सुहृदाचे बोल...

सुहृदाचे बोल...

Published on

प्रासंगिक

अमृतानुभव निमित्ते---लोगो

रत्नागिरीतील साहित्यिक, लेखक व आध्यात्मिक विचारवंत नारायण पाटणकर यांच्या अमृतानुभव पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (ता. १२) रत्नागिरीत होत आहे. त्या निमित्ताने बी. ई. मेकॅ. व्हीजेटीआय, एमटेक आयटी मुंबई असे उच्च विद्याविभूषित पुण्यातील उद्योजक अशोक अत्रे या सुहृदाचे हे मनोगत.

--अशोक अत्रे, पुणे
----
सुहृदाचे बोल...
खरेतर, मी कधी अध्यात्माकडे वळेन असे जर कोणी सांगितले असते, तर मी त्याची खिल्ली उडवली असती. १९८१ मध्ये मी आयआयटी मुंबईमधून एमटेक् झालो. नोकरी मिळाली. तिथे मला सहकारी व वरिष्ठ यांच्यातले दोष व विचित्र प्रवृत्ती अनुभवास आल्या. वर वर छान दिसणारे वातावरण मत्सर, दुटप्पीपणा, लंपटपणा, ढोंगीपणा, खोटेपणा व ‘हम करेसो कायदा’ या वृत्तींमुळे तणावपूर्ण होते. मग मला जाणवले की, नोकरी माझ्यासाठी नाही. त्याचवेळी माझ्या बंधूंनी त्यांच्यासोबत भागीदारीत व्यवसाय करण्याची संधी दिली. मी ती आनंदाने स्वीकारलीही!
व्यवसायात प्रवेश केल्यानंतर मला ग्राहक, पुरवठादार, सरकारी अधिकारी, बँकर्स आणि कर्मचारी यांच्याबरोबर काम करताना अधिक सकारात्मक अनुभव मिळाले. व्यवसाय चांगल्या प्रकारे आकार घेत गेला. आम्ही विशेष प्रकारचे बॉयलर्स डिझाईन करून विकू लागलो, ज्याचा आमच्या ग्राहकांना फायदाच झाला. व्यवसाय वाढत असताना कर्मचाऱ्यांमध्ये मत्सर, ढोंगीपणा, नैतिकता पायदळी तुडवून केलेली स्पर्धा अनुभवायला मिळू लागली. यातून मला असे जाणवले की, संघर्ष आणि शांतता हे एक प्रकारचे द्वंद्व आहे व ते एकमेकांचे विरोधक आहेत. अन्याय झाला की, संघर्ष करावा लागतो; पण शांतता गमवावी लागते. या द्विधा अवस्थेत मी काही वर्षे घालवली.
मग काही विलक्षण घटना घडल्या. माझे आतेभाऊ सुरेंद्र रघुनाथ पोतनीस (एमटेक्, १९६२, मुंबई) यांनी मला आध्यात्मिक शक्तीचा मार्ग दाखवला. हे मार्गदर्शन माझ्यासाठी नवीन दिशा ठरले. सुरेंद्रदादाही माझ्यासारखेच आधी नास्तिक होते. ते या मार्गाला कसे आले, याचे मला कुतूहल होते. मग त्यांनी त्यांचे काही विलक्षण अनुभव सांगितले. अक्कलकोट स्वामींनी दिलेला साधा संदेश ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे,’ या शब्दांनी माझ्या मनावर खोल परिणाम केला. त्यामुळे कार्यकारण भावाचा विचार न करता मी माझी श्रद्धा अक्कलकोट स्वामींना वाहिली. त्यांचे परमशिष्य शंकर महाराज यांनी लिहिलेली ‘शंकरगीता’ आणि अक्कलकोट स्वामींवर आधारित ग्रंथांचे वाचन मी सुरू केले. या अध्ययनातून संघर्ष व शांतता हे एकमेकांविरोधी नसून, एकमेकांना पूरक असू शकतात. शांत चित्त ठेवून अंतर्मनातून जबरदस्त संघर्ष करणे शक्य आहे आणि हा संघर्षच अखेरीस शांतता देऊ शकतो. त्यांनी दिलेल्या शिकवणुकीत व्यवहार कसा करावा, भीती कशी निर्माण होते आणि ती कशी दूर करता येते, यावर मूलभूत विचार होते. त्यामुळे माझे मन अधिक स्पष्ट व स्वच्छ झाले.
त्यानंतर मी भगवद्गीतेवरील निरूपणे, श्री. नणदीकरांनी लिहिलेली वैशिष्ट्यपूर्ण ज्ञानेश्वरी व भगवद्गीता तसेच अनेक विद्वानांनी लिहिलेली अष्टावक्र गीता वाचली. याच प्रवासात मला नारायणराव पाटणकर यांनी लिहिलेली अष्टावक्र संहिता सापडली आणि त्यांच्या साहित्यशैलीच्या प्रेमातच पडलो. मी त्यांना शोधून काढले. रत्नागिरीत राहणारे, साधे सर्वसामान्य भासणारे व्यक्तिमत्त्व मात्र ज्याच्या मनात, हृदयात आणि जिभेवर साक्षात सरस्वतीचा वास आहे. नारायणरावांनी लिहिलेली अनेक पुस्तके मी वाचली. ते बोलू लागले की, ऐकतच राहावे असे वाटते. त्यांचे विचार ऐकताना मन जो विलक्षण शांततेचा अनुभव घेते, तो अनोखाच आहे!
त्यांचे शब्दसामर्थ्य अलौकिक असून, विषय सहजपणे उलगडून सांगण्याचे आहे. त्या लिखाणात कर्मकांडास प्रोत्साहन नाही. आत्मशोध- आत्मबोध-आत्मपरीक्षण असा तो प्रवास आहे. त्यामुळे ‘मी’ची ओळख स्पष्ट होते. मन उन्मनी अवस्थेला पोचते.
ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकारामगाथा, एकनाथ, नामदेव, कबीर, तुलसीदास आणि अशा अनेक वारकरी संप्रदायातील संतांचे वाङ्मय हे आधुनिक युगात जगण्यासाठी कालबाह्य झाले आहे, अशी निव्वळ चरितार्थासाठी विद्यापिठातून पदव्या घेणाऱ्या विद्वानांची समजूत आहे. वस्तुस्थिती नेमकी उलट आहे. ही पैशाच्या व भौतिक समृद्धीच्यामागे भान हरपून धावणारी उच्चविद्याविभूषित मंडळी त्यांचा आत्माच हरवून बसली आहेत. याची त्यांना जाणीवही नाही. ही अवस्था म्हणजे, आधीच मर्कट तशात मद्य प्याला आणि तरीही तृष्णा न भागलेला! यात मर्कट-मोठ्या स्पर्धांत मार्क मिळवलेला मद्य-पैसा व भौतिक समृद्धी आणि मग त्याला विंचू चावला. विंचू-काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, मोह इ. षड्रिपूंचे विष भिनलेला, अत्यंत अहंकारी व धर्म-वर्ण-जातीद्वेषाने जखडलेला आणि द्वेष व हेटाळणीचे वैचारिक समर्थन करत आपले अविवेकी तत्त्वज्ञान पाजळणारा व ते सांगत फिरणारा दुर्जन. प्रेम, सद्भावना, करूणा/सहानुभूती आणि कृतज्ञता म्हणजे काय हे संस्कार पूर्वी कीर्तने, प्रवचने, भारूड-पोवाडेसारख्या लोककलांतूनच गावागावात पाझरले जायचे. स्थानिक जीवनाचा तो अविभाज्य ठेवा असायचा.
आपला पिंड काय आहे, याचा शोधच लोक घेत नाहीत मग काहीतरी विरुद्ध वागणे होते. मग गुरूची गरज भासते. मी स्वतः आपणास खात्री देतो की, हे ग्रंथ वाचून जगावे कसे, जगात वावरावे कसे व समाजात समरस व्हावे कसे याचे सहजसुंदर मार्गदर्शन मिळेल. नारायणरावांनी लिहिलेले सर्व साहित्य हे आधुनिक मानसशास्त्रालाही भावेल असेच आहे. हे ग्रंथ वाचण्याची तसदी आपण घ्यावी व त्यातून मिळणाऱ्या निरंतर आनंदाचा आणि समाधानाचा उपभोग घ्यावा.
अस्तू.
(शब्दांकन मेघना अत्रे, बी. ई. मेकॅ.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com