सदर-आली दिवाळी....!

सदर-आली दिवाळी....!

Published on

लोगो..............संतांचे संगती

rat15p5.jpg-
98654
धनंजय चितळे

इंट्रो

भारतीय संस्कृती सर्वांप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करायची शिकवण देते. सण-उत्सव साजरे करतानाही उन्मादी व्हायचे नाही. लीन व्हायचे हीच शिकवण आहे. दिवाळी अगदी तोंडावर आली आहे. कोजागिरीच्या उत्सवानंतर दीपवाळीपर्यंत म्हणजे भाऊबिजेपर्यंत प्रत्येक दिवस साजरा करण्यामागे एकेक उदात्त विचार आहे, कृतज्ञता आहे. वसुबारस ते भाऊबीज या कालावधीचे रोजचे महत्व आणि उदात्त विचार काय, हे पाहूया या लेखात...
- धनंजय चितळे, चिपळूण
---

आली दिवाळी....!

कोजागिरीनंतर पाहता पाहता वसुबारस अर्थात् गोवत्स द्वादशी येते. मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे भारतीय संस्कृती सर्वांप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करायची शिकवण देते. ज्या गोधनामुळे अर्थात् गाय, बैल यासारख्या प्राण्यांमुळे आपले जीवन सुरळीत सुरू राहते त्या गोधनाविषयी पूज्य भाव व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे वसुबारस. आपल्या रोजच्या प्रार्थनेमध्ये आपण देवांना शुभंकरोती कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा।
शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते।। असे म्हणून हात जोडतो म्हणजेच देवाकडे शुभकर कल्याणप्रद कर हे सांगतानाच पहिली मागणी आरोग्याची केली आहे. हे आरोग्य ज्यांच्या कृपेने चांगले राहते त्या धन्वंतरीची कृतज्ञतापूर्वक पूजा करण्याची तिथी म्हणजे धनत्रयोदशी होय. यानंतर सुरू होणारा उत्सव हा खऱ्या अर्थाने कौटुंबिक नातेसंबंध दृढ करणारा उत्सव आहे. मागच्या भागात ज्याप्रमाणे आपण पौर्णिमेचा विचार केला त्याप्रमाणे या भागात थोडासा अमावस्येचा विचार पाहा. बऱ्याचवेळा अमावस्या ही अशुभ तिथी आहे, असे मानले जाते. वास्तविक, सर्व अमावस्या वाईट नाहीत. श्रावण अमावस्या हा मातृदिन आहे. भारतीय संस्कृतीने मातृदेवो भव् असा आग्रह धरला आहे. आपल्या अनेक देवांना त्यांच्या आईच्या नावावरून ओळखले जाते. उदा., कौसल्येय, सौमित्र, आंजनेय ही रामायणातील प्रसिद्ध संबोधने आठवा किंवा कौंतेय, पार्थ हे महाभारतातील अर्जुनाचे नाव बघावी. आपल्याला आषाढ अमावस्येला दिव्यांची पूजा करावी, असे सांगितले आहे. भारतीय संस्कृती ‘‘तमसो मा ज्योतिर्गमय’’ म्हणजेच मला अंधाराकडून प्रकाशाकडे ने असे सांगणारी संस्कृती आहे. त्यामुळेच जसं दिव्यांच्या अवसेला दीपपूजन केले जाते तसे अश्विन महिन्याला लक्ष्मीपूजन करण्याची प्रथा आहे. आपल्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी देवीची पूजा करण्याचा भाव किती उदात्त आहे ना? उलट इंग्रजी वर्षाच्या अखेरच्या दिवशी ३१ डिसेंबरला काय केले जाते? आपणच विचार करा. महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे यांनी भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीची तुलना करताना असे म्हटले आहे की, ‘‘त्यांची द्राक्ष संस्कृती आहे आणि आमची रूद्राक्ष संस्कृती आहे.’’ म्हणजे त्यांची संस्कृती भोगप्रधान आहे तर आपली संस्कृती त्यागप्रधान आहे. आता आपणच ठरवायचे दिवे लावायचे की, मिटवायचे. लक्ष्मीचे पूजन करायचे की उधळपट्टी, असो. पती-पत्नीच्या नात्याचा दिवस म्हणजे दिवाळी पाडवा तर बहीण-भावांचे नाते अधिक दृढ करणारा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवसाला यमद्वितीया असेही म्हणतात. आपल्याला यम ही मृत्यूची देवता इतकेच माहीत असते; पण ती धर्माचीही देवता आहे. यम आणि यमुना ही सूर्यनारायणाची अपत्ये आहेत. भाऊबिजेला एक दिवा यमासाठी दक्षिण दिशेला लावावा, असा संकेत आहे. आपली ही दिवाळी साजरी करताना मला एका आरतीची आठवण होते..त्या आरतीचे चिंतन पुढील भागात. तोपर्यंत सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

(लेखक संत आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com