ःरानडुकरांकडून भातशेतीची नासधुस

ःरानडुकरांकडून भातशेतीची नासधुस

Published on

-rat९p२३.jpg, rat९p२४.jpg-
P२५N९७५६१, P२५N९७५६२
रत्नागिरी ः भगवतीनगर येथे उमेश रहाटे यांच्या भातशेतीचे रानडुकरांनी केलेले नुकसान.
----------
रानडुकरांचा धुमाकूळ; भातपीक उद्‌ध्वस्त!
भगवतीनगरमध्ये शेतकऱ्याचे एकराचे नुकसान; हाती आलेले पीक गेले वाया
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः गेले दोन दिवस पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र भातकापणीची तयारी सुरू झाली आहे; मात्र कापणीयोग्य झालेल्या भाताची रानडुकरांकडून नासधूस होत आहे. लोंब्यांमध्ये दाणे भरू लागले असून, त्यावर रानडुकरे कळपाने डल्ला मारत आहेत. रत्नागिरी तालुक्यातील भगवतीनगर येथील उमेश रहाटे यांच्या सव्वादोन एकर क्षेत्रापैकी एक एकर क्षेत्रातील भातरोपांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर शेजारील कोंडवाडी, मिरवणे, उभे पाटवाडी परिसरातीलही भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी तीन महिने घेतलेली मेहनत आणि शेतीवर केलेला खर्च वाया गेला आहे.
रहाटे यांनी यंदा अडीच एकर क्षेत्रावर भातशेती केली होती. नांगरणी, बी-बियाणे, खते, लावणी, भातक्षेत्रातील साफसफाई आणि कापणी अशा विविध शेतीकामांसाठी यंदा त्यांना सुमारे २० हजार रुपयांपर्यंत खर्च आला होता. मागील काही वर्षे त्यांनी भातशेती करणे सोडले होते. त्यांची भातशेती खाडीकिनारी आहे. उशिराने होणारे बियाणे पेरल्यामुळे सध्या रोपांना लोंब्या चांगल्याप्रकारे फुटू लागल्या आहेत. लोंबीतील दाणेही हळूहळू भरू लागले होते. त्यामुळे पुढील पंधरा दिवसात कापणी सुरू करण्याची तयारीही रहाटे यांनी केली होती; मात्र चार दिवसांपूर्वीपासून अचानक रानडुकरांचा त्रास सुरू झाला. पहिल्या दिवशी काही मळ्यांमधील शेतीचे नुकसान केले. त्यावर उपाय म्हणून रहाटे यांनी कुत्र्याचा आवाज असलेले यंत्र शेतामध्ये उभे केले; पण त्याचाही उपयोग विशिष्ट कालावधीपुरताच झाला. सलग चार दिवस रहाटे यांच्या शेतामध्ये शिरून रानडुकरांनी शेताची नासधूस केली. लोंब्यांमधील कोवळे दाणे खाऊन झाल्यानंतर त्यामध्ये रानडुकरांनी लोळण घातली होती. पावसाचे पाणी साचलेले असल्याने शेतजमिनीत चिखल झाला आहे. उभी रोपं आडवी झाली असून, लोंब्याही गळून गेल्या आहेत. यामध्ये सुमारे एक एकरहून अधिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. हीच परिस्थिती भगवतीनगरबरोबरच आजुबाजूच्या चार ते पाच गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे. सर्वच शेतकऱ्यांना रानडुकरांचा त्रास होत आहे. त्याचबरोबर माकडांचाही त्रास शेतकऱ्यांना होत आहे.
रत्नागिरीत मळेशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामध्ये वन्यप्राण्यांना धुडगूस घालणे सोपे झाले आहे. त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना केल्या आहेत; पण त्याही निष्फळ ठरत आहेत. काही शेतकऱ्यांनी भातशेतीच्या बाजूने साड्यांचे कुंपण बनवलेले आहे. त्यामधूनही डुक्कर शेतात शिरत आहेत. काहींनी मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जाळ्यांचा उपयोग केला आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे; मात्र मोठ्या क्षेत्राला हा उपाय खर्चिक ठरत आहे. मिरवणे येथील एका शेतकऱ्याचे सुमारे ३ एकरवरील भात कापणीयोग्य झाले आहे. त्याच्या संरक्षणासाठी स्वतः शेतकरी शेतात ठाण मांडून बसला आहे तर काही ठिकाणी स्वतः शेतकरी रात्री जागून काढत आहे. शेतामध्ये पेटते दिवे ठेवले जात आहेत. तरीही शेतकऱ्याची नजर बाजूला गेली की, रानडुकरं शेतात शिरत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.
---
कोट
मागील चार वर्षात रानडुकरं, गवे, माकडं यांचा त्रास सुरू झाला आहे. भगवतीनगर परिसरात खाडीकिनारी भातशेतीनंतर पावटा, कुळीथ अशी लागवड केली जात होती; पण वन्यप्राण्यांमुळे मेहनत वाया जात असल्याने शेतकरी प्रचंड त्रस्त झाला आहे. कमी खर्चात वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याचा उपाय सुचवणे आवश्यक आहे.
- उमेश रहाटे, शेतकरी
------
कोट
वन्यप्राण्यांमुळे नुकसान झाल्यास शासनाकडून संबंधित शेतकऱ्याला निकषानुसार मदत दिली जाते. त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी याबाबत जवळच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क साधून प्रस्ताव सादर करावा.
- प्रकाश सुतार, प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com