कळंबस्तेतील देवराईला सीईओंची भेट
कळंबस्तेतील देवराईला
सीईओंची भेट
चिपळूण : मंडणगड येथे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कार्यक्रमानिमित्त चिपळूण दौऱ्यावर आलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी कळंबस्ते येथील देवराईला भेट देऊन पाहणी केली आणि उपक्रमाचे कौतुक केले. कळंबस्ते येथे २५६ जातींची झाडे असणारी देवराई उभी केली जात आहे. गेल्या वर्षी या उपक्रमाचा प्रारंभ झाला होता तर यंदा पावसाळ्यानंतर देवराई उभारणीच्या कामाला गती मिळाली आहे. या देवराई प्रकल्पांतर्गत २५६ प्रजातींच्या तब्बल १ हजार २५२ झाडांचे रोपण करण्यात आले आहे. स्थानिक व दुर्मिळ वनस्पतींचा समावेश असलेल्या या ठिकाणी सीएसआर निधीतून प्रकल्प उभारण्यात आला असून, स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागातून वृक्षसंवर्धनाचे काम सुरू आहे. या वेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी रानडे यांना प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली.
------------
महाआरोग्य शिबिराला
कडवईत प्रतिसाद
संगमेश्वर ः कोकण आयुर्वेदच्यावतीने कडवई येथे आयोजित केलेल्या महाआरोग्य, रोगनिदान व उपचार शिबिरास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. शेकडो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात नाडी परीक्षण, गुडघ्याच्या आणि मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी, वरिष्ठ नागरिकांसाठी मधुमेह तपासणी तसेच आहार आणि योगासनांचे मार्गदर्शन देण्यात आले. या सोबतच इलेक्ट्रोथेरपी, अॅक्युपंक्चर, कपिंग थेरपी, कायरोप्रॅक्टिक, मोक्सा ट्रीटमेंट, कायरोगन ट्रीटमेंट आदी विविध आधुनिक व पारंपरिक उपचारपद्धतींनी तपासणी व उपचार करण्यात आले. शिबिरामध्ये डॉ. ऋतुजा दोरके, प्रथमेश नलावडे (कायरोप्रॅक्टिशनर), प्राची घाग, सूर्यकांत नलावडे (नाडी तज्ज्ञ), डॉ. सत्यनारायण जयस्वारा (गुडघे स्पेशालिस्ट), डॉ. चंद्रकांत यडगुडकर (वातरोगतज्ज्ञ) आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी सहभाग घेतला व रुग्णांची तपासणी केली. शिबिरानंतर कडवई येथे दर मंगळवारी मोफत आरोग्य कॅम्प आयोजित करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
------
‘वाचू आनंदे’ला
चिपळुणात प्रतिसाद
चिपळूण : चिपळूण नगरपालिका, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय यांच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या वाचू आनंदाने या उपक्रमास चिपळूणकर वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक रविवारी चिपळूण शहरातील विविध ठिकाणी हा उपक्रम राबवला जात असून, वाचनप्रेमी नागरिक यामध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत. या उपक्रमात वाचक दोन तास आपल्या आवडीची पुस्तके वाचत असून, त्यानंतर त्या पुस्तकांवर प्रतिक्रिया देतात. आजच्या सत्रात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष कवी राष्ट्रपाल सावंत, कार्याध्यक्ष सुनील खेडेकर, नगरपालिकेतील कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, कर्मचारीवर्ग आणि अनेक वाचकांनी उपस्थिती लावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.