जिल्हा परिषदेची ११ लाख मतदारांची प्रारुप यादी प्रसिद्ध
जिल्ह्यात ११ लाख ७२ हजार मतदारांची नोंद!
५६ गट आणि ११२ गणांसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध; हरकतीसाठी १४ पर्यंत मुदत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बराच काळ रखडलेल्या निवडणूक प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. प्रभागरचना आणि पंचायत समिती सभापती आरक्षण जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या प्रारूप मतदार याद्या काल (ता. ८) सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यामध्ये जिल्ह्यातील ५६ गट आणि ११२ गणांसाठी एकूण ११ लाख ७२ हजार ५१० इतके मतदार मतदान करणार आहेत. त्याबाबत १४ ऑक्टोबरपर्यंत हरकती दाखल करण्याची सूचना करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. ग्रामीण भागामध्ये ऐन दिवाळीमध्ये निवडणूकपूर्व तयारीचे फटाके फुटणार आहेत. दिवाळीनंतर कधीही निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात निवडणूक विभागाने काल जिल्हा परिषदेचे ५६ गट आणि पंचायत समितीच्या ११२ गणांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या जाहीर केली. या याद्या मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या तहसीलदार कार्यालयांमध्ये तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद येथे फलकावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यावर १४ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना तहसीलदारांकडे दाखल करावयाची आहे. त्यानंतर येणाऱ्या हरकती किंवा सूचना संबंधित तहसीलदार यांच्याकडे विचारात घेतल्या जाणार नाहीत. हरकती, सूचनांवरील सुनावणी झाल्यानंतर अंतिम मतदार यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी २७ ऑक्टोबरला पुन्हा त्याच सर्व ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतचोरीच्या गदारोळामुळे आता राजकीय पक्षांकडून मतदार यादी बारकाईने पाहिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रारूप मतदार यादीची प्रतीक्षा सर्वांना होती. काल सायंकाळी ६ वाजल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये ही यादी प्रसिद्ध करण्यात आली.
चौकट
तालुका* जिल्हा परिषद गट* मतदार
मंडणगड* २* ५५,१५५
दापोली* ६* १,४०,४८२
खेड* ७* १,३८,९०१
चिपळूण* ९* १,८१,८२३
गुहागर* ५* ९६,८३२
रत्नागिरी* १०* २,०४,८८१
संगमेश्वर* ७* १,५९,७८५
लांजा* ४* ७३,९००
राजापूर* ६* १,२०,७५१
----
एकूण* ५६* ११,७२,५१०
----