डेरवण शाळेत व्यवसायाभिमुख कार्यशाळा
विद्यार्थ्यांनी साकारले मेणबत्ती, कंदील, उटणे, साबण
डेरवण शाळेत कार्यशाळा; ६वी ते ९वीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १६ : श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट संचलित इंग्रजी माध्यमाची शाळा, डेरवण येथे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य व उद्योजकता विकसित व्हावी, या हेतूने दरवर्षी दीपावलीपूर्वी ‘दिवाळी डिलाईट’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. पणत्या सुशोभीकरण, सुगंधी उटणे, मेणबत्त्या, कंदील, अंगाचा साबण यांचे उत्पादन व विक्री या उपक्रमांचा समावेश असलेल्या या कार्यशाळेत ६वी ते ९वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेत विविध आकार व प्रकारांच्या पणत्यांना आकर्षक रंगछटांनी रंगवून विद्यार्थ्यांनी पणत्यांचे सुशोभीकरण केले.
मेणापासून नानाविध फुले, रोझ पिलर्स, डॉल, फ्लोटिंग कॅन्डल्स, टी लाईट्स अशा मेणबत्त्यांची निर्मिती केली तसेच जेलवॅक्सपासून काचेचे विविध प्रकारचे ग्लास, बाऊल्स वापरून विद्यार्थ्यांनी अनेक रंगांच्या पारदर्शक मेणबत्त्या साकारल्या. अनेक रंग, रंगीत रांगोळी, मणी, शंख शिंपले अशा वस्तूंच्या साहाय्याने सुबक सुवासिक मेणबत्त्या बनवण्याचा आनंद व आत्मविश्वास विद्यार्थ्यांनी अनुभवला. त्वचेसाठी उपयुक्त असलेल्या अनेक औषधी व सुगंधी चूर्णांचा वापर करून विद्यार्थ्यांनी सुवासिक व उच्चप्रतीच्या आयुर्वेदिक उटण्याची निर्मिती केली. औषधी चूर्णांचे योग्य प्रमाणानुसार वजन करणे, त्यांचे एकत्रित मिश्रण करणे, अचूक वजन करून आकर्षक पद्धतीने पॅकिंग करणे अशा सर्वच क्रिया विद्यार्थ्यांनी सफाईदारपणे पार पाडल्या. पेपरकपचा वापर करून अत्यंत सुंदर व आकर्षक अशा लेस आणि रंगीत कागद वापरून कंदील बनवण्यात आले. या व्यतिरिक्त विविध आयुर्वेदिक सुवासिक अत्तरांचा उपयोग करून तब्बल २३ प्रकारचे साबण बनवण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. पॅराबेन, सल्फेट अशा रसायनांविरहित नैसर्गिकरीत्या गुणकारी असलेला साबण बनवण्यात मुलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
----
कोट
कार्यशाळेत विविध वस्तू तयार करत असताना विद्यार्थ्यांची एकाग्रता, सांघिक भावना, सर्जनशीलता, क्रियाशीलता, कार्यकुशलता अशी विविध कौशल्ये विकसित झाली. अशा प्रकारच्या व्यवसायाभिमुख व विद्यार्थ्यांना कार्यप्रवृत्त करणाऱ्या कार्यशाळा नेहमीच शाळेत आयोजित करण्यात येतात.
- शरयू यशवंतराव, संचालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.