टाकून केलेल्या कामामुळेच ओणी येथे वात्सल्य मंदिर ही संस्था उभी आहे. ओणीला भुताटकीविरुद्ध उभा राहणारा आधुनिक विचारसरणीचा खमक्या मांत्रिक मिळाला. त्याचे नाव डॉ. महेंद्र मोहन. संस्था उभारणे, त्या यशस्वीपणे चालवणे, प्रसंगी समाजाचा रोष पत्करणे आणि संस्थेचे संस्थान होणार नाही, याची काळजी घेणे यासाठी जीवनात ठामपणे निर्णय घ्यावे लागतात. तत्त्वांना मुरड न घालता जगताना किंमत द्यावी लागते. डॉ. महेंद्र यांनी ती मोजली. हे त्यांचे वेगळेपण. आज त्यांचा अमृत महोत्सवी सोहळा होत आहे, त्या निमित्ताने......

--शिरीष दामले, रत्नागिरी
----
वात्सल्य मंदिरचा देवमाणूस
‘नॉट ओन्ली हेल्थ’ हे बीजवाक्य घेऊन डॉ. मोहन आयुष्यभर काम करत आहेत. म्हणजे असे की, फक्त आरोग्य एवढ्याच विषयावर डॉक्टर म्हणून काम न करता त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या सर्वच प्रश्नांना, समाजाच्या सर्व समस्यांना भिडायचे आणि त्यासाठी गरज पडेल त्याप्रमाणे त्या त्या भूमिकेत शिरून काम करायचे. वैद्यक सेवा ही एकांगी असू शकत नाही. माणसे रुग्ण अनेक कारणांनी बनत असतात. त्यामागे शिक्षणाचा अभाव, अंधश्रद्धा, सामाजिक जडणघडण, त्यांना करावे लागणारे काम, व्यसनाधीनता. या व्यसनाधीनतेचे कारण दारिद्र्य, असे अनेक घटक माणसाला रुग्ण बनवायला कारणीभूत असतात. हे ओळखून डॉक्टरांनी रुग्णालाच नव्हे तर त्याला कारणीभूत ठरण्याच्या सामाजिक दुखण्यांवरही औषधे दिली. त्यासाठी त्यांनी स्वतः संघर्ष केला. वैद्यक क्षेत्राबाहेर जाऊन समाज समजून घेतला. लोकांची मानसिकता समजून घेतली. यामुळेच मग त्यांचे हे व्यापक विचार करणारे व्यक्तिमत्व तयार झाले. या काळात डॉक्टरांनी सहचारिणी निवडली ती समाजाची सेवा करण्याची तयारी असलेली. त्यामुळे त्यांच्या कार्यातील पत्नी आशाताई यांचे योगदान लक्षात येईल.
शिक्षण का नाही? अंधश्रद्धा का? रस्त्याचा प्रश्न काय? सामाजिक दुखणे काय? मजुरांचे प्रश्न कोणते? कष्टकरी लोक नेमके काय खातात? किती खातात आणि मग काय पिण्याकडे त्यांचे पाय वळतात, अशा एकना अनेक बाबी डॉक्टर म्हणून काम करताना त्यांच्यासमोर आल्या. यातून त्या समस्यांना भिडताना वेगवेगळी कामे उभी राहिली. संस्था उभारणी ही अशा लोकांकडून होऊ शकते. डॉक्टर काम करत असलेल्या परिसरात क्षयाचे रुग्ण जास्त आढळत. ब्रॉकायटीस किंवा वाळूच्या कारणाने होणारे रोग यावर फक्त औषध देऊन अथवा वरच्या डॉक्टरकडे पाठवून ते गप्प बसले नाहीत. त्यांनी त्याच्या कारणांचा शोध घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, वाळू काढण्यात काम करणाऱ्या या कष्टकऱ्यांना टीबी लागण होत आहे. वाळू काढताना प्रथम माती काढावी लागे. मग खालचा वाळूचा थर हाताने जमा करून द्यायचा. पूर्ण मजुरी मिळाली पाहिजे म्हणून क्षमतेच्या पलीकडे कामगार काम करायचे. यामुळे तेथे काम करणाऱ्यांना टीबी अथवा ब्रॉकायटीस होत असे. डॉक्टर त्याच्या मुळापर्यंत पोहोचले. मग लढा सुरू झाला. म्हणजे येथे ते कामगार पुढारीही बनले. कामगारांसाठी लढा देताना तत्कालीन भांडवलदारांविरुद्ध लढावे लागले. अखेर कामगारांचा विजय झाला; पण तोवर अनेकांना बाधा झाली होती. काही कामगार नोकरीत कायम झाले. काहींना फायदा मिळाला. कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे शिक्षण झाले. त्यांना या व्यवसायातील धोके कळले. तेथे काम करणाऱ्या कामगारांना काय हक्क दिले पाहिजे, हे जाहीरपणे उघड झाले. रुग्णाला औषध देण्यापलीकडे त्यांनी पाहिले म्हणून हे शक्य झाले.
रस्ता नसेल, रुग्णापर्यंत पोहोचता येत नसेल तर डॉक्टर कामाचा नाही. यातून रस्त्याचे महत्त्व कळले. खरूजेवर औषध दिले तरी पाणी दूषित आहे तोवर खरूज होणारच म्हणून पाण्याचे महत्व कळले. अतिसाराने रुग्ण बेजार होत. त्याच्यावर औषध दिले तरी पाण्याचे प्रदूषण कायम तोपर्यंत आजार होणारच हे कळले. कुटुंब नियोजनाचे महत्त्व पटवायला गेल्यावर अधिक मुले का हवीत? तर पाण्यासाठी. पाणी आणण्यासाठी माणसे नाहीत म्हणून मुले हवीत, हे कळल्यावर पाणीप्रश्न काय याची जाणीव झाली. समाजातील अंधश्रद्धा रुग्णाच्या जीवावर कशा उठतात, याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्यावर अंधश्रद्धेवरही काम करायला हवे, याची तीव्र जाणीव झाली. या साऱ्या क्षेत्रात डॉक्टरांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह काम केले. मावशी हळबे अथवा मातृमंदिरमधील आणखी कोणी यांच्यासोबत काम करताना त्यांचा दृष्टिकोन व्यापक झाला. त्यातून वात्सल्य मंदिर उभे राहिले. ४० वर्षाच्या काळात त्यांनी अनाथ, भटकी, भरकटलेली, वंचित मुले सांभाळली. यापूर्वी मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील, रेडलाईट एरियातील वंचित समुहातील मुले ओणी येथे आणून सांभाळली आहेत.
१९७७ पासून महेंद्र मोहन वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांच्या समवेत वैद्यकीय व्यवसाय करणारे कमी नव्हते. सरळमार्गी, प्रामाणिक आणि रुग्णाची काळजी वाहणारे डॉक्टरही कमी नव्हते; पण महेंद्र मोहन यांनी जी दृष्टी दाखवली, त्यातून संस्थात्मक काम उभे राहिले. शेकडो मुले वंचित समुहातून आयुष्यात स्थिर झाली. संस्थेचे काम करता करता अनेक सामाजिक कामांशी ते जोडले गेले. वंचित अनाथ मुलांमधून आयुष्यात यशस्वी झालेली मुले ही डॉक्टरांची खरी पुंजी आणि इतरांपेक्षा हेच त्यांचे वेगळेपण.

*संस्थेतील मुलगा कमवायला लागेपर्यंत पाठीशी
संस्थेत काम केलं तेव्हा ५८व्या वर्षापर्यंत पगार घेत होतो. त्या पुढचं काम केलं तेव्हा मात्र काहीही पगार न घेताच काम केलं. कारण, तोवर माझ्या मुलांची शिक्षणं वगैरे पूर्ण झाली होती. आर्थिकदृष्ट्या मोठी काही गरज वाटेल अशी परिस्थिती नव्हती. हे त्यांचे सांगणे आणि वागणे त्यांची आगळी ओळख ठरते. इथला जो मुलगा असेल त्याला तो कमवायला लागेपर्यंत आपण त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे आणि त्यामुळे या मुलांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आमच्या पातळीवर जवळजवळ २०२२-२३ पर्यंत आम्ही सोडवला. त्यातून काही मुलं इंजिनियर झाली, काहींनी डिग्री घेतली, डिप्लोमा घेतला, डॉक्टरेट झाली, पीएसआय, कमांडो झाली. समाजातल्या चांगल्या लोकांनी या कामी आम्हाला देणगी वगैरे देऊन चांगलीच मदत केली. त्यांच्यामुळे हा सगळा प्रश्न सुटत गेला, ही डॉक्टरांची भूमिकाच किती महत्वाची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com