चराचरातील सर्वांचे विविध प्रसंगी पूजन
संतांचे संगती.....लोगो
(२ ऑक्टोबर टुडे ३)
भारत हा उत्सवप्रिय लोकांचा देश आहे. आपल्या देशात प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता तरी उत्सव होत असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याकडून घडणाऱ्या प्रत्येक कामांमध्ये श्री भगवंतांचा हात आहे, हे सांगणाऱ्या भारतीय संस्कृतीने श्री भगवंत प्रत्येक प्राणिमात्रात आहे, अशीही शिकवण दिली आहे. त्यामुळे या चराचरातील सर्वांचे विविध प्रसंगी पूजन करणे, स्मरण करणे घडावे म्हणूनच सणवार व्रतवैकल्य यांची योजना केली असावी.
-rat८p११.jpg-
P25N97300
-धनंजय चितळे, चिपळूण
-----
चराचरातील सर्वांचे
विविध प्रसंगी पूजन
प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमांचा विचार केला तरीसुद्धा आपल्याला ही गोष्ट ध्यानात येईल. चैत्र पौर्णिमा हा हनुमान जयंतीचा दिवस. दास्यभक्तीचा परमआदर्श असणाऱ्या श्री मारूतीरायांची सामूहिक उपासना या दिवशी घडावी म्हणून हनुमान जयंती गावोगावी साजरी केली जाते. बुद्धी, शक्ती गायनादी कला भक्तीमार्ग या सर्वांचा आदर्श असणारे श्री मारूतीराय नित्यपूजनाचे दैवत आहे. याचेच स्मरण चैत्र पौर्णिमा करून देते. वैशाख पौर्णिमा हा दिवस ‘अत्त दीप भव्’ असा संदेश देणाऱ्या भगवान श्री गौतमबुद्धांचा जन्मदिवस आहे. तसाच श्री गणेशांच्या पुष्टीपती या अवताराचाही जन्मदिवस आहे. ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा तर आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरूपौर्णिमा. विस्तारभयास्तव सर्व पौर्णिमांची यादी इथे न देता तो गृहपाठ मी वाचकांवरच सोपवतो. या पौर्णिमांमध्ये कोजागिरी पौर्णिमेचे स्वतःचे असे स्वतंत्र स्थान आहे. या रात्री माता लक्ष्मी कोजागरती, अर्थात कोण जागे आहे, असे विचारत संचार करते आणि जे जागे आहेत त्यांच्यावर कृपा करते, असे परंपरा सांगते. म्हणूनच अनेक मंडळी कोजागिरीच्या रात्री जागरण करतात. या दिवसाच्या परंपरेला काही आध्यात्मिक पार्श्वभूमीसुद्धा आहे; पण त्याकडे न वळता एक व्यावहारिक दृष्टिकोन मी आपल्यासमोर मांडतो. भारतीय व्यापारी आर्थिक वर्ष कार्तिक शुद्ध प्रतिपदेला सुरू होते म्हणजेच कोजागिरीनंतर पंधरा दिवसांनी नवीन वर्ष सुरू होते. जणू माता लक्ष्मी आपल्या भक्तांना त्याचे स्मरण करून देत सांगते. ‘आर्थिक वर्ष संपायला पंधरा दिवस शिल्लक आहेत. जागा आहेस का?’ या वर्षाचे हिशेब लिहून झाले का? पुढील वर्षाचे अंदाजपत्रक आर्थिक नियोजन तयार झाले का? ते झाले असेल तरच तू खरा जागा आहेस, असे म्हणता येईल.’ आपल्या संतांनीसुद्धा ‘आपुलिया हिता जो असे जागता। धन्य माता-पिता तयाचिया।’ असे म्हटले आहे. म्हणजेच जो आपल्या जीवनाचे सार्थक करण्याच्या हेतूने जागृत असतो, तो खरा जागा होय! या जागेपणावरून एक श्लोक आठवला, या श्लोकात कवीने एकच ओळ चारवेळा सांगितली आहे. कवी म्हणतो,
हरिकीर्तनास तुम्ही जागा हो।
हरिकीर्तनास तुम्ही जागा हो।
हरिकीर्तनास तुम्ही जागा हो।
हरिकीर्तनास तुम्ही जागा हो।।
यातील प्रत्येक चरणाचा अर्थ वेगवेगळा आहे. पहिल्या चरणाचा अर्थ अरे, तुम्ही हरिकीर्तनाला जा. दुसऱ्या चरणाचा अर्थ, कीर्तनाच्या ठिकाणी झोपू नका जागे राहा. तिसऱ्या चरणाचा अर्थ, तेथे जागे राहून भगवंतांचे नाम गा आणि चौथ्या चरणाचा अर्थ, जे कीर्तनकार सांगतील त्यांच्या उपदेशाचे आचरण करा म्हणजे त्या उपदेशाला जागा. कोजागिरी आली की, वेध लागतात दिवाळीचे. ही दिवाळीसुद्धा काही बोध करते. त्याचा विचार पुढील भागात करूया. तोपर्यंत जागते रहो जागते रहो.
(लेखक संत आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)