सिंधुदुर्गनगरीला अखेर महसूल गावाचा दर्जा
98733
सिंधुदुर्गनगरीला अखेर महसूल गावाचा दर्जा
जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश; नगरपंचायत होण्याच्या प्रक्रियेला वेग
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १५ ः ओरोस बुद्रुक, रानबांबुळी, अणाव आणि सिंधुदुर्गनगरी या चारही गावांचा नव्याने स्वतंत्र ‘सिंधुदुर्गनगरी’ या नावाने महसुली गाव करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी याबाबत आदेश काढले आहेत. याबाबत हरकती नोंदविण्यासाठी २९ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. जिल्ह्याची राजधानी असलेल्या सिंधुदुर्गनगरीला स्वतंत्र महसूल गाव म्हणून दर्जा मिळाल्याने अनेक वर्षांची मागणी असलेली आणि नितांत गरज बनलेली नगरपंचायत होण्याची प्रक्रिया वेग घेणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
याबाबत जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील ओरोस बुद्रुक, रानबांबुळी, अणाव या महसुली गावांची विभागणी करून सिंधुदुर्गनगरी या नावाने नवीन महसूल गाव निर्माण करित असल्याचे कळविले आहे. यामध्ये ओरोस बुद्रुक गावातील एकूण २५४ भूमापन क्रमांक, रानबांबूळी गावातील एकूण १५३ भूमापन क्रमांक, अणाव गावातील एकूण २६५ भूमापन क्रमांक आणि सिंधुदुर्गनगरी मधील एकूण तीन भूमापन क्रमांकांचा यात समावेश केला आहे, असे नमूद केले आहे. तसेच यात ओरोस बुद्रुकमधील १ ते ५१, ५४, ५७, ७०, ७८ ते ८०, ८१ ते ८२, ८५ ते १४७, १४९ ते १९८, २०१ ते २८४ या एकूण २५४ भूमापन क्रमांकाचा समावेश केला आहे. रानबांबूळी गावातील १, ७, १२, १३, २० ते ५३, ५५ ते १७० अशा एकूण १५३ भूमापन क्रमांकाचा समावेश आहे. अणाव गावातील १ ते २४६, २५२ ते २६६, २६८, २८५, २८८, २८९ अशा एकूण २६५ भूमापन क्रमांकाचा समावेश आहे. तसेच सिंधुदुर्गनगरीतील रानबांबुळी १ ब, अणाव २६७ ब, ओरोस बुद्रुक ३८ ब या एकूण तीन भूमापन क्रमांकाचा समावेश आहे.
कसाल, कुंदे, पडवे, गावराई, बाव, पणदूर, हुमरमळा गावांच्या हद्दीसह मालवण तालुक्याच्या हद्दीपर्यंत नव्याने तयार केलेल्या सिंधुदुर्गनगरी या महसूल गावाची सीमा निश्चित केली आहे. याबाबत परिणाम होणाऱ्या व्यक्तींनी २९ ऑक्टोबरपर्यंत लेखी स्वरुपात कुडाळ तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी, कुडाळ यांच्या कार्यालयात सादर करावे. या तारखेपूर्वी प्राप्त हरकती किंवा सूचना विचारात घेतल्या जातील, असे आदेश जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी दिले आहेत.
------------
कोट
सिंधुदुर्गनगरी स्वतंत्र महसूल गाव होणे गरजेचे होते. जिल्हाधिकाऱ्यांनी तशी घोषणा केल्याने ही गरज पूर्ण झाली आहे. यामुळे भविष्यात प्रशासकीय दुष्टीने काम करताना सोईस्कर ठरणार आहे.
- सुप्रिया वालावलकर, माजी पंचायत समिती सदस्य
-------------
सिंधुदुर्गनगरी ही जिल्ह्याची राजधानी आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजधानीचा विकास करताना यासाठी स्वतंत्र महसूल गावाची आवश्यकता होती. भविष्यात सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत होऊ घातली आहे. त्यादुष्टीनेही याचा फायदा होणार आहे.
- प्रभाकर सावंत, सदस्य, सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण
------------
जिल्ह्याची राजधानी सिंधुदुर्गनगरी ठरविताना ओरोस बुद्रुक, रानबांबुळी आणि अणाव या तीन गावांचा समावेश केला होता. त्यामुळे या तीन गावांचा स्वतंत्र महसूल गाव जाहीर झाला आहे.
- महेश पारकर, सदस्य, सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.