दिग्गजांच्या राजकीय आशा पल्लवीत
98296
सावंतवाडी ः येथील तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात गट व गण आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडला.
दिग्गजांच्या राजकीय आशा पल्लवीत
सावंतवाडी पंचायत समिती आरक्षण; काही बड्या इच्छुकांची निराशा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी सावंतवाडी तालुक्यातील विविध गावांच्या गट व गण आरक्षण सोडतीचा बहुप्रतिक्षित कार्यक्रम आज प्रांताधिकारी हेमंत निकम आणि तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. चिठ्ठीद्वारे झालेल्या या पारदर्शक सोडतीमुळे अनेक इच्छुकांच्या राजकीय आशा पल्लवित झाल्या आहेत तर काहींच्या उमेदवारीवर पाणी फिरले आहे. विशेष म्हणजे, सभापती पदासाठी अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्याने तळवडेच्या पंचायत समिती महिला सदस्याच्या गळ्यात सभापती पदाची माळ गळ्यात पडणार आहे.
पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, सर्वांचे लक्ष लागून राहिलेली गट व गण आरक्षण सोडत आज येथील तहसीलदार कार्यालयात जाहीर करण्यात आली. तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या सोडत कार्यक्रमात चिठ्ठ्या काढण्याचा मान तशुषी जाधव आणि भक्ती मुळीक या लहान मुलींना देण्यात आला. आरक्षण सोडतीनुसार कलंबिस्त, आंबोली, मळगाव, माजगाव, न्हावेली, इन्सुली, सातार्डा सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी राखीव झाले तर माडखोल, कारिवडे, चराठे, मळेवाड, बांदा, तांबोळी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील आरक्षणाचा विचार केल्यास, कोलगाव आणि आरोंदा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यांच्यासाठी तर विलवडे आणि शेर्ले हे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. हा संपूर्ण आरक्षण सोडतीचा कार्यक्रम प्रांताधिकारी निकम आणि तहसीलदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शकपणे पार पाडला.
आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाल्यामुळे आता विविध पक्षांनी आणि उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी आणि तयारी सुरू केली आहे. आगामी पंचायत समिती निवडणुकीत रंगत वाढणार असल्याचे या सोडतीवरून स्पष्ट होत आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या आरक्षणात सावंतवाडी तालुक्यातील एकूण नऊ मतदार संघात आरक्षण सोडत काढली. यात आंबोली मतदार संघात सर्वसाधारण महिला तर मळेवाड व माडखोल मतदारसंघात नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण निश्चित झाले. तर उर्वरीत तळवडे, माजगांव, आरोंदा, बांदा, कोलगांव आणि इन्सुली हे मतदार संघ सर्वसाधारण खुल्या गटासाठी आरक्षित झाले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षणाचा विचार करता अनेक इच्छुकांचे पत्ते कट झाले आहेत. यापूर्वी पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या काही चेहऱ्यांची आरक्षणामुळे हिरमोड झालेला पहायला मिळाला. यामध्ये विशेषत्वाने आंबोली मतदार संघातून जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे तसेच शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिनेश गावडे, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, माजी सभापती रवींद्र मडगावकर, पंढरीनाथ राऊळ आदी इच्छुकांना आरक्षणाचा फटका बसला. या ठिकाणी महिला आरक्षण पडल्याने त्यांचा पत्ता कट झाला असून त्यांना नवीन मतदारसंघ शोधावे लागणार आहेत. पंचायत समितीसाठी पडलेल्या आरक्षणातही काही जणांना आरक्षणाचा फटका बसला. यात बांदा प्रभागात माजी उपसभापती शितल राऊळ तर आरोंदा मतदार संघातून माजी सभापती संदीप नेमळेकर, तळवडेतून माजी सभापती पंकज पेडणेकर, प्रमोद गावडे यांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे यातील काही जणांना आता जिल्हा परिषद निवडणूक उमेदवारीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
--------------
तळवडेत आनंदाचे वातावरण
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, पंचायत समिती सभापती पदासाठी तळवडे पंचायत समिती प्रभाग अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. शिवाय त्या ठिकाणी पंचायत समितीचे आरक्षण अनुसूचित जाती महिला निश्चित झाल्याने तळवडेतून निवडून येणाऱ्या अनुसूचित जातीच्या महिला सदस्यास थेट सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती पदाची खुर्ची मिळणार आहे. त्यामुळे तळवडेमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
---------------
आरक्षण सोडत अशी
सर्वसाधारण ः कलंबिस्त, आंबोली, मळगाव, माजगाव, न्हावेली, इन्सुली, सातार्डा
सर्वसाधारण (महिला) ः माडखोल, कारिवडे, चराठे, मळेवाड, बांदा, तांबोळी
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) ः कोलगाव, आरोंदा
नागरिकांचा मागास प्रवर्ग ः विलवडे, शेर्ले
अनुसुचित जाती महिला ः तळवडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.