
98693
आचरा येथील अनुष्का गावकर भाजपमध्ये
आचरा ः माजी आमदार वैभव नाईक यांना भाजपने आचरा विभागात धक्का दिला आहे. वैभव नाईक यांच्या विश्वासू सहकारी आचरा महिला विभाग प्रमुख आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्या अनुष्का गावकर व प्रशांत गावकर यांनी सोमवारी (ता. १३) जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या निवासस्थानी हा प्रवेश कार्यक्रम झाला. यावेळी तालुकाध्यक्ष चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, बाबा मोंडकर, मिताली कोरगावकर, महेश मांजरेकर, संतोष गावकर, चिंदर माजी उपसरपंच दीपक सुर्वे, विजय निकम, सुमित सावंत, सतीश वाईरकर, बंडू गावडे, देवेंद्र हडकर, जीवन भोगावकर, सुशील गावडे, संतोष गावकर, संजय लोके आदी उपस्थित होते. पालकमंत्री नीतेश राणे यांच्या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन भाजपमध्ये प्रवेश केला असून, यापुढे पक्षवाढीसाठी ताकदीने काम करणार असल्याचे गावकर यांनी सांगितले.
---
98657
हळबे महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन
दोडामार्ग : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज येथील हळबे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाविषयी आवड निर्माण व्हावी तसेच ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या विविध साहित्य प्रकाराची ओळख व्हावी, याउद्देशाने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले. प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांच्या हस्ते झाले. ग्रंथालयामध्ये उपलब्ध विविध ग्रंथ विद्यार्थ्यांनी हाताळावेत, महिन्यातून किमान एका ग्रंथाचे वाचन करावे व दिवसातून आपला अर्धा तास ग्रंथालयात वाचनासाठी द्यावा, असे आवाहन प्रा. सावंत यांनी विद्यार्थ्यांना केले. या ग्रंथ प्रदर्शनात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित ‘विज्ञानाच्या उज्ज्वल वाटा’, ‘टर्निंग पॉईंट’, ‘नवभारताचे शिल्पकार ए. पी. जे. अब्दुल कलाम’, ‘माझा भारत उज्ज्वल भारत’ तसेच मराठी भाषेतील विविध ग्रंथ, कथासंग्रह, कवितासंग्रह, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, कादंबरी आदी साहित्याचा समावेश होता. ग्रंप्रदर्शनाचे आयोजन व नियोजन ग्रंथपाल रामकिसन मोरे आणि कल्पेश गवस यांनी केले.
---
भजन कलाकारांची मळगावात उद्या सभा
बांदा ः सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्यातील सर्व संगीत व भजन क्षेत्रातील वारकरी भजन मंडळी, वादक, तबलावादक, कीर्तनकार तसेच अन्य भजनी कलावंतांना ‘भजन कलाकार संघटना सिंधुदुर्ग’ या नव्याने स्थापन झालेल्या संघटनेच्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. ही बैठक शासन दरबारी मान्यता मिळविणे, संघटनेचे कार्यकारी मंडळ स्थापन करणे तसेच कलाकारांच्या समस्या, मानधन, विमा योजना आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ कलाकारांना मिळवून देण्यासाठी चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक शुक्रवारी (ता. १७) सकाळी १०.३० वाजता मळगाव येथील पेडणेकर सभागृहात होणार आहे. या बैठकीस अध्यक्ष म्हणून भजन कलाकार संघटना सिंधुदुर्गचे अध्यक्ष संतोष कानडे बुवा, प्रमुख अतिथी माजी सभापती प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर, शिवसेना सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, वेंगुर्ले तालुकाप्रमुख (शिवसेना) नितीन मांजरेकर, सिंधुदुर्ग बँक संचालक विद्याधर परब, मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर आदी उपस्थित राहणार आहेत.
---
98746
जिल्हा काँग्रेसतर्फे मोंडकरांची नियुक्ती
मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांची मालवण व देवगड तालुक्याच्या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सिंधुदुर्ग काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी याबाबतचे पत्र जारी केले आहे. श्री. मोडकर यांच्याकडे मालवण नगरपरिषदेसाठीही निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे मोडकर यांच्यावर उमेदवारी अर्ज मागवणे, उमेदवार निवड प्रक्रिया राबवणे, आघाडीतील घटक पक्षांशी आघाडीसाठी समन्वय साधणे तसेच तालुक्यामधील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आणि जिल्हाध्यक्षांशी चर्चा करून दिलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडण्याची जबाबदारी असेल. या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष शेख, जिल्हा सरचिटणीस विलास गावडे यांनी मोंडकर यांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.