लठ्ठपणा वाढवतो आरोग्याची चिंता...
लोगो-----------आरोग्यभान ः वैयक्तीक - सार्वजनिक
(१० ऑक्टोबर २०२)
गेल्या २५ वर्षांचा काळ बघता जागतिकीकरणाच्या रेट्यात आपल्या खाद्यसंस्कृतीत प्रचंड बदल झाला आहे. खुली अर्थव्यवस्था होण्याच्या आधीही अन्नाच्या कमतरतेमुळेचे कुपोषण होतेच; पण, आता अतिखाण्यामुळे व अतिरिक्त चरबी व साखर असलेल्या अन्नामुळे लठ्ठपणा एक मोठी आरोग्यसमस्या बनली आहे. दवाखान्यात रुग्णांना वजन व पोट कमी करण्यासाठी मी सल्ला देत असतो. रुग्ण वजन कमी झाले पाहिजे यावर सहमत होतात; मात्र वाढलेले पोट हे सुदृढतेचे लक्षण आहे, या भ्रमात असतात. पाश्चिमात्य लोकांच्या तुलनेत भारतीयांचे देहाच्या मानाने पोट जास्त सुटलेले दिसते व त्यात काही गैर आहे, असे लोकांना वाटतं नाही. उलट खाते-पिते घरका असे वाटते. स्त्रियांच्या बाबतीतही सौंदर्याच्या व्याख्या थोड्याशा गुबगुबीत शरीरयष्टीकडे झुकणाऱ्या आहेत. वाढत्या वयात आरोग्यसमस्येमुळे बहुतांश लोकांमध्ये वजन कमी करण्यासाठी जागृती येऊ लागली आहे; परंतु यश येताना दिसत नाही. वाढत्या वजनाचा प्रश्न वेळीच सोडवला नाही तर आरोग्यसमस्या जटिल होत जातात हे नक्की.
- rat१६p१.jpg -
२५N९८९१०
- डॉ. सुनील कोतकुंडे
---
लठ्ठपणा वाढवतो आरोग्याची चिंता...
आपला भारतीय आहार हा प्रामुख्याने कर्बोदकयुक्त व कमी प्रथिनांचा आहार असल्याने तसेच हल्ली घराबाहेर खाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे भारतीयांचे वजन वाढत आहे. बैठी जीवनशैली, वेगवेगळ्या टाइमझोनमध्ये वर्क फ्रॉम होम संस्कृतीमुळे तसेच ताणतणावयुक्त जीवन, सततची धावपळ यामुळे योग्य व सकस आहार म्हणजे काय याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
एकीकडे अन्नाच्या अभावामुळे कुपोषण आणि दुसरीकडे लठ्ठपणा अशा विरोधाभासी सार्वजनिक आरोग्य परिस्थितीत आपण आहोत. शहरांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण सुमारे ३० ते ३५ टक्के तर ग्रामीण भागात दहा ते पंधरा टक्के आहे. महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत हे प्रमाण अधिक दिसते. विशेषतः प्रसूतीनंतर व रजोनिवृत्तीनंतर. स्पर्धात्मक संस्कृती व खेळाच्या आभावामुळे शाळकरी मुले व किशोरवयीन वयोगटातील लठ्ठपणातही मोठी वाढ झाली आहे.
लठ्ठपणा म्हणजे सर्वसामान्य उंची व वयाच्या मानाने अतिरिक्त वजन असणे. यात भर वजनावर असला तरी शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त चरबी साठणे म्हणजे लठ्ठपणा हे समजून घेतले पाहिजे. शरीराच्या वजनाचे मोजमाप करण्यासाठी बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स वापरले जाते. ढोबळ अर्थाने प्रौढ भारतीयांसाठी हे जर १८ ते २४ दरम्यान असेल तर नॉर्मल समजले जाते. २४ पेक्षा अधिक म्हणजे अवजडपणा व ३० पेक्षा अधिक असेल तर लठ्ठपणा म्हणतात याशिवाय कमरेचा घेर हाही लठ्ठपणाचा महत्त्वाचा निर्देशांक आहे. पुरुषांमध्ये ९० सेंटीमीटरपेक्षा जास्त व महिलांमध्ये ८० सेंटीमीटरपेक्षा जास्त कंबर म्हणजे लठ्ठपणा होय.
- लठ्ठपणा वाढण्याची प्रमुख कारणे
* अयोग्य आहार – बाहेरचे खाणे, अतिप्रक्रिया केलेले खाणे, अवेळी खाणे, अतिरिक्त साखर व मेद असलेले फास्टफूड्स.
* व्यायामाचा अभाव – बैठी जीवनशैली व वाढत्या शहरीकरणात संपुष्टात येणाऱ्या मोकळ्या जागा व उद्यानांचा अभाव.
* अनियमित विस्कळीत दिनचर्या – डिजिटल युगात कामाचे बदललेले स्वरूप व वाढते कामाचे तास यामुळे झोप पूर्ण होत नाही व सततच्या स्पर्धेमुळे ताण येत आहे, ज्यामुळे वर्कलाईफ बॅलन्स बिघडला आहे. याचा परिणाम आपल्या भुकेवर व चयापचायावर होत आहे.
* अनुवंशिकता व हार्मोन इम्बॅलन्स – बदलत्या जीवनशैलीचा शरीर चालवणाऱ्या ग्रंथी जसे थायरॉईडवर परिणाम होत आहे व pcos सारख्या समस्या वाढल्या आहेत, ज्यामध्ये वजन झपाट्याने वाढते.
* आधुनिक डिजिटल जीवनशैली – मोबाईल, संगणक व टीव्हीमुळे स्क्रीनटाइम व सुस्तपणा वाढला आहे.
- लठ्ठपणाची लक्षणे व गुंतागुंत
लठ्ठपणा हा फक्त देहरूपाची समस्या नाही तर अनेक गंभीर आरोग्यसमस्यांना आमंत्रण देतो. अवजड वजनामुळे सततचा थकवा, दम लागणे, झोपेत श्वास घ्यायला त्रास होणे तसेच पाठ व कंबर यांचे दुखणे ही काही लठ्ठपणाची प्राथमिक दुखणी होय. या लठ्ठपणामुळे भविष्यात मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयविकार यांचा धोका बळावतो तसेच सांध्यांचे आजार, गुडघेदुखी व काही प्रकारचे कर्करोग यांचाही धोका वाढतो.
- वजन कमी करण्याचे उपाय:
• प्रक्रिया केलेले अन्न टाळणे- रोजच्या खाण्यात पाकीटबंद मैदा व साखर असलेले तयार पदार्थ टाळणे. बेकरीत बनवले जाणारे पाव, खारी, टोस्ट, बटर, बिस्कीट तसेच तळलेले तेलकट पदार्थ टाळावे. फूडस्टॉलवर वडा, समोसा, कोल्ड्रिंक हे रोजच्या आहाराचा भाग बनू लागले आहेत. यामध्ये त्याच तेलाच्या पुनर्वापरामुळे घातक पदार्थ व साखर असल्याने ती आरोग्यास घातक बनतात. बऱ्याचशा पाकीटबंद पदार्थांवर शूगर फ्री अथवा कोलेस्ट्रॉल फ्री असे लिहिलेले असते; मात्र यात बऱ्याच प्रमाणात छुपी साखर अथवा साखरेचे पर्याय असतात. हे देखील वजन वाढण्यास व रक्तातील शर्करा वाढण्यास कारणीभूत ठरतात तसेच सॅचुरेटेड फॅटमुळे कोलेस्ट्रॉलव्यतिरिक्त ट्रायग्लिसराईड नावाचे कोलेस्ट्रॉल वाढू शकते. यामुळे हृदयविकाराचा गंभीर आजार होऊ शकतो. त्यामुळे अशा फसव्या जाहिरातींना बळी पडू नये. फूडलेबल सजगतेने वाचावा.
रोजच्या जेवणात चपाती, भाकरी, भात हे कर्बोदकाचे मुख्य स्रोत आहे. त्यामुळे यांचे सेवन योग्य प्रमाणात असावे व जोडीला ज्वारी, बाजरी, नाचणी अशा तृणधान्यांची जोड द्यावी. रोजच्या आहारात फळभाज्या, संपूर्ण धान्य, डाळी, कमी चरबीयुक्त दूध, दही, अंडी, मासे, चिकन यांचे योग्य संतुलन असावे. पनीर, चीज हे आरोग्यदायी असले तरीही त्यांचा उष्मांक अधिक असल्याने वजन वाढण्याचा धोका संभावतो. यांना सोयाबीन अथवा सोयापासून बनवलेले पदार्थ जसे टोफू चांगला पर्याय ठरू शकतो. अन्नघटक जितके नैसर्गिक अवस्थेत असतात तितके चांगले. अतिप्रक्रिया केलेले अन्न टाळावे. आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये प्रतिदिन आपल्याला किती कॅलरीजची किंवा उष्माकांची गरज आहे हे समजून घ्यावे. प्रमाणापेक्षा अधिक कॅलरी घेतल्याने वजन वाढणारच. प्रत्येकाने गुगल सर्च करून आपली दैनंदिन गरज किती आहे, हे समजून घेणे फार अवघड नाही.
* व्यायाम ः
प्रतिदिन आपण किती खातो तसेच व्यायाम करून आपण ते किती वापरतो, याचा प्रत्येकाने विचार करावा. प्रतिदिन साधारणतः ४० ते ४५ मिनिटे व्यायाम प्रत्येकाने करायलाच हवा. चालणे, धावणे, सायकलिंग, पोहणे, योगासन करावे. शक्य झाल्यास वेट ट्रेनिंग करणे ज्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होऊन स्नायूंना बळ मिळते. क्रियाशीलता हेच निरोगीपणाचे गुपित आहे, हे समजून घ्यावे.
* वजन कमी केल्याचे फायदे :
- रक्तदाब, साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येते.
- हृदयविकार व मधुमेहाचा धोका कमी होतो.
- झोप सुधारते आणि आत्मविश्वास वाढतो.
- उत्साह वाटतो व आयुष्याची गुणवत्ता सुधारते
* निष्कर्ष ः
लठ्ठपणा हा आजच्या युगातील सर्वात मोठा जीवनशैलीचा आजार आहे. असे असले तरी त्यावर नियंत्रण पूर्णपणे शक्य आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि ताणमुक्त जीवनशैली हाच त्यावर खरा उपाय आहे. वजन व चरबी कमी करणे म्हणजे फक्त रूपासाठी नव्हे तर आनंदी आणि निरोगी जगण्यासाठीची आवश्यक गुंतवणूक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.