गुहागर-एकाच विहिरीत द्विस्तरीय जलाशयाची निर्मिती
rat12p24.jpg
98114
गुहागरः वेळणेश्वर येथे बांधलेली विहीर.
rat12p25.jpg
98115
डॉ. गाडगीळ यांनी पाणी साठविण्यासाठी विहिरीत केलेले बांधकाम.
-----------
एकाच विहिरीत द्विस्तरीय जलाशयाची निर्मिती
वेळणेश्वरच्या डॉ. चंद्रशेखर गाडगीळ यांचा भन्नाट प्रयोग; केंद्राकडून पेटंट प्रमाणपत्र प्राप्त
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १२ः एकाच विहिरीत दोन जलाशयांची निर्मिती करुन पावसाचे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी साठवणुकीची क्षमता सिध्द करणारा एक भन्नाट प्रयोग गुहागर तालुक्यातील वेळणेश्वरच्या डॉ. चंद्रशेखर गाडगीळ या संशोधकाच्या कल्पनेतून साकारला आहे. त्यांच्या कल्पनेला आणि मेहनतीला जणू मान्यताच मिळाली असून केंद्र सरकारकडून त्यांना यासाठी पेटंट प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे. गुहागर तालुक्यातील हा अभिनव प्रयोग देशपातळीवर कौतुकास्पद ठरला आहे.
राज्यात सर्वाधिक पाऊस कोकणात पडतो मात्र, सच्छिद्र जांभा पाणी धरुन ठेवत नाही. डोंगराळ प्रदेशमुळे पाणी वेगाने ओढ्यानद्यांमार्गे खाडी, समुद्रात वाहून जाते. यावर उपाय म्हणून एक भन्नाट संकल्पना मनात आणून वेळणेश्वरचे निवृत्त प्राध्यापक व संशोधक डॉ. चंद्रशेखर गाडगीळ यांनी यावर एक प्रयोग केला. डॉ. गाडगीळ म्हणाले, एका सामान्य विहिरीला भूजल आणि पावसाचे पाणी दोन्ही साठविण्यासाठी सहजी दोन पातळ्यांवर रुपांतरीत करता येते ती म्हणजे बहुस्तरीय साठवण विहिरीची रचना. विहिरीच्या तळाशी असलेला नैसर्गिक स्रोत म्हणजे झऱ्यापासून आलेल्या पाण्याचा साठा म्हणजे पहिला जलाशय.
या पाण्याच्या वरच्या विहिरीच्या रिकाम्या भागात एक भक्कम काँक्रीटचा स्लॅब टाकून विहिरीत एक मजलाच तयार होतो. यालाच विहिरीची विभागणी म्हणतात. या स्लॅबच्यावर बांधलेली साठवण टाकी म्हणजेच दुसरा जलाशय. यामध्ये पावसाळ्यात तुडुंब भरून वाहणाऱ्या विहिरीचे तसेच टाकीत पडणाऱ्या पावसाचे पाणी साठवता येते. अधिक पाणी साठविण्यासाठी लगतच्या मोकळ्या जमिनीवर म्हणजेच दुसऱ्या स्तरावर विहिरीतील टाकीभोवती वर्तुळाकार टाकीही बांधली. या सगळ्याची देखभाल करण्यासाठी एक प्रवेशनलिका तयार केली. ज्यामुळे वरच्या पाण्याला हात न लावता थेट खालच्या विहिरीतील जलाशयापर्यंत जाता येते. त्यामुळे विहिरीतील पाणी पंपाने सहज काढता येते.
विहिरीत घातलेला विभागणीचा मधला स्लॅब मजबूत असणे गरजेचे आहे. पावसाळ्यात तुडुंब भरणाऱ्या विहिरीतील पाण्याचा प्रचंड दाब आणि विहिरीतील पाण्याची पातळी खाली गेल्यावर वरच्या टाकीतील लाखो लिटर पाण्याचा दाब सहन करण्याची ताकद या स्लॅबमध्ये असावी लागते. विहिरीलगतच्या मोकळ्या जागेवर आतल्या टाकीला समांतर भिंत बांधून दुसरी टाकी निर्माण करता येते व या दुसऱ्या स्तरावरही पाण्याची साठवण होते. डॉ. गाडगीळांच्या मार्गदर्शनाखाली मिस्त्री राजेंद्र भुवड व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात साकारली आहे.
चौकट
तीन लाख लिटर पाणी साठवण शक्य
या प्रयोगाने वेळणेश्वरमध्ये एका विहिरीमध्ये व भोवती मिळून सुमारे तीन लाख लिटर पाण्याची साठवण करण्यात आल्याचे डॉ. गाडगीळ यांनी सांगितले. या सुधारित विहिरीत जे पाणी दरवर्षी समुद्राला वाहून जायचे त्यातील दोन लाख लिटर पाणी विहिरीच्या आतल्या मजल्यात म्हणजे जलाशयात आणि एक लाख लिटर पाणी दुसऱ्या मजल्यावरील म्हणजेच जमिनीवरच्या गोल टाकीत साचते. या प्रयोगाचा फायदा पावसाचे साठविलेले अतिरिक्त पाणी सिंचनासाठी उपयोगाला येते. जिथे बागायतदार, शेतकरी एक पीक घ्यायचे तिथे या पाण्यावर दोन पिके घेतली जातील, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.