नव्या आरक्षण पद्धतीने 
इच्छुकांचा हिरमोड

नव्या आरक्षण पद्धतीने इच्छुकांचा हिरमोड

Published on

98308

नव्या आरक्षण पद्धतीने इच्छुकांचा हिरमोड

वैभववाडीतील रचना ः इतर मागास प्रवर्गाची एक जागा कमी

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १३ ः जुन्या आरक्षण पद्धतीला पूर्णविराम देत नव्या पद्धतीने केलेल्या आरक्षणामुळे इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाला. तसेच नव्या निकषाचा इतर मागास प्रवर्गालाही फटका बसला असून त्यांची एक जागा कमी झाली आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी दिसून आली. खांबाळे, लोरे, भुईबावडा हे प्रभाग सर्वसाधारण, कोळपे, उंबर्डे हे दोन प्रभाग सर्वसाधारण महिला आणि कोकिसरे प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेकरीता आरक्षित झाले आहेत. जिल्हा परिषद आरक्षणामुळे निवडणूक लढण्याची पूर्ण तयारी केलेल्या इच्छुकांचा स्वप्नभंग झाला आहे.
वैभववाडी पंचायत समितीच्या सहा प्रभागांची आज आरक्षण सोडत प्रक्रिया उपजिल्हाधिकारी तथा पर्यवेक्षक नितीन राऊत यांच्या उपस्थितीत तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी पूर्ण केली. यावेळी नायब तहसीलदार सचिन निकम, भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख नंदु शिंदे, बाळा हरयाण, राजेंद्र राणे, स्वप्निल धुरी, रमेश तावडे, संजय सावंत आदी उपस्थित होते.
तहसीलदार पाटील यांनी तालुक्याची लोकसंख्या ४१ हजार असल्याचे स्पष्ट करतानाच आरक्षण सोडतीचे नवे निकष सर्वासमोर मांडले. आरक्षण प्रक्रिया राबविताना मागील आरक्षणाचा संदर्भ घेण्यात येणार नाहीत, असेही स्पष्ट केले. लोकसंख्येच्या आधारे निश्चित केलेल्या नव्या निकषानुसार तालुक्यात अनुसुचित जाती, जमातीसाठी एकही जागा आरक्षित करता येणार नाही, तसेच नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकच जागा आरक्षित करता येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सुरूवातीला सहा प्रभागामधून नागरिकांचा मागास प्रवर्गाकरीता चिठ्ठी काढली. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी कोकिसरे प्रभाग आरक्षित झाला. त्यानतंर महिला की पुरूष याची सोडत काढली असता महिलेकरीता हा प्रभाग आरक्षित झाला. त्यानंतर उर्वरित पाच प्रभागांमधून सर्वसाधारण महिलांकरीता चिठ्ठ्या काढल्या. यामध्ये कोळपे आणि उंबर्डे हे दोन प्रभाग महिलांकरीता आरक्षित झाले. उर्वरित खांबाळे, लोरे आणि भुईबावडा हे तीन प्रभाग सर्वसाधारण राहिले.
तालुक्यात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी यापुर्वी दोन प्रभाग होते. मात्र, यावेळी एकच प्रभाग झाल्यामुळे त्या प्रवर्गातील इच्छुकांकडून नाराजी व्यक्त केली. लोरे, खांबाळे आणि भुईबावडा प्रभागात आता इच्छुकांची भाऊगर्दी वाढणार आहे. जिल्हा परिषद आरक्षणाने अनेक मात्तबरांची स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. लोरे जिल्हा परिषद मतदारसंघ पुन्हा नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या विद्यमान सदस्य पल्लवी झिमाळ यांना निवडणुक लढविण्यास संधी आहे. कोकिसरे जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे. तालुक्यातील एकमेव कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण झाला आहे. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवारी मिळविण्यासाठी चढाओढ लागणार आहे.
------------
जि.प.चे इच्छुक पं.स. कडे वळणार
जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असलेले अनेक मातब्बरांची निराशा झाली आहे. त्यामुळे हे इच्छुक आता पंचायत समितीकडे वळण्याची शक्यता आहे. पंचायत समिती सभापतीपद सर्वसाधारण असल्याने काही जण निर्णय घेण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com