पावस जिल्हा परिषद गटात तिरंगी लढतीचे संकेत
पावस जिल्हा परिषद गटात तिरंगी लढतीचे संकेत
सर्वसाधारण आरक्षणामुळे चुरस ; दोन शिवसेना, भाजपही भक्कम
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १४ः येथील जिल्हा परिषद गट पारंपरिक भाजपचा बालेकिल्ला आहे तरीही या गटामध्ये पारंपरिक युतीचे प्राबल्य आहे; परंतु अनेकवेळा शिवसेना-भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढती झाल्या. त्यामुळे शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षाचे या गटांमध्ये प्राबल्य आहे. या वेळेला हा गट सर्वसाधारण गटासाठी खुला झाल्यामुळे या ठिकाणी स्थानिक पातळीवर युती न झाल्यास तिरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.
पावस जिल्हा परिषद गट पारंपरिक भाजपचा बालेकिल्ला होता. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीमध्ये हा गट भाजपकडे गेला; परंतु त्यांच्यामध्ये अंतर्गत मतभेदामुळे फक्त कागदोपत्री युती होती. प्रत्यक्षात दोघांमध्ये प्रचंड मतभेद होते. त्यामुळे पुढे शिवसेनेच्या माध्यमातून अनेकवेळा बंडखोरी झाली. त्याचा फायदा तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फायदा घेतला. त्या दरम्यान, अनेक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.
बंडखोरीमुळे शिवसेनेला २०१२ मध्ये शिवसेना-भाजप युती असताना शिवसेनेचे अधिकृत उमेदवार रवीकिरण तोडणकर यांच्यासमोर शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष पावसकर यांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने उभे असलेले बहुजन विकास आघाडीचे नंदकुमार मोहिते हे जिल्हा परिषदेवर निवडून गेले. २०१४ मध्ये आमदार उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे या भागामध्ये शिवसेनेचे वर्चस्व निर्माण झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे एकत्रीकरण झाल्यामुळे शिवसेना वरचढ ठरली होती.
२०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये हा गट सर्वसाधारण झाल्यामुळे शिवसेनेतर्फे किरण तोडणकर व सुभाष पावसकर जे मागील निवडणुकीमध्ये एकमेकांसमोर होते, त्यांनी त्या निवडणुकीचा खर्च सादर न केल्यामुळे २०१७ च्या निवडणुकीमध्ये त्यांना निवडणूक लढवता आली नाही. शिवसेनेने अखेर आरती किरण तोडणकर यांना उमेदवारी जाहीर केली. शिवसेना व भाजप यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊन भाजपाच्या विनायक भाटकर यांना आरती तोडणकर यांचा सामना करावा लागला. यामध्ये शिवसेनेच्या आरती तोडणकर विजयी झाल्या.
२०२२ मध्ये शिवसेनेमध्ये फूट पडल्यामुळे तत्कालीन शिवसेनेचे आमदार यांनी शिंदेगटामध्ये प्रवेश केल्यामुळे या गटामध्ये शिवसेना दोन गटांमध्ये विभागले गेले; परंतु अनेक मतदार ठाकरे सेनेकडे राहिल्यामुळे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरूद्ध महायुती असा सामना झाला. या गटांमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरेसेनेने आपले वर्चस्व सिद्ध केल्यामुळे ठाकरेसेनेच्या उमेदवाराला अडीच हजाराचे मताधिक्य या भागामध्ये मिळाले; परंतु महायुतीचा उमेदवार निवडून आला. वरिष्ठ पातळीवरून महायुती जाहीर केल्यामुळे या गटातील कार्यकर्त्यांना मतभेद बाजूला ठेवून महायुतीचे काम करावे लागले. अंतर्गत धुसफूस असूनही महायुतीचे चांगले काम झाले. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून उदय सामंत यांना भाजपने पाठिंबा दिल्याने लोकसभा निवडणुकीतील मताधिक्य मोडीत काढून अधिकचे तीन हजाराचे मताधिक्य घेऊन महायुतीचे प्राबल्य सिद्ध झाले.
चौकट
आमदार सामंतांच्या आश्वासनाकडे लक्ष
त्या वेळच्या प्रचारादरम्यान आमदार उदय सामंत यांनी महायुतीच्या माध्यमातून भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला जाईल आणि त्याला निवडून आणले जाईल, असे आश्वासन दिले होते. त्या निवडणुकीवेळी दिलेले आश्वासन सत्यात उतरते की, आश्वासनच राहते याकडे कार्यकर्ते लक्ष ठेवून आहेत.
-------
चौकट
तिन्ही पक्षांची स्वबळाची तयारी
या वेळी खुले आरक्षण झाल्यामुळे ठाकरे सेनेकडून रवीकिरण तोडणकर इच्छुक आहेत. त्यांच्याबरोबर इच्छुक असलेले सुभाष पावसकर यांना पंचायत समिती किंवा पावस सरपंचपद देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे सेनेकडून एकमेव उमेदवार राहण्याची शक्यता आहे. भाजपाकडून माजी पंचायत समिती सदस्य सुशांत पाटकर यांची संधीची शक्यता आहे तसेच शिंदेगटाकडून नाखरेतील सेनेचे खंदे कार्यकर्ते विजय चव्हाण यांना संधी मिळण्याची चिन्हे आहेत.
---------
कोट
आमची संघटना या गटामध्ये चांगली रूजल्यामुळे जरी काही लोक बाहेर गेले तरी ते मुळात आमचे नव्हतेच. त्यामुळे प्रत्येक शिवसैनिक ठाकरेंशी प्रामाणिक असल्यामुळे त्यांनी दिलेल्या उमेदवाराचे काम निश्चित होणार आहे. या वेळी अस्तित्वाची लढाई असल्याने त्यांनी दिलेल्या उमेदवाराचे काम जोमाने करून शिवसैनिकांचे अस्तित्व दाखवून देणार आहोत.
- उदयराज भाटकर, माजी शाखाप्रमुख, ठाकरे शिवसेना
-----------
कोट
या गटामध्ये आमच्या पक्षाचे अस्तित्व आत्तापर्यंत टिकून ठेवले आहे. त्यामुळे पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे काम अधिक जोमाने करणार आहोत. लढत कोणाशी असो, विजय आमचा निश्चित आहे. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या माध्यमातून आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केले आहे. त्यामुळे अस्तित्वाची लढाई असल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
- अनिल बिर्जे, कार्यकर्ता, भाजपा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.