लाळग्रंथीवरील ट्यूमरची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी
लाळग्रंथीवरील ट्यूमरची शस्त्रक्रिया यशस्वी
चिरायूचे डॉ. अभिजित पाटील यांचा चमू ; रुग्णालाय दिलासा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : रत्नागिरीतील सुप्रसिद्ध जनरल व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अभिजित पाटील यांनी चिरायू हॉस्पिटलमध्ये लाळग्रंथीवरील ट्यूमरची ४ तासांची आणि ३८ टाक्यांची अतिशय किचकट शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. रत्नागिरीसारख्या शहरातील या रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमचे यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यामुळे रुग्णाला मोठा दिलासा मिळाला आहे.
पॅरोटेड ग्रंथी ही आपल्या लाळग्रंथीपैकी एक मुख्य लाळग्रंथी असते. रुग्ण महेश सामंताना ट्यूमर मोठा असल्याने ही शस्त्रक्रिया अधिक क्लिष्ट होती. या ट्यूमरच्या खालच्या बाजूलाच चेहऱ्याच्या संवेदना पोचवल्या जाणाऱ्या पाच नसा असतात. त्या नसांना इजा न पोचवता पूर्णपणे गाठ काढणे हे अतिशय आव्हानात्मक होते. रत्नागिरीतील जनरल व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. पाटील आणि भूलतज्ज्ञ डॉ. गुरूदास दांडेकर आणि त्यांची टीम यांनी ४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर यशस्वीरित्या ही शस्त्रक्रिया पार पाडली. शस्त्रक्रियेनंतर रूग्ण भूलीतून बाहेर आल्यावर त्याच्या चेहऱ्याच्या हालचाली तपासून त्यांना वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले.
या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे कोकणातील रुग्णांना आता अशा उपचारांसाठी मुंबई किंवा पुण्यात जायची गरज नाही, जटिल व दुर्धर आजारांवरील शस्त्रक्रिया चिरायू हॉस्पिटलमध्ये होत असल्याने रत्नागिरीवासियांसाठी चिरायू हॉस्पिटल हे वरदान ठरलेले आहे, अशी प्रतिक्रिया रुग्णाच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.
चौकट
काय असते ही गाठ
प्लेओमॉर्फिक एडेनोमा हा लाळग्रंथीचा एक ट्यूमर सामान्यतः सर्वत्र आढळला जातो. सुरुवातीला तो वेदनारहित गाठ म्हणून वाढतो. वेळेवर उपचार न घेतल्यास तो मोठा होतो ज्यामुळे चेहऱ्याच्या रचनेत बदल होऊ शकतो. त्याचे रूपांतर कालांतराने दुर्मिळ प्रकारच्या कर्करोगात होण्याची शक्यता असते. यामध्ये कान किंवा जबड्याच्यामागे एक वेदनारहित किंवा हळूहळू वाढणारी गाठ, चेहऱ्यावरील असमानता, गाठ मोठी झाल्यास क्वचित प्रसंगी दुखणे व चेहऱ्याच्या मज्जातंतूवर दाब पडणे इत्यादी लक्षणे सामान्यतः दिसून येतात. शस्त्रक्रियेने ट्यूमर पूर्णपणे काढल्याने तो पुन्हा येण्याची शक्यता कमी होते.
---