चिपळूण-चिपळूण नागरी पतसंस्थेचा आज वर्धापन दिन
चिपळूण नागरी पतसंस्थेचा
आज वर्धापन दिन सोहळा
चिपळूण, ता. १४ ः चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा ३२ वा वर्धापन दिन व दुग्ध उत्पादक व प्रगतिशील शेतकरी सन्मान सोहळा बुधवारी (ता. १५) सकाळी १० वाजता बहादूरशेखनाका येथील संस्थेच्या सहकार भवन सभागृहात आयोजित केला आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांनी दिली.
चव्हाण म्हणाले, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात शाखाविस्तार केलेल्या या संस्थेने नेहमीच ग्राहकांचे हित जोपासले. स्थानिक तरुण, शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी संस्थेचे सातत्याने प्रयत्न सुरू असून, त्यांना पाठबळ दिले जात आहे. स्वयंरोजगार कर्ज, शेतीपूरक कर्ज, महिलांना स्वावलंबी कर्ज योजनेच्या माध्यमातून कर्जपुरवठा करून त्यांना स्वावलंबी बनवण्यात संस्थेने मोठा हातभार लावला आहे. कर्ज योजनेच्या माध्यमातून छोटे छोटे व्यवसाय उभे राहिले आहेत, ही मोठी सकारात्मक बाब ठरली आहे.
सभासदांना बचतीची सवय लागण्यासाठी संस्थेने अनेक योजना सुरू केल्या. गेल्या ३३ वर्षांच्या कालखंडात श्रावणमास, धनलक्ष्मी, संकल्प ठेव, श्री गणेश ठेव, उत्कर्ष ठेव, धनसिद्धी ठेव, श्री स्वामी समर्थ ठेव, सिद्धी ठेव व धनसंचय ठेव, राष्ट्र अमृत महोत्सव ठेव, संकल्प ठेव या ठेव योजनेबरोबरच सुयश, अल्पमुदत, आवर्त बचत, स्वावलंबी बचत, धनवर्धिनी, दामदुप्पट, दामतिप्पट या ठेव योजनांचा समावेश आहे. या योजनेत हजारो सभासद सहभागी झाले आहेत. गेल्या ३२ वर्षांत ही संस्था सर्वसामान्यांची आधारवड बनली आहे. बुधवारी संस्थेचा ३२ वा वर्धापन दिन बुधवारी १५ रोजी साजरा केला जाणार असून, या निमित्ताने दुग्ध उत्पादक प्रगतिशील शेतकरी यांचा सन्मान सोहळा होणार आहे. संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार असून, तानाजी कवडे, डॉ. सोपान शिंदे उपस्थित राहणार आहेत.